भाजप उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांचे उमेदवारी अर्ज सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2024 09:56 AM2024-04-17T09:56:40+5:302024-04-17T09:57:05+5:30

मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे दोघेही दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांसोबत अर्ज भरताना उपस्थित होते.

lok sabha election 2024 show of strength by bjp candidates submission of nomination papers of shripad naik and pallavi dempo | भाजप उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांचे उमेदवारी अर्ज सादर

भाजप उमेदवारांचे शक्तिप्रदर्शन; श्रीपाद नाईक, पल्लवी धेंपे यांचे उमेदवारी अर्ज सादर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप उमेदवारांनी काल अर्ज भरताना जिल्हाधिकारी कार्यालयात मिरवणुकीने येऊन मोठे शक्तिप्रदर्शनच केले. पल्लवी धेपे व श्रीपाद नाईक यांनी अनुक्रमे दक्षिण आणि उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून आपापले उमेदवारी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे दोघेही दोन्ही ठिकाणच्या उमेदवारांसोबत अर्ज भरताना उपस्थित होते.

श्रीपाद नाईक यांनी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निर्वाचन अधिकारी स्नेहा गीत्ते त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. भाजप कार्यालयातून कार्यकर्त्यांसोबत मिरवणुकीने ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले. पणजी, ताळगाव, सांताक्रूझ तसेच उत्तरेतील अन्य ठिकाणचे भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महिला कार्यकर्त्याही मोठ्या संख्येने होत्या. पणजीतील सत्ताधारी नगरसेवक, ताळगावमधील बाबूशचे कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीपाद यांच्यासोबत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे, पशुसंवर्धन मंत्री नीळकंठ हळर्णकर, आमदार दिव्या राणे, रुडॉल्फ फर्नांडिस, जेनिफर मोन्सेरात, प्रवीण आर्लेकर तसेच इतर आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

दक्षिण गोव्यात पल्लवी धेंपे उमेदवारी भरताना त्यांच्यासोबत नागरी पुरवठामंत्री रवी नाईक, वीजमंत्री सुदिन ढवळीकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मडगाव येथे पल्लवी धेपे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, 'विरोधकांबाबत मला काही बोलायचे नाही. माझा प्रचार सकारात्मक पद्धतीने चालला आहे. काँग्रेसने त्यांच्या स्वतःच्या प्रश्नांमध्ये लक्ष घालावे.'

'... म्हणून उमेदवारी रामनवमीच्या पूर्वसंध्येला'

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भाजप उमेदवारांनी रामनवमीच्या पूर्वसंध्येला अर्ज भरण्याचा दिवस का निवडला ? असे विचारले असता ते म्हणाले की, 'रामनवमीला आम्हा सर्वांना मंदिरांमध्ये जायचे आहे. धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायचे आहे. म्हणून आमच्या उमेदवारांनी मंगळवारी अर्ज भरले. काँग्रेस हे काही मानत नाही. त्यांनी 'रामसेतू' सुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.'
 

Web Title: lok sabha election 2024 show of strength by bjp candidates submission of nomination papers of shripad naik and pallavi dempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.