लोकमत गोवा स्टार्टअप अॅण्ड टुरिझम अवॉर्ड्स सोहळा; 'स्टार्टअप' यशस्वी करणाऱ्या ११ उद्योजकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 07:25 AM2024-10-29T07:25:15+5:302024-10-29T07:26:00+5:30
राज्य सरकारचे पर्यटन खाते तसेच माहिती व तंत्रज्ञान खात्याने हा सोहळा पुरस्कृत केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : लोकमतगोवा स्टार्टअप अॅण्ड टुरिझम अवॉर्ड सोहळा रविवारी पणजीत उत्साहात झाला. विविध क्षेत्रांत स्टार्टअप सुरू केलेल्या ११ गोमंतकीय उद्योजकांचा सन्मान माहिती व तंत्रज्ञान तथा पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या हस्ते झाला. राज्य सरकारचे पर्यटन खाते तसेच माहिती व तंत्रज्ञान खात्याने हा सोहळा पुरस्कृत केला होता.
यावेळी माहिती व तंत्रज्ञान महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण वळवटकर, पर्यटन मंत्र्यांचे ओएसडी शॉन मेंडिस व स्टार्टअप व आयटी प्रमोशन सेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एस. प्रशांत, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते, संपादक सदगुरू पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
गोमंतकीयांच्या उद्योग कौशल्याचा सन्मान करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, यासाठी लोकमत गोवाने प्रथमच स्टार्टअप अॅण्ड टुरिझम अवॉर्ड दिले आहेत. पर्यटन वाढीसाठी नवनवीन संधी शोधणे, त्यासाठीचे कौशल्य विकसित करणे, कौशल्य विकासाला तंत्रज्ञानाची जोड देणे अशा हेतूने गोव्यात स्टार्टअप सुरू झाले व अनेक स्टार्टअप यशस्वीही झाले. लोकमतने याची दखल घेतली. युवा उद्योजकांना प्रोत्साहन देणे या हेतूने हे अवॉर्ड रविवारी देण्यात आले.
यात उत्कृष्ट टुरिझम स्टार्टअप अवॉर्ड वनबोर्डचे रायन प्रेझीस, उत्कृष्ट क्रिएटिव्ह इन हिंटरलँड टुरिझम अवॉर्ड द लोकल बीटचे मॅकाईल बार्रेटो, उत्कृष्ट क्रिएटिव्ह इको टुरिझम अवॉर्ड मृगया एक्सपीडिशन्सचे पराग रांगणेकर, उत्कृष्ट इमर्जिंग स्टार्टअप अवॉर्ड स्पॅशल क्राफ्टचे मेकॉल आफोंसो, उत्कृष्ट इमर्जिंग स्टार्टअप अवॉर्ड द ट्रॅश को.चे राजय रासईकर, उत्कृष्ट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप अवॉर्ड एसएमडी पॉवर सोल्युशन प्रा. लि. चे विश्वेश भट, उत्कृष्ट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप अवॉर्ड डियागोप्रेयुटिक प्रा. लि.चे डॉ. रोशन नाईक, उत्कृष्ट महिला स्टार्टअप अवॉर्ड एसर सोल्युशनच्या सुनयना शिरोडकर, उत्कृष्ट इनोव्हेटिव्ह स्टार्टअप अवॉर्ड मेक इट हॅपनच्या रोहिणी गोन्साल्विस, उत्कृष्ट महिला स्टार्टअप अवॉर्ड सेवारत हेल्थकेअर अॅण्ड नर्सिंग प्रा. लि.च्या मारिया विट्टो यांना प्रदान झाला. २०२४ सालचा उत्कृष्ट गोवा स्टार्टअप अवॉर्ड स्पिंटली इंडिया प्रा. लि.चे माल्कम डिसोझा यांना मिळाला.
गोवा स्टार्टअप अॅण्ड टुरिझम अवॉर्डच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या डीएनए गोवाचे अधिकारी गंधार महाजन, प्राईम टीव्हीचे संदीप केरकर व मंत्री खंवटे यांचे मीडिया सल्लागार सागर अग्नी यांचा सन्मान झाला. सूत्रसंचालन अक्षय वळवईकर यांनी केले. प्रास्ताविक वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते यांनी केले. वरिष्ठ सहायक संपादक मयुरेश वाटवे यांनी आभार मानले.
२५० हून अधिक स्टार्टअप मंजूर
यावेळी मंत्री खंवटे म्हणाले, की राज्यातील अनेक तरुण स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात उतरले आहेत. राज्य माहिती व तंत्रज्ञान खात्याने २५० हून अधिक स्टार्टअप मंजूर केले आहेत. स्टार्टअपना तंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. सरकार महिला उद्योजकांनाही अनुदान, योजना, निधीच्या मार्फत प्रोत्साहन देत आहे.
सात दिवसांत मिळते व्यावसायिकांना परवानगी
राज्य सरकारने होम स्टे धोरण आणले. याद्वारे या क्षेत्रातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन मिळत आहे. पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिकांना परवानग्या मिळवण्यासाठी धावपळ करावी लागू नये यासाठी पर्यटन खाते केवळ सात दिवसांत परवानगी देते. सरकार गोमंतकीयांच्या कौशल्य, बुद्धिमत्ते योग्य व्यासपीठ व प्रोत्साहन देत आहे.