Lok Sabha Election 2019 : साऱ्यांचे लक्ष सासष्टीकडे का लागलेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 10:45 PM2019-04-25T22:45:12+5:302019-04-25T22:46:11+5:30

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान.

Lok Sabha Election 2019: Why is the focus of Sasashti taken? | Lok Sabha Election 2019 : साऱ्यांचे लक्ष सासष्टीकडे का लागलेय?

Lok Sabha Election 2019 : साऱ्यांचे लक्ष सासष्टीकडे का लागलेय?

Next

- राजू नायक

दोन दिवसांपूर्वी झालेल्या दक्षिण गोवा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांचे पारडे जड असल्याचे मानले जाते, त्याचे प्रमुख कारण ख्रिस्ती प्राबल्याच्या सासष्टी तालुक्यातील मतदान. या निवडणुकीत सासष्टीत भरघोस मतदान झाले. जरी २०१४ मध्ये या तालुक्यात ७१. ३६ टक्के मतदान झाले असले तरी या वेळी ते ६९.९ टक्के झाले आहे.

या तालुक्यात विधानसभेचे सात मतदारसंघ येतात व त्यामध्ये मडगाव व फातोर्डा वगळता इतर भागांमध्ये ख्रिश्चनांचे मोठे प्राबल्य आहे. मडगावमध्ये ७१. ७ टक्के मतदान झाले असून २०१४ मध्ये या शहरात ७३. ३ टक्के मतदान झाले होते. या वेळी झालेले कमी मतदान म्हणजे काँग्रेसबद्दल नाराजी आहे का, याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा चालू असली तरी सासष्टीतील ७० टक्के म्हणजेच 1,63,००० मतेच काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांना विजयासाठीचे मताधिक्य मिळवून देतील, असे राजकीय पंडितांचे म्हणणे आहे.

भाजपालाही सासष्टीतील ख्रिस्ती समाजाच्या एकगठ्ठा मतांची भीती वाटत होती, ती खरी ठरली आहे. ख्रिस्ती मतदारांमध्ये आम आदमी पक्षही लोकप्रिय आहे. या पक्षाने एल्विस गोम्स या माजी मुलकी अधिका-याला उमेदवारी दिली होती व ते काँग्रेस उमेदवार फ्रान्सिस सार्दिन यांच्यापेक्षा तरुण व होतकरू असल्याने त्यांच्या पक्षात उत्साह होता. परंतु ‘आप’ला मत म्हणजे भाजपाला मत असेच समीकरण बनले व ख्रिश्चनांनी भाजपाला हरवण्याचा चंगच बांधल्याने त्यांनी एकगठ्ठा मते काँग्रेसला टाकली असे मानले जाते.

तज्ज्ञांच्या मते, २०१४ मध्ये भाजपाला कधी नव्हे ती मोदी लाटेमध्ये ५० हजार मते सासष्टीत प्राप्त झाली होती. नुवेसारख्या मतदारसंघात जेथे संपूर्ण ख्रिस्ती लोकसंख्या आहे, जेथे एरव्ही भाजपाला हजारभर मतेच मिळतात, तेथे त्यांना २०१४ मध्ये चार हजारांहून अधिक मते प्राप्त झाली होती. निरीक्षक मानतात की या निवडणुकीत भाजपाला तेवढीच ५० हजार मते प्राप्त झाली तरीसुद्धा ते निवडणुकीत पैलतीर गाठू शकणार नाहीत, कारण काँग्रेसच्या मतांचा फरक प्रचंड असेल. या तालुक्यात एक लाख ६३ हजारांचे मतदान झाले असून ‘आप’ (ज्यांची मते २० हजारांहून अधिक असणार नाहीत) व भाजपाची ५० हजार मते वजा केली तर काँग्रेस पक्षाला ८० हजारांहून जादा मते मिळविण्यापासून कोणी अडवू शकणार नाही.

काँग्रेस पक्षाची सूत्रे मान्य करतात की मडगाव व केपे या मतदारसंघांमध्ये काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी जोरदार कार्य केले असले तरी इतर ठिकाणचे मताधिक्य भाजपाला मिळूनही तो पक्ष सासष्टीचा फरक भरून काढू शकणार नाही. काणकोण, सांगे, सावर्डे, कुडचडे, मुरगाव अशा काही मतदारसंघांमध्ये भाजपाने चांगले कार्य करूनही ते सासष्टीतील फरक पुसून काढू शकणार नाहीत. शिवाय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने फोंडा तालुक्यात दिलेला हात काही प्रमाणात मताधिक्य वाढवायला काँग्रेसला मदत करणार आहे. खाणपट्टय़ातही काँग्रेसला किंचित लाभ होईल. या ख्रिस्ती पाठिंब्यामुळे गेली पाच वर्षे जे अक्षरश: विजनवासात गेले होते ते फ्रान्सिस सार्दिन यांना पुन्हा ‘राजयोग’ प्राप्त झाला तर नवल नाही.

(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )

Web Title: Lok Sabha Election 2019: Why is the focus of Sasashti taken?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.