दुचाकी भाड्याने देणा-यांकडून गोव्यात पर्यटकांची लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 08:02 PM2017-12-11T20:02:41+5:302017-12-11T20:02:59+5:30
पणजी : राज्यात दुचाकी भाड्याने घेऊन भटकंती करणा-या पर्यटकांची संख्या वाढली असून, राजधानी पणजीत एका दिवसासाठी तिनशे रुपये भाडे घेणारे आता त्या जागी दुप्पट भाडे आकारत आहेत.
विलास ओहाळ
पणजी : राज्यात दुचाकी भाड्याने घेऊन भटकंती करणा-या पर्यटकांची संख्या वाढली असून, राजधानी पणजीत एका दिवसासाठी तिनशे रुपये भाडे घेणारे आता त्या जागी दुप्पट भाडे आकारत आहेत. काळ्या-पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेटच्या दुचाक्यांच्या बरोबर आता काळ्या-पांढ-या रंगाच्याही दुचाक्याही भाड्याने दिल्या जात आहे. या गोरखधंद्याला कोणतीही आडकाठी येत नसल्याने ही लूट वर्षाअखेरीपर्यंत कायम राहील, असे दिसते.
दोघा जणांना किंवा चार जणांना चारचाकी वाहने घेऊन परवडत नाही. त्यामुळे महिलांसह पुरुषवर्ग दुचाक्या भाड्याने घेणे पसंत करतात. पणजीत सध्या काळ्या-पिवळ्या रंगाच्या दुचाक्या मिळणे अवघड झाले आहे. हंगाम नसल्यास एका दिवसाला तिनशे रुपये भाडे आकारले जाते. मात्र, डिसेंबर आणि एप्रिल-मे हे महिने दुचाक्या भाड्याने देणा-यांसाठी सुवर्णकाळ मानला जातो. पर्यटकांची गैरसोय आणि गरज लक्षात घेऊन ही लूट चाललेली दिसते.
याबाबत दुचाकी भाड्याने देणा-या मार्केट परिसरातील एका आस्थापनाच्या मालकास विचारल्यानंतर त्याने सांगितले की, दुचाक्या अगोदरच आरक्षित झालेल्या आहेत, त्यामुळे सध्या त्या मिळणे अवघड आहे. अगदीच एखाद्याला गरज असेल, तर काहीतरी करून पांढ-या-काळ्या (खासगी नोंदणीचे वाहन) रंगाच्या नंबरप्लेटची दुचाकी मिळवून देतो. हंगाम असल्याने सर्वत्र दिवसाला सहाशे रुपयचे घेतात, कोणीही दर कमी करत नाही. एवढाच हंगाम आहे. अजून पंधरा-वीस दिवस वर्षाअखेरीस आहे, हे दर अजून वाढतील अशी शक्यता आहे.
राज्यात काळ्या -पिवळ्या रंगाच्या नंबरप्लेटच्या दुचाक्यांना परवाना देण्याचे 2007 मध्ये बंद झाले आहे. त्यामुळे अनेकांना दुचाक्यांची संख्या वाढविण्याची इच्छा असूनही वाढविता येत नाही. पण खागसी दुचाक्या भाड्याने देण्यास त्यांना वाहने सहज उपलब्ध होतात. ज्यांच्याकडे दहा-पंधरा वर्षांपूर्वीची आहेत, ते लोक अशा दुचाकी भाड्याने देणा-यांना सुट्टीच्या दिवशी वाहन देतात. येणा-या भाड्यातील निम्मी रक्कम मालकाला आणि निम्मी रक्कम व्यावसायिकाला, असा व्यवहार चालत असल्याने ज्याची दुचाकी आहे त्याला फोन केला की ती दुचाकी काही वेळात उपलब्ध होते. गोवा राज्यात नोंदणी झालेले वाहन असल्याने वाहतूक पोलीसही अशी वाहने आडवत नाहीत.
अगदीच नो-पार्किंग, वन-वेचा नियम मोडला तर मात्र पोलीस दंड आकारतात. जे लोक शहरात दुचाक्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात, त्यांच्याच दुचाक्या ठेवण्यासाठी त्यांची स्वत:ची पार्किंग व्यवस्था नाही. या दुचाकीवाल्यांचा अनेकदा महानगरपालिकेत विषय आलेला आहे. पण ठोस काही कार्यवाही झालेली नाही. एका-एका व्यावसायिकांच्या आठ ते दहा दुचाक्या आहेत. त्यामुळे त्या दुचाक्या हे व्यावसायिक आपल्या आस्थापनाच्या समोरील रस्त्यावर बिनदक्तपणो लावतात. या पार्किग केलेल्या दुचाक्यांमुळे अनेकदा गरज असेल्या दुचाकीधारकांना पार्किगसाठी जागा मिळत नाही.
किनारी भागात वाट्टेल ते भाडे!
पर्यटनासाठी गोव्यात येणारा पर्यटक हा किना-यांना भेट दिल्याशिवाय जात नाही. त्यामुळे दुचाक्या भाड्यानं घ्यायची आणि समुद्र किना-यांची भटकंती करावयाची. कळंगुट येथील व्यावसायिकही सध्या दुचाक्यांसाठी मनाला वाट्टेल ते भाडे आकारतात. दुचाकी भाड्याने देणा-या एका व्यावसायिकाला याबाबत संपर्क साधल्यानंतर त्याने त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. त्यामुळे राजधानीत एका दिवसासाठी दुचाकीला दुप्पट भाडे आकारले जात असले, तरी किनारी भागात विदेशी आणि देशी पर्यटकांकडून किती भाडे आकारले जात असावे, याचा नुसता अंदाज बांधता येईल.