CoronaVirus Lockdown : गोव्यात लॉकडाऊन वाढणार? मुख्यमंत्र्यांची शाहांसोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 01:08 PM2020-05-29T13:08:41+5:302020-05-29T13:12:06+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : लॉकडाऊन पंधरा दिवस वाढला तरी, व्यायामशाळा, रेस्टॉरंट्स सुरू व्हायला हव्यात. पन्नास टक्के ग्राहकांसोबत ह्या सुविधा सुरू व्हाव्यात अशी मागणी लोक करतात.
पणजी : गोव्यात लॉकडाऊन आणखी पंधरा दिवसांनी वाढविला जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याशी शुक्रवारी फोनवर त्या दृष्टीकोनातून बोलणी झाली. मात्र गोव्यातील रेस्टॉरंट्स सुरू करण्याची मुभा केंद्र सरकारने द्यावी, असे मुख्यमंत्र्यांनी शहा यांना सूचविले आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयाची गोवा सरकारला प्रतीक्षा आहे.
चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन येत्या दोन दिवसांत संपल्यानंतर देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन वाढविण्यात येण्याची शक्यता आहे. गोव्यात रेल्वे, विमान सेवा सुरू झाल्यानंतर व रस्ता मार्गे वाहतुकही सुरू झाल्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. परराज्यांतून कोरोना रुग्ण गोव्यात येतात. या पार्श्वभूमीवर गोव्यात लॉकडाऊन आणखी पंधरा दिवस वाढायला हवा, या मताचे गोवा सरकारही आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपण अमित शाह यांच्याशी फोनवर बोललो असे सांगितले. राज्यात रेस्टॉरंट्स आता खुली व्हायला हवी, ही सरकारची भूमिका असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. सोशल डिस्टंसिंग पाळून पन्नास टक्केच क्षमतेने रेस्टॉरंट्स सुरू करता येतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. लॉकडाऊन पंधरा दिवस वाढला तरी, व्यायामशाळा, रेस्टॉरंट्स सुरू व्हायला हव्यात. पन्नास टक्के ग्राहकांसोबत ह्या सुविधा सुरू व्हाव्यात अशी मागणी लोक करतात. आम्हीही याच मताचे आहोत. मात्र केंद्रीय गृह मंत्रलायाची नवी मार्गदर्शक तत्त्वे कशी काय येतात ते पाहावे लागेल.
राज्याला जेवढे स्वातंत्र्य असेल त्यानुसार पाऊले उचलली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. काहीजण मॉल सुरू करा अशीही मागणी करतात त्याविषयीही सरकार विचार करील. गोव्यात कोरोना रुग्ण संख्या वाढतेय याचीही नोंद सरकारने घेतली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.