फालेरोंच्या पराभवानंतरच आलेख चढला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 07:22 PM2018-08-22T19:22:54+5:302018-08-22T19:23:20+5:30
माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला.
पणजी - माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो यांचा 2007 सालच्या विधानसभा निवडणुकीवेळी नावेली मतदारसंघात पराभव झाला. फालेरो यांची राजकीय कारकिर्द आता संपली असा निष्कर्ष त्यावेळी काँग्रेसमधील व काँग्रेसबाहेरील त्यांच्या विरोधकांनीही काढला होता, पण प्रत्यक्षात त्या पराभवानंतरच फालेरो यांचा राजकीय आलेख उंचावत गेला. आता पुन्हा फालेरो यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीसपद आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद प्राप्त झाल्याने फालेरो यांचे विरोधक गारद झाले आहेत. फालेरो यांची राजकीय उंची गोव्यातील काँग्रेसमध्ये वाढली आहे.
फालेरो यांचा पराभव 2007 साली चर्चिल आलेमाव यांनी केला होता. आलेमाव यांनी त्यावेळी सेव्ह गोवा पक्ष स्थापन करून त्या पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. 1999 साली दोनवेळा मुख्यमंत्रीपद आणि अनेक वर्षे गोव्यात मंत्रीपद भुषविलेल्या फालेरो यांच्या हाती 2007 सालच्या पराभवानंतर त्यावेळी काहीच शिल्लक राहिले नव्हते. आलेमाव यांनी नावेली काबिज केले होते व त्यामुळे फालेरो यांना काँग्रेसच्या त्यावेळच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीसपद दिले होते. शिवाय ईशान्येकडील सात राज्यांचे प्रभारीपद दिले होते. सात वर्षे फालेरो यांचा गोव्याशी राजकीयदृष्टय़ा मोठा संबंध राहिला नव्हता. फालेरो व आलेमाव यांच्यातील राजकीय शत्रूत्व खूप वाढले होते. आलेमाव यांनी आपल्या सेव्ह गोवा पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून व दिगंबर कामत सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून स्थान मिळविल्यानंतर फालेरो यांच्या जखमांवर मिठ चोळले गेले होते. 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या काळात फालेरो यांना गोवा प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून गोव्यात पाठवले गेले होते. काँग्रेसला त्या निवडणुकीत 16 जागा जिंकता आल्या. विशेष म्हणजे फालेरो यांनी 2क्क्7 साली स्वत: नावेली मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते जिंकूनही आले. या उलट आलेमाव यांचा 2012 च्या निवडणुकीत नावेलीत पराभव झाला होता. आवेर्तान फुर्तादो यांनी नावेलीत चर्चिलला पराभूत केले होते. चर्चिलला 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे तिकीट हवे होते पण काँग्रेसने तिकीट दिले नाही. ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर उभे राहिले पण नावेली सोडून त्यांना बाणावली मतदारसंघात जावे लागले. 2017 च्या निवडणुकीच्या काळात फालेरो व चर्चिल यांच्यात पुन्हा मैत्रीचे नाते तयार झाले. आता या दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र फालेरो यापुढील विधानसभा निवडणूक पुन्हा लढवतील की नाही ते स्पष्ट नाही. फालेरो हे काँग्रेसच्या दिल्लीतील राजकारणातच आता नव्याने स्थिरावू शकतात. त्यांना ईशान्येकडील राज्यांचे प्रभारीपद सांभाळणो जास्त आवडते. फालेरो यांनी 2017 च्या निवडणूक निकालानंतर गोव्यात मुख्यमंत्रीपद मिळविण्याचा प्रयत्न केला होता पण दिग्वीजय सिंग यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी फालेरो यांची निवड होणार नाही याची काळजी घेतली. आता दिग्वीजय सिंग यांच्यापेक्षाही फालेरो यांचे स्थान काँग्रेसमध्ये वाढले आहे. दिग्विजय सिंग यांना तूर्त काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दूर ठेवले आहे.