'तिळारी'चे लॉक २० तासांनंतर खुले; पुण्याहून आलेल्या पथकाने बजावली कामगिरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:03 PM2023-12-28T12:03:10+5:302023-12-28T12:03:51+5:30

उद्यापर्यंत पर्वरी प्रकल्पात पाणी

locks of tillari dam open after 20 hours the team from pune performed well | 'तिळारी'चे लॉक २० तासांनंतर खुले; पुण्याहून आलेल्या पथकाने बजावली कामगिरी 

'तिळारी'चे लॉक २० तासांनंतर खुले; पुण्याहून आलेल्या पथकाने बजावली कामगिरी 

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : तिळारी धरणाच्या कालव्यांचे लॉक झालेले गेट पुण्याहून खास मागवलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने तब्बल २० तासांच्या अथक प्रयत्नानंतर काल, बुधवारी सकाळी ६:०० च्या सुमारास खुले करत कामगिरी फत्ते केली. त्यामुळे पर्वरी जलशुद्धिकरण प्रकल्पात उद्या, गुरुवारी दुपारपर्यंत पाणी येईल, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

पुणे येथून खास तंत्रज्ञ मागवले होते. पाच ते सहा तंत्रज्ञ २० तास गेट उघडण्यासाठी प्रयत्न करीत होते. अखेर काल सकाळी त्यांच्या प्रयत्नांना यश आले. तिळारीचे पाणी आता वाटेत कुठेही न वळवता थेट पर्वरी प्रकल्पाला सोडण्यात आले असून, उद्या गुरुवारी दुपारपर्यंत पर्वरी येथील १० एमएलडी जलशुद्धिकरण प्रकल्पाला पाणी मिळेल. तिळारी धरण पाणी प्रकल्प हा गोवा - महाराष्ट्राचा संयुक्त प्रकल्प आहे. पाण्याचे वाटपही याच प्रमाणात होत आहे.

दोन्ही कालव्यांच्या डागडुजीचे काम हाती घेतल्याने महिनाभर पर्वरी पठार, साळगाव, कांदोळी भागातील लोकांची पाण्यासाठी परफट चालली होती. डागडुजीचे काम २२ रोजी पूर्ण झाले. परंतु, धरणाच्या कालव्याच्या दोन्ही गेट लॉक झाल्याने पाणी सोडता आले नव्हते. पर्वरीतील १० एमएलडी जलशुद्धिकरण प्रकल्प बंदच होता. पर्वरी पठारासह आजूबाजूच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची बिकट समस्या निर्माण झाली होती.

हे गेट वापरात नसल्या की लॉक होण्याचे प्रकार याआधीही घडलेले आहेत. अस्नोडा जलशुद्धिकरण प्रकल्पाला तिळारीचे दररोज १३० एमएलडी पाणी दिले जाते. सध्या या प्रकल्पाला आमठाणे धरणातन तसेच साळ येथील शापोरा नदीतून पाणी पंपिंग करून घेत गरज भागवली जात होती. 

नाताळ, नववर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी गोव्यात आहे. त्यामुळे या दिवसात पाण्याची मागणी वाढलेली आहे. नेमकी याचवेळी पाण्याची समस्या निर्माण झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. लॉक झालेल्या गेटस् उघडण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू होते. पाण्याचा सुमारे दोन हजार टन वजनाचा प्रेशर या दोन्ही गेटवर होता. त्यामुळे त्या खुल्या करणे कठीण काम बनले होते. पुणे येथील तंत्रज्ञांनी त्यावर मात केली.


 

Web Title: locks of tillari dam open after 20 hours the team from pune performed well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.