अवघ्या 1.11 कोटीत आटोपली गोव्यातील लोकसभा निवडणूक?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 06:50 PM2019-04-26T18:50:34+5:302019-04-26T18:52:50+5:30
मडगाव - साधी पंचायत निवडणूक लढवायची झाल्यास लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च किती येत असेल याची ...
मडगाव - साधी पंचायत निवडणूक लढवायची झाल्यास लाखो रुपयांचा खर्च येतो. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीचा खर्च किती येत असेल याची कल्पना न केलेली बरी. मात्र निवडणूक आयोगाला जो खर्चाचा तपशील दिला जातो तो खरेच प्रत्यक्षात केलेला खर्च असतो का? कारण निवडणूक आयोगाकडून जी अधिकृत आकडेवारी मिळाली आहे त्यानुसार गोव्यातील दोन्ही मतदारसंघाच्या निवडणुका केवळ 1.11 कोटी रुपयांतच आटोपल्या गेल्या आहेत. प्रत्यक्षात उमेदवारांनी दिलेला खर्चाचा तपशील केवळ 58 लाखांच्या घरात आहे. मात्र निवडणूक आयोगाने केलेली खर्चाची बेरीज दुप्पट आहे.
दक्षिण गोवा मतदारसंघात आतार्पयत जो खर्चाचा तपशील दिला आहे त्यात सर्वात जास्त खर्च आम आदमी पक्षाचे एल्वीस गोमीस यांनी केला असून त्यांनी 10.93 लाख रुपये खर्च दाखविला आहे. मात्र त्यांच्या झालेल्या सभा लक्षात धरुन हा खर्च 17 लाख होत असल्याचे आयोगाच्या खर्च निरीक्षकांनी म्हटले आहे.
भाजपाचे विद्यमान खासदार नरेंद्र सावईकर यांनी सादर केलेला खर्चाचा तपशील केवळ 1.05 लाख एवढा असून प्रत्यक्षात त्यांचा खर्च 36 लाखांच्या आसपास असू शकतो असे आयोगाच्या निरीक्षकांचे म्हणणे आहे. काँग्रेसचे फ्रान्सिस सार्दिन यांनी सादर केलेला खर्च 6.43 लाख असून प्रत्यक्षात त्यांना 15 लाख खर्च आला असल्याचा निरीक्षकांचा दावा आहे. शिवसेनेच्या राखी नाईक यांनी खर्चाचा तपशील दाखविला आहे तो साडेतीन लाख असून त्यांचा प्रत्यक्षातील खर्च साडेसात लाख अपेक्षित आहे. दोन अपक्ष उमेदवार कालिदास वायंगणकर आणि मयूर काणकोणकर यांनी सादर केलेला खर्च 83 हजार एवढा असून निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांच्या मते हा खर्च 47 हजार एवढाच आहे. एकूण सहा उमेदवारांनी जो खर्चाचा तपशील आतार्पयत दिला आहे तो 22.72 लाख एवढा असून आयोगाच्या निरीक्षकांप्रमाणे प्रत्यक्षातील हा खर्च 75.97 लाख एवढा असेल.
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी सादर केलेला खर्चाचा तपशील 18.07 लाख एवढा आहे. काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांचा 12.84 लाख, आपचे प्रदीप पाडगावकर यांचा खर्च 3.41 लाख, रिपाईचे अमीत कोरगावकर यांचा खर्च 43 हजार तर अपक्ष उमेदवार ऐश्र्वर्या साळगावकर यांचा खर्च 38 हजार तर सदानंद कामत यांचा खर्च 25 हजार एवढाच दाखविण्यात आला आहे.