राष्ट्रासाठी जीवन समर्पण करणारे लोकमान्य टिळक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2024 12:21 PM2024-08-01T12:21:01+5:302024-08-01T12:21:15+5:30
'लोकमान्य' पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाची १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध मिळतो.
संकलक : डॉ. मनोज सोलंकी
इंग्रजांचे वर्चस्व असताना भारतभूमीच्या उद्धारासाठी अहर्निश चिंता वाहणारी आणि तन, मन, धन उद्धारकार्यास अर्पण करणारी काही नररत्ने होऊन गेली. त्यापैकी एक देदीप्यमान रत्न म्हणजे बाळ गंगाधर टिळक. 'भारताच्या नरसिंहाने' आपले ऐन तारुण्य स्वार्थत्यागपूर्वक राष्ट्राकरिता वाहून देशात नवजागृती निर्माण केली. 'लोकमान्य' पदवी प्राप्त झालेल्या ध्येयवादी व्यक्तिमत्त्वाची १ ऑगस्ट रोजी पुण्यतिथी. त्यांच्या जीवनचरित्रातून आपल्याला नेहमीच बोध मिळतो.
प्रत्येक भारतीयास त्याच्या पारतंत्र्याचे स्वरूप समजावून सांगण्यासाठी, लोकांना संघटित करून वर्तमान स्थितीचे भान आणि कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी टिळकांनी 'केसरी' आणि मराठा' ही नियतकालिके सुरू केली. काही दिवसांतच ती लोकप्रिय झाली. आपल्या अधिकारांसाठी लढायला भारतीयांना सिद्ध केले जात होते. त्यांच्या भाषेत एवढे सामर्थ्य होते की, भ्याड व्यक्तीच्या ठायीही स्वातंत्र्याची लालसा निर्माण व्हावी. 'केसरी'ने इंग्रज सरकारच्या कित्येक अन्यायकारी गोष्टी उजेडात आणल्या. त्यामुळे शासनाने 'केसरी'ला न्यायालयात खेचले आणि परिणामी टिळक व आगरकरांना ४ मास सश्रम कारावासाची शिक्षा झाली.
१८९० ते १८९७ ही सात वर्षे त्यांच्या आयुष्यात फार महत्त्वाची ठरली. सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी शासनाविरुद्ध लढाईच सुरू केली. बालविवाहाला प्रतिबंध आणि विधवाविवाहाला संमती मिळावी म्हणून सर्वांना आवाहन केले. गणेशोत्सव आणि शिवजन्मोत्सव या माध्यमांद्वारे लोकांना संघटित केले.
१८९६ मध्ये भारतात दुष्काळ व प्लेगची महामारी पसरली. संपादकीय लेखातून दुष्काळ आणि महामारीत बळी पडलेल्या लोकांच्या संख्येचे आकडे निर्भयपणे प्रसिद्ध केले. शासनाकडून साहाय्य मागण्याचा आपला अधिकार असून, त्यासंबंधी योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी जनतेला सतर्क केले; पण, शासन व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाच्या हीरक जयंती महोत्सवाची सिद्धता करण्यात गुंग होते. शेवटी महामारीवरच्या नियंत्रणासाठी रेंड नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली; पण, रैंड महामारीपेक्षाही भयानक ठरला. भारतीय जनतेवर अत्याचार करण्यात त्याने कुठेही कसूर ठेवली नाही. शेवटी चाफेकर बंधूनी त्याला गोळी घालून ठार केले. पण, 'या हत्येमागे टिळकांचा हात असावा' या संशयाने टिळकांना कारागृहात डांबण्यात आले.
स्वदेशाविषयी प्रेम आणि पारतंत्र्याविषयी असंतोष निर्माण करण्याची क्रांती टिळकांनी केली. या सर्व कारवायांनी इंग्रज शासन चिडले आणि टिळकांवर खोटेनाटे आरोप लादून त्यांना बेड्या ठोकल्या. न्यायालयात १४ वर्षांपर्यंत टिळक लढले. जनतेचा आवेश न्यून व्हावा; म्हणून शासनाने अत्यंत कठोर आणि निर्दय उपाय योजले. या दुष्ट कृत्यांमुळे टिळकांचे रक्त तापले आणि 'देशाचे दुर्भाग्य' या मथळ्याखाली त्यांनी केसरीत लेख लिहिला. 'देशात बॉम्बची निर्मिती होणे, हे देशाचे दुर्दैव होय; परंतु, ते सिद्ध करून फेकण्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यास शासनच उत्तरदायी आहे.' त्यांच्या या जहाल लिखाणामुळे शासनाची पक्की निश्चिती झाली की, जोपर्यंत टिळक मोकळे आहेत, तोवर शासनाला धोका आहे.
या लेखाविषयी देशद्रोहाचा आरोप लावून १९०८ मध्ये मुंबईत त्यांना पकडण्यात आले आणि ६ वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यावेळी टिळक ५२ वर्षांचे होते. यावेळी त्यांना मधुमेहाचा विकार जडला. ब्रह्मदेशातील मंडालेच्या कारागृहात त्यांची रवानगी झाली. तिथे टिळकांची लहानशी लाकडी फळ्यांची खोली होती. सश्रम कारावासातून साधा कारावास अशी शिक्षेत घट करण्यात आली. लेखन-वाचनाची सवलत मिळाली. इथेच त्यांनी 'गीतारहस्य' ग्रंथ लिहिला. ६ वर्षांचा कारावास संपेपर्यंत त्यांनी ४०० पुस्तकांचा संग्रह केला.
'स्वयंशिक्षक' मार्गदर्शिकांचा उपयोग करून त्यांनी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे ज्ञान संपादन केले. कारावासात असतानाच त्यांची पत्नी सत्यभामाबाई यांचा भारतात मृत्यू झाला. शरीर थकलेले असतानाही टिळकांचा लोकजागृतीसाठी सतत प्रवास, व्याख्याने हा कार्यक्रम सुरूच होता. जुलै १९२० मध्ये त्यांची प्रकृती खालावली. १ ऑगस्टच्या प्रथम प्रहरी त्यांचा जीवनदीप मालवला. आपल्या प्रत्येक कृतीतून जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत देशाकरिता लढत राहिलेल्या जाज्वल्य, ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला विनम्र अभिवादन!