मनुष्यबळातील महिलांचा कमी सहभाग चिंताजनक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधानसभेत भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:36 AM2023-08-24T10:36:04+5:302023-08-24T10:36:52+5:30

विविध मुद्यांना स्पर्श

low participation of women in the workforce is alarming said president draupadi murmu in goa assembly | मनुष्यबळातील महिलांचा कमी सहभाग चिंताजनक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधानसभेत भाषण

मनुष्यबळातील महिलांचा कमी सहभाग चिंताजनक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधानसभेत भाषण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: गोव्यात महिला लोकप्रतिनिधी व महिला कामगारांची संख्या कमी असल्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चिंता व्यक्त करीत हे चित्र बदलले पाहिजे, असे प्रतिपादन केले. महामहीम राष्ट्रपतींनी गोवा विधानसभेच्या विशेष अधिवेशनात आमदारांना संबोधले. मुर्मू म्हणाल्या की, मनुष्यबळाच्या बाबतीत तसेच विधानसभेत मला महिलांचे प्रमाण कमी दिसले. सार्वजनिक जीवनात महिलांचा अधिकाधिक सहभाग दिसायला हवा.

राष्ट्रपती म्हणाल्या की, मुक्तीनंतर गोव्याने अभूतपूर्व प्रगती केली. गोवा खनिजाच्या बाबतीत समृद्ध आहे. मँगनिझ, बॉक्साइट साठे येथे मोठ्या प्रमाणात आहेत. पर्यावरण सांभाळून खाण व्यवसाय व्हावा. तसेच त्या पुढे म्हणाल्या की, फार्मा, बायोटेक्नॉलॉजी व आयटी क्षेत्रात गोव्याची कामगिरी चांगली आहे. औषध निर्यातीत देशभरात गोव्याचा चौथा क्रमांक लागतो. एकूण निर्यातीच्या दहा टक्के औषध निर्यात गोव्यातून होते ही वाखाणण्याजोगी गोष्ट आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, विकसित भारत २०४७ साठी गोवा सर्वतोपरी सहकार्य करील. अंत्योदय तत्त्वावर काम सुरू आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीत आघाडीवर आहे. कोडिंग व रोबोटिक अभ्यासक्रम सुरू केला.

सभापती रमेश तवडकर यांचेही याप्रसंगी भाषण झाले. आमदार विजय सरदेसाई, संकल्प आमोणकर, रुडॉल्फ फर्नांडिस विधानसभेत अनुपस्थित राहिले. गॅलरीत केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, माजी आमदार सिध्दार्थ कुंकळ्येंकर, दामू नाईक, धर्मा चोडणकर, म्हापसा नगराध्यक्ष प्रिया मिशाळ उपस्थित होते.

गोव्याच्या विकासात ग्रामीण भागाचे वर्चस्व राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई म्हणाले की, गोव्यात सर्वच क्षेत्रात ग्रामीण भागाचे वर्चस्व दिसून येते. गोव्याचे विधानसभा संकुल, सचिवालय, हायकोर्ट इमारत, राजभवन, विद्यापीठ सर्वकाही ग्रामीण क्षेत्रात आहे. गोव्याच्या सर्वांगीण विकासात ग्रामीण भागाचे वर्चस्व आहे.

'विधिमंडळ सदस्यांनी सभ्यतेने वागले पाहिजे'

राष्ट्रपती म्हणाल्या की, गोवा विधानसभेने वेळोवेळी जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. विधानसभा अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण केले जाते ही चांगली बाब आहे. सभागृहात विधिमंडळ सदस्यांचे व्यवहार सभ्यतेचे असायला हवेत. आपला लोकप्रतिनिधी कसा वागतो, याकडे मतदारांचे लक्ष असते.'

 


 

Web Title: low participation of women in the workforce is alarming said president draupadi murmu in goa assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.