लुबानचा गोव्यातील शॅकवाल्यांना तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 06:22 PM2018-10-10T18:22:54+5:302018-10-10T18:26:05+5:30
समुद्री पाण्याची पातळी वाढल्याने दक्षिण गोव्यातील किनारी भागात शॅकमध्ये घुसले. पाणी लाखोंची नुकसानी, पर्यटन मौसमाच्या सुरुवातीलाच वादळी तडाख्याने व्यावसायिक कोलमडले.
मडगाव - अरबी समुद्रात आलेल्या लुबान वादळाचा फटका गोव्यातील शॅक व्यावसायिकांना बसला असून या वादळामुळे समुद्रात लाटा वाढल्याने समुद्राचे पाणी शॅकमध्ये घुसल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दक्षिण गोव्यात कोलवा, माजोर्डा, बेताळभाटी आणि बाणावली या किना-यांवर हा फटका अधिक बसला आहे. मंगळवारी रात्री पाण्याची पातळी वाढल्याने शॅकमध्ये पाणी घुसले होते. बुधवारीही कित्येक शॅक पाण्याखालीच असल्याचे दिसून येत होते. गोव्यात पर्यटन मौसम सुरू होऊन एक आठवडा झालेला असतानाच या वादळाचा तडाखा बसल्याने शॅकवाले सुरुवातीलाच हवालदील बनले आहेत. बुधवारी कित्येक शॅकवाले आपल्या बेडस् व इतर सामान सुरक्षित ठिकाणी हलविताना दिसत होते. सध्या गोव्यात अजूनही शॅक उभारणीचे काम चालू आहे. तर काही ठिकाणी शॅक उभे करण्यात आले आहेत. जे शॅक उभारले होते त्या शॅक मालकांचीही मंगळवारी पळापळ उडाली होती. मागच्या वर्षी आलेल्या वादळात गोव्यातील शॅकवाल्यांना असाच फटका बसला होता.
समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक झालेल्या वाढीचा मोठा फटका सासष्टीतील कोलवा ते बेताळभाटी-माजोर्डा-उतोर्डा पट्ट्यात सुरू असलेल्या शॅकांच्या उभारणीवर झालेला दिसत होता तर स्थानिकांनी सरकारने शॅकांना जागा आखून देताना अधिक काळजी घेण्याची गरज यावेळी काहीजणांनी व्यक्त केली. या भागात अनेक शॅकांचे काम सुरू होते. त्यांना या निसर्गाच्या प्रकोपाचा फटका बसला आहे. त्यांचे स्टँड, शॅक उभारणीसाठी आणलेल्या लाकडी फळ्या या पाण्यात वाहून गेल्या व नुकसान तर झालेच पण शॅक उभारणीत आणखी विलंब होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटन खात्याने शॅकांचे परवाने देण्यापूर्वी या समुद्र किना-याची कोणतीच पाहणी केली नाही व समुद्राच्या पाण्याच्या पातळीलगत त्यांच्या उभारणीसाठी जागा आखून दिली व तेथे ते उभारण्याचे काम सुरु असतानाच समुद्राला उधाण येऊन हा प्रकार घडला. तो चिंतेचा असून अशा प्रकारे शॅकांत जर समुद्राचे पाणी घुसले व त्याचा त्रस विदेशी पर्यटकांना झाला तर त्यांतून येथील पर्यटनाबाबत चुकीचे संदेश विदेशात जाण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.