गोव्यात लॉकडाऊन वाढणार, सीमा बंदच; राज्यांतर्गत आर्थिक उपक्रम सुरू राहणार- मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 04:26 PM2020-04-27T16:26:11+5:302020-04-27T16:33:35+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, पोलिस प्रमुख यांची संयुक्त बैठक घेतली.
पणजी : गोव्यात 3 मेनंतरही लॉक डाऊन वाढेल. राज्याच्या सीमाही बंदच राहतील. फक्त राज्यांतर्गत आर्थिक उपक्रम सुरू राहतील. गोवा सरकारची ही भूमिका मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे सोमवारी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, मुख्य सचिव, आरोग्य सचिव, पोलिस प्रमुख यांची संयुक्त बैठक घेतली. गोव्याला या बैठकीत भूमिका मांडण्याची संधी मिळाली नाही. मंत्री विश्वजित राणो, मुख्य सचिव परिमल रे, आरोग्य सचिव निला मोहनन यांनी बैठकीत भाग घेतला.
बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना गोव्याची भूमिका स्पष्ट केली. गोव्यात येत्या 3 मे रोजी लॉक डाऊन संपुष्टात येणार नाही. आम्ही पंतप्रधानांना आमची शिफारस लेखी स्वरुपात कळवणार आहोत. लॉक डाऊन सुरू रहावा. विमान व रेल्वे सेवा गोव्यासाठी सुरू होऊ नयेपण राज्यांतर्गत आर्थिक उपक्रम सुरू रहावेत असे आम्हाला अपेक्षित आहे. राज्याच्या सीमाही बंद राहतील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोव्यात गेल्या 3 एप्रिलपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही. दीड हजारपेक्षा जास्त व्यक्तींच्या कोरोना चाचण्या आतार्पयत निगेटीव्ह आल्या आहेत. गोवा सुरक्षितच आहे पण अन्य राज्यांतून कुणी गोव्यात येऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.