खुशखबर ! गोव्यात एका वर्षातच बांगड्यांचे उत्पन्न दुप्पट, प्रजननासाठी स्थलांतर केल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 04:03 PM2017-11-02T16:03:06+5:302017-11-02T16:03:47+5:30
गोवेकरांसाठी खुशखबर ! गोव्यात यंदा एकुण मत्स्य उत्पादनात २० टक्के घट झाली असली तरी गोमंतकीयांचा आवडीचा ‘बांगडा’ दुप्पट वाढला आहे.
मडगाव : गोवेकरांसाठी खुशखबर ! गोव्यात यंदा एकुण मत्स्य उत्पादनात २० टक्के घट झाली असली तरी गोमंतकीयांचा आवडीचा ‘बांगडा’ दुप्पट वाढला आहे. २०१५-१६ या कालावधीत गोव्यात ११ हजार ४३२ टन बांगडा पकडला होता़ २०१६-१७ कालावधीत हे प्रमाण २२ हजार ५३१ टनावर पोहचले आहे.
गोव्यातील मच्छिमार खात्याकडून ही माहिती प्राप्त झाली आहे़. बाजारात मोठ्या प्रमाणावर बांगड्यांची आवक वाढल्याने त्याच्या किंमतीही उतरल्या आहेत. सध्या गोव्यातील किरकोळ बाजारात १०० रूपयाना १२ बांगडे मिळतात़. आॅक्टोबरच्या मध्यंतरात १०० रूपयांना केवळ ६ बांगडे मिळायचे़ बांगडा हा एकुणच रूचकर मासा असून गोव्यातच नव्हे तर जवळच्या राज्यातही बांगड्यांचे प्रमाण
वाढले आहे़ या संबंधी मत्स्योद्योग खात्याच्या अधिका-यांशी संपर्क साधला असता, बांगड्यांचे प्रमाण एकदम कसे वाढले याचे कारण अजून समजले नाही़ यासंबंधी शास्त्रीय अभ्यास चालू आहे असे त्यानी सांगितले़.
कोची-केरळ येथील सेंट्रल मरिन फि शरिज रिसर्च इन्स्टिट्यूटचे तज्ञ टी़व्ही़ सत्यनंदन यांच्या मताप्रमाणे फ क्त गोव्यातच नव्हे तर भारताच्या दक्षिण - पश्चिम समुद्र पट्टयात बांगडयांचे प्रमाण वाढले आहे़ हे प्रमाण का वाढले असे त्याना विचारले असता ते म्हणाले, कित्येक कारणे असू शकतात मात्र महत्वाचे कारण म्हणजे कित्येक वेळा मासे प्रजननासाठी सुरक्षित व चांगले स्थान मिळावे यासाठी
स्थलांतर करतात त्यामुळे असे बदल घडून येऊ शकतात. या संबंधी गोव्यातील समुद्र विज्ञान संस्थेकडूनही अभ्यास चालू आहे अशी माहिती या संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ ए़सी़. अनिल यांनी दिली़.