गोव्यात भाजपाच्या स्टार प्रचारकांच्या होणार सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 02:37 PM2019-04-12T14:37:06+5:302019-04-12T14:48:54+5:30
लोकसभेसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (13 एप्रिल) संपूर्ण दिवस गोव्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत.
पणजी - लोकसभेसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (13 एप्रिल) संपूर्ण दिवस गोव्यात ठिकठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्ष विजया रहाटकर, अभिनेत्री इशा कोप्पीकर तसेच इतर स्टार प्रचारक ही भाजपचा प्रचार करणार आहेत.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी एक वाजता गोव्यात दाखल होत आहेत. दुपारी चार वाजता साखळी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मडगांव येथे लोहिया मैदानावर ते जाहीर सभेत संबोधतील. रात्री आठ वाजता वास्को येथे बाजारपेठेत त्यांची जाहीर सभा होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभराच्या या सभा आटोपून रात्री दहा वाजता मुंबईत परतणार आहेत.
अभिनेत्री इशा कोप्पीकर रविवारी दुपारी चार वाजता चिंबल येथे सभा घेतील. त्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता झुवारीनगर येथे तर सायंकाळी सात वाजता बायणा येथे जाहीर सभा घेतील. रविवारी सकाळी भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर सांगे येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभा घेतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता केपे येथे जाहीर सभेत त्या संबोधन करणार आहेत. मंगळवारी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू सायंकाळी ५ वाजता पेडणे येथील जाहीर सभेत संबोधतील. त्याच दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता पर्वरी येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी बुधवारी सायंकाळी ५ वाजता मांद्रे येथील जाहीर सभेत व त्यानंतर सायंकाळी ६ वाजता डिचोली मतदारसंघात जाहीर सभा घेतील. सायंकाळी ७.३० वाजता म्हापसा येथे जाहीर सभेत गडकरी संबोधतील.
मनोहर पर्रीकरांचे पुत्र निवडणूक लढवण्यास तयार; पक्षाच्या आदेशाची प्रतीक्षा
दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे मोठे पुत्र उत्पल पणजी मतदारसंघातून लढण्यास स्वर्गीय तयार झाले आहेत. एकदा पक्षाचा आदेश आल्यानंतर ते त्याविषयी घोषणा करतील, असे भाजपच्या बहुतांश कार्यकर्त्यांचे मत आहे. भाजपने उत्पलना उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात श्रीपाद नाईक यांचा प्रचार करण्याची सूचना केली. यानंतर उत्पलने लगेच प्रचार सुरू केला.
पणजीत येत्या 19 मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. उत्पलने निवडणुकीच्या रिंगणात उतरावे म्हणून गेले काही दिवस भाजपच्या पणजीतील कार्यकर्त्यांनी उत्पलशी संवाद साधला व त्याचे मन वळवले, असे त्याच्या संपर्कात असलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले. पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजीत सहानुभूतीचे वातावरण आहे. कारण मनोहर पर्रीकर 24 वर्ष पणजीचे आमदार होते. याबद्दल पत्रकारांनी उत्पल यांना विचारले असता, आपल्याला पक्षाने पोटनिवडणूक लढवण्याची सूचना केलेली नाही. त्यामुळे आपण काही बोलत नाही, असे ते म्हणाले. आपल्याला श्रीपाद नाईक यांचे प्रचार काम करण्यास सांगितले व ते आपण करत आहे, असे उत्पल यांनी नमूद केले.