'लोकमत'च्या योगदानाचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2024 11:49 AM2024-02-29T11:49:43+5:302024-02-29T11:49:53+5:30
लोकमत 'गोवन ऑफ द इयर २०२४' पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात; उद्योगपती अनिल खंवटे 'गोवन ऑफ द इयर' ने सन्मानित, दिव्या राणे यांना एमर्जिंग पॉलिटिशियन पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: 'लोकमत'ने गोव्याच्या पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शहराबरोबर ग्रामीण भागातील प्रत्येक घडामोडीवर लोकमतची नजर असते म्हणून आज प्रत्येक गोमंतकीयाच्या आवडीचे वृत्तपत्र बनले आहे, वैचारिक स्पष्टता व सामाजिक भान लोकमतने जपले आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सांवत यांनी काढले.
उत्साह आणि चैतन्याने भारलेल्या वातावरणात तब्बल तीन तास डोळ्यांचे पारणे फेडणारा लोकमत 'गोवन ऑफ द इयर २०२४' पुरस्कार वितरणाचा दिमाखदार सोहळा काल, बुधवारी पार पडला. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यात असामान्य कर्तुत्वातून यशाची शिखरे गाठलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व उद्योजक अनिल खंवटे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
येथील पंचतारांकित मेरियॉट हॉटेलमध्ये झालेल्या या शानदार सोहळ्याला व्यासपीठावर आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप, खासदार फ्रान्सिस सार्दिन, माजी मुख्यमंत्री लुइझिन फालेरो, सौ. सुलक्षणा सावंत, लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांच्यासह लोकमतचे गोवा आवृत्तीचे निवासी संपादक सद्गुरु पाटील, वरिष्ठ महाव्यवस्थापक संदिप गुप्ते उपस्थित होते.
नामांकने जाहीर होत होती तेव्हा पुरस्कार कोणाला मिळणार याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढत होती. वेगवेगळ्या वर्गवारीत नामांकने जाहीर करून वाचकांची मते मागविण्यात आली होती. पोलिस खाते, प्रशासन, आरोग्य, पर्यावरण, फलोत्पादन, क्रीडा, कला व संस्कृती या क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान गोमंतकीयांना पुरस्कार देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात पाच नामांकने लोकमतने जाहीर केली होती व वाचकांकडून एसएमएसव्दारे मते मागवली होती.
या सोहळ्याला गोवा सरकारचे माहिती आणि प्रसिद्धी खाते आणि पर्यटन विभागाचे सहकार्य लाभले. राजकीय, साहित्य, उद्योग, शिक्षण आदी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर तसेच वाचकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजेरी लावली. आभार लोकमचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते यांनी मानले.
सोहळ्यात सुरुवातीलाच 'गोवा व्हिजन २०५०' हे चर्चासत्र झाले. त्यात उद्योगपती श्रीनिवास थेंपो, शेखर सरदेसाई, शांतनू शेवडे, शांताकुमार यांनी भाग घेतला. मॉडरेटर म्हणून उद्योजक नितीन कुंकळयेकर यांनी काम पाहिले.
उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून एफडीएच्या संचालिका ज्योती सरदेसाई, आरोग्य क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल डॉ. मधुमोहन प्रभूदेसाई, पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल रमेश गांवस, फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबद्दल विठ्ठल खांडेपारकर, क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुयश प्रभूदेसाई, कला व संस्कृती क्षेत्रातील कार्याबद्दल राजदीप नाईक, कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून उपाधीक्षक जिवबा दळवी तर स्टार्ट अप वर्गवारीत गौतमी रायकर (कॉण्ट्रॅक्टझी) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
बेस्ट लेजिस्लेटर म्हणून विरोधी पक्षनेते युरी आलेमांव, एमर्जिंग पॉलिटिशिअन म्हणून विधानसभेत प्रथमच निवडून आलेल्या पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांचा गौरव करण्यात आला. वरिष्ठ कार्यक्षम आयपीएस अधिकारी म्हणून डीजीपी डॉ. जसपाल सिंग, कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेकर यांनाही गौरविण्यात आले. पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल हेराल्ड पब्लिकेशनचे मालक, संपादक राउल फर्नाडिस यांना गौरवण्यात आले. राउल यांच्यावतीने 'ओ हेराल्ड' या इंग्रजी दैनिकाचे संपादक सुजय गुप्ता यांनी पुरस्कार स्वीकारला.
