मडगावकरांचा ‘बाबुश’ पुन्हा पोतरुगालचा प्रधानमंत्री झाल्याचाच आनंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 03:21 PM2019-10-10T15:21:08+5:302019-10-10T15:21:38+5:30
चुलत बहिणीने पाठविला अभिनंदनाचा एसएमएस : बालपणीच्या मित्रलाही झाली आठवण
सुशांत कुंकळयेकर
मडगाव: डबघाईला आलेल्या पोतरुगीज अर्थव्यवस्थेला सावरुन देशाला पुन्हा एकदा प्रगतीपथावर नेणारा नेता अशी प्रतिमा असलेले आंतोनियो कॉस्ता हे पुन्हा एकदा पोतरुगालचे प्रधानमंत्री झाल्यामुळे पोतरुगालच्या जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहेच. मात्र असेच वातावरण कॉस्ता घराण्याचा मूळ गाव असलेल्या मडगावातही असून मडगावकरांना त्यांचाच ‘बाबूश’ पुन्हा एकदा प्रधानमंत्री झाला याचे भारी अप्रूप आहे.
आंतोनियो कॉस्ता हे मूळ गोमंतकीय असून मडगावातील प्रसिद्ध अशा कॉस्ता घराण्याचे ते नातू होत. कॉस्ता यांना घरात ‘बाबूश’ या नावाने हाक मारली जाते. त्यामुळे मडगावकरांसाठीही ते बाबूशच आहेत. आमचा ‘बाबूश’ पुन्हा पोतरुगालचा प्रधानमंत्री झाला याचे कौतुक येथे मडगावