दक्षिणेचा उमेदवार उद्या ठरणार! मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2024 11:36 AM2024-03-16T11:36:37+5:302024-03-16T11:37:58+5:30
पाच-सहा इच्छुक उमेदवारांची नावे यादीत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: येत्या १७ रोजी भाजपचा दक्षिण गोवा मतदारसंघातील उमेदवार दिल्लीत ठरणार आहे. कदाचित आम्हाला त्यानिमित्ताने दिल्लीत जावे लागेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल, शुक्रवारी रात्री पणजीत संपादकांशी झालेल्या संवाद बैठकीवेळी सांगितले.
दक्षिण गोव्यात महिला उमेदवार द्यावा, अशी सूचना आली. पण अजून निर्णय झालेला नाही. उमेदवार महिला किंवा पुरुष असला तरी भाजपला चिंतेचे कारणच नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. पूर्वीची तीन नावे आणि नंतरची काही नावे मिळून पाच ते सहा महत्त्वाची नावे आमच्याकडे इच्छुक उमेदवारांच्या यादीत आहेत. भाजप संसदीय समिती उद्या, दि. १७ किंवा १८ रोजी तिकिटाविषयी अंतिम निर्णय घेईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मी दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात जास्त फिरत आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपला जास्त मते मिळतात तिथे यावेळी मतदानाची टक्केवारी वाढावी, असा आमचा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
आमचा केवळ सासष्टी तालुक्यावर भर नाही तर पूर्ण दक्षिण गोव्यावर आहे. उत्तर गोव्यात मला जास्त प्रचार करण्याची गरज नाही. तिथे आमचे मंत्री व आमदार आहेतच, असे मुख्यमंत्री म्हणाले. दक्षिण गोव्यात भाजपने महिला की पुरुष उमेदवार द्यावा याचा अंतिम निर्णय १७ रोजी होईल. पूर्वीची तीन इच्छुक उमेदवारांची नावेही अजून यादीत कायम आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पोपना निमंत्रित करणार
जुने गोवे येथील सेंट झेवियर शवदर्शन सोहळा यंदा होईल. त्यासाठी मी आज बैठक घेतली. या सोहळ्याच्या आयोजनाबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार यंदा आम्ही या सोहळ्ळ्याला पोपना निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिली
तिकिटाविषयी शंका नव्हती : श्रीपाद नाईक
उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात मला यावेळीही तिकीट मिळाले. मला भाजपचे केंद्रीय नेते उमेदवारी देतील याविषयी मला शंका नव्हतीच. आमचे केंद्रीय नेते सूज्ञ आहेत, त्यांनी माझे काम पाहिले आहे, असे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.
माजी मंत्री पक्षात येणार
काही माजी मंत्री व माजी आमदार पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये फेरप्रवेश करू पाहत आहेत. त्यांच्या प्रवेशाचे कार्यक्रम यापुढील दिवसांत होतील, असेही मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.