गोवा 'हेल्थ हब' व्हावा : विजय दर्डा
लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा म्हणाले की, आरोग्याच्या अधिकाधिक सुविधा निर्माण होऊन गोवा हेल्थ हय व्हावा. फुटबॉलसारख्या खेळामध्ये गोव्याची वेगळी ओळख आहे. क्रीडा क्षेत्रातही गोवा चमकावा. गोव्याचे लोक अत्यंत जागरुक आहेत. ही जागरुकता कायम राहावी. या राज्यात बिगर प्रदूषणकारी उद्योग यावेत, कारण विदर्भामध्ये कारखान्यांनी किती प्रदूषण केले आणि सरकार काहीच करू शकत नाही, है आम्ही महाराष्ट्रात पाहात आहोत, गोव्यात पर्यटकांची संख्या वाढावी यासाठी व्हिसा, इमिग्रेशनच्या धोरणावर सरकारने विचार करावा, सिंगापूरच्या गोष्ठी आम्ही करतो तेव्हा येथील वाहतूक व्यवस्था, दळणवळण सुविधा सुधारल्या पाहिजेत. येथील किनाऱ्यांची स्थिती पाहतो तेव्हा वाईट वाटते, असेही ते म्हणाले, अल्पावधीत गोवेकरांनी 'लोकमत'ला आपलेसे केल्याबद्दल आभार मानताना डॉ. दर्डा म्हणाले की, २००९ साली लोकमत गोव्यात आल्यापासून गोवेकरांचे प्रेम आम्हाला मिळाले. आमचे धोरण स्पष्ट आहे. 'लोकमत' ने केवळ गोव्याचाच विचार केला. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाला नव्हे, तर वाचकांना बांधील राहिलो. राज्यात शास्वत विकास व गरिबांपर्यंत योजना पोहोचाव्यात हे पाहिले,
गोवा व्हिजन २०५०'चे डॉक्युमेंट सरकारला मार्गदर्शक ठरेल : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, 'लोकमत'ने घडवून आणलेल्या 'गोवा व्हिजन २०५० चर्चासत्राचे डॉक्यूमेंट सरकारला द्यावे. कृषी, आयटी, लॉजिस्टिक क्षेत्रासाठी सरकार त्याचा उपयोग करील, सरकार 'विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट ठेवून काम करत आहे. लोकमतने व्हिजन २०५०० चर्चासत्र घडवून आणून फार मोठे काम केले आहे, नारी शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती व गरीब कल्याण या चार सूत्रांवर विकासाच्या योजना सरकार आखत असल्याचे ते म्हणाले, लोकमतने गोव्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे लोक 'कुजबुज सदर आधी वाचतात, लोकमतच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजन नेटके, वैचारिक स्पष्टता व सामाजिक भान असलेले असते. गोव्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही मी लोकमतच्या कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थित राहतो. लोकमतने पुरस्कार दिलेल्यांची जबादारी आता आणखी वाढली आहे. त्यांनी आणखी नेटाने काम करावे. प्रगतशील शेतकरी संजय पाटील यांना अलीकडेच मिळालेल्या पद्मश्री किताबाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की, गोवा आता केवळ पर्यटनातच नव्हे तर शेतीतही प्रगती करीत आहे.
दिवंगत बंधूला पुरस्कार अर्पण : अनिल खंवटे
पुरस्कारानंतर उद्योगपती अनिल खंवटे म्हणाले की, 'लोकमत चा हा पुरस्कार स्वीकारताना डॉ. प्रेमानंद रामाणी, ज्युलिओ रिबेलो यांच्या पंगतीत बसल्याचा आनंद मला होत आहे. हा पुरस्कार मी माझे दिवंगत बंधू जयराम खंवटे यांना अर्पण करतो. माझ्या जडणघडणीत माझे थोरले बंधू जयराम यांचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी ही भरारी घेऊ शकलो, लोकमतचा हा पुरस्कार स्वीकारताना मला अभिमान वाटत आहे. व्हिजन गोवा २०५а चर्चासत्र ऐकले, गोव्यात उद्योगांसाठी भरपूर वाव आहे, असे खंवटे म्हणाले, हा पुरस्कार माझी वैयक्तिक उपलब्धी नव्हे तर सामूहिक प्रयत्नांचा एक भाग आहे. उद्योग, शिक्षण, अध्यात्मिक तसेच इतर कार्याची घेतलेली दखल उल्लेखनीय आहे.
असे होते परीक्षक मंडळ
पुरस्कारांसाठीची निवड माजी केंद्रीय कायदामंत्री अॅड. रमाकांत खलप याच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण अभ्यासक राजेंद्र फेरकर, राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर, लोकवेदाचे अभ्यासक आणि थॉमस स्टीफन्स कोकणी केंद्राचे संचालक डॉ. पांडुरंग फळदेसाई, उद्योजक संजय शेट्ये, लोकमतचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संदीप गुप्ते. लोकमतचे निवासी संपादक सद्गुरू पाटील या परीक्षक मंडळाने केली.