Coronavirus: लॉकडाऊनचा परिणाम! गोव्याची तब्बल २ लाख पाठ्यपुस्तके कोल्हापूरच्या प्रिंटरकडे अडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 08:06 PM2020-06-19T20:06:33+5:302020-06-19T20:09:16+5:30
पहिली ते आठवीपर्यंत सुमारे २ लाख पाठ्यपुस्तके लागतात. लॉकडाऊनमुळे ती मिळू शकली नाहीत त्यामुळे विद्यार्थी, पालक चिंतातूर झाले आहेत.
- किशोर कुबल
पणजी : लॉकडाऊनमुळे कोल्हापूरच्या प्रिंटरकडे गोव्याची २ लाख शालेय पाठ्यपुस्तके अडकल्याची माहिती पुढे येत आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतची पाठ्यपुस्तके उपलब्ध न झाल्याने त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही झाला आहे. ही पाठ्यपुस्तके सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना पुरविली जातात. बुक स्टॉल्समध्ये विकली जात नाहीत. पाठ्यपुस्तके महाराष्ट्रातील एका एजन्सीकडून घेतली जातात. पहिली ते आठवीपर्यंत सुमारे २ लाख पाठ्यपुस्तके लागतात. लॉकडाऊनमुळे ती मिळू शकली नाहीत त्यामुळे विद्यार्थी, पालक चिंतातूर झाले आहेत.
कोल्हापूर येथील गणेश प्रिंटर्सकडे ही पाठ्यपुस्तके पुरविण्याचे कंत्राट आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रिंटिंग प्रेस बंद राहिल्याने पाठ्यपुस्तकांची छपाई होऊ शकली नाही. एरव्ही ही पाठ्यपुस्तके एप्रिलपर्यंत मिळतात परंतु यावर्षी ‘कोरोना’मुळे मार्चपासूनच लॉकडाऊन झाले आणि सीमा बंद झाल्या.
सोमवारी पहिला लोड : होन्नेकेरी
एससीईआरटीचे संचालक नागराज होन्नेकेरी म्हणाले की, ‘ लॉकडाऊन उठल्याने आता छपाई आणि वाहतूकही सुरु झाली आहे. प्रिंटरने येत्या सोमवारी पाठ्पुस्तकांचा पहिला लोड पाठवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार पहिला ट्रक सोमवारी दाखल होईल आणि त्यानंतर शाळांना पाठ्यपुस्तकांचे वितरण सुरु होईल.’
होन्नेकेरी यांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत प्रत्येक इयत्तेसाठी २५ हजार अशी एकूण सुमारे २ लाख पाठ्यपुस्तके लागतात. ते म्हणाले की, ‘आम्ही जानेवारीमध्ये आॅर्डर दिली होती. एरव्ही एप्रिलपर्यंत पाठ्यपुस्तके मिळतात परंतु यावर्षी ‘कोरोना’मुळे स्थिती सर्वांच्याच हाताबाहेर होती त्याला कोणीच काही करु शकले नाही.’ होन्नेकेरी म्हणाले की, ‘मराठी, कोकणी, ऊर्दू आदी माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांबाबतच अडचण आहे. इंग्रजी माध्यमाच्या पाठ्यपुस्तकांबाबत नाही.’
बूक स्टॉलवाल्यांचा मानवताधर्म
पाठ्यपुस्तके न मिळाल्याने काही चिंतातूर पालकांनी बूक स्टॉल गाठले परंतु ही पाठ्यपुस्तके बुक स्टॉल्सवरही उपलब्ध नाहीत आणि त्यांना ती विकण्याची परवानगीही नाही. राजधानी पणजी शहरातील जामा मशिदसमोर असलेल्या सरदेसाई बूक स्टॉलच्या सौ. नम्रता सरदेसाई म्हणाल्या की, ‘आम्ही विद्यार्थी, पालकांना त्यांची जुनी पाठ्यपुस्तके आमच्या बूक स्टॉलवर आणून देण्याची विनंती केली त्यानुसार भरपूर प्रतिसाद मिळाला. आमच्याकडे जमा झालेली जुनी पाठ्यपुस्तके आम्ही गरजू विद्यार्थ्यांना मोफत देत आहोत. ‘कोरोना’च्या या महामारीत केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून हे व्रत आम्ही हाती घेतले आहे. दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवतो परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेच उपलब्ध न झाल्याने हे काम आम्ही हाती घेतले. सोशल मिडियावरुनही पालक, शिक्षकांना जुनी पाठ्यपुस्तके जमा करण्याची विनंती केली. म्हापसा, फोंडा येथूनही आम्हाला फोन आले. तेथे आम्ही पाठ्यपुस्तके जमा करुन ठेवण्यास सांगितले आहे आणि आम्ही जाऊन ती आणणार आहोत. या कामी आपले पती तथा बूक स्टॉलचे मालक सिध्येय सरदेसाई यांचे आपल्याला बरेच सहकार्य लाभले. आम्ही दोघे पती पत्नी मिळून हा उपक्रम राबवतो, असे त्या म्हणाल्या.
- शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना ‘गुगल मीट’ तसेच अन्य अॅपच्या माध्यमातून आॅनलाइन धडे देण्याचे काम शिक्षकांवर सोपविण्यात आले आहे. अनेक शिक्षकांनी हे काम सुरुही केले आहे. परंतु विद्यार्थ्यांकडे पाठ्यपुस्तकेच नसल्याने त्यांना अडचण येत आहे. विद्यार्थ्यांनाही केवळ शिक्षक देत असलेल्या नोटस्वरच अवलंबून रहावे लागत आहे.
- विद्यार्थ्यांना पहिली ते चौथीपर्यंत शिक्षण खात्यातर्फे तर पाचवी ते आठवीपर्यंत सर्व शिक्षा अभियानतर्फे पाठ्यपुस्तके मोफत पुरविली जातात.
- नऊवी ते बारावीपर्यंत गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळातर्फे पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे कंत्राट दिले जाते. सव्वा नऊ लाख पाठ्यपुस्तकांची गरज असली तरी १0 ते १५ टक्के अतिरिक्त पाठ्यपुस्तके मागविली जातात.
काही शाळांची क्लृप्ती
कुजिरा तसेच अन्य ठिकाणच्या काही आघाडीच्या शाळांनी मुलांच्या अॅडमिशनसाठी पालकांना वॉटसअपवर मॅसेज पाठवतानाच जुनी पाठ्यपुस्तके घेऊन या असे आवाहन केले. त्यानुसार पालकांनी आपल्या पाल्यांची जुनी पाठ्यपुस्तके शाळांकडे जमा केल्यावर त्यांच्याकडे वरच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून आलेली जुनी पाठ्यपुस्तके या पालकांना देण्यात आली. लॉकडाऊनमुळे सर्व शिक्षा अभियानला महाराष्ट्रातील प्रिंटरकडून वेळेत पुरवठा होणार नाही याची अटकळ बांधून आधीच या शाळांना खबरदारीचे पाऊल उचलले त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानही टळले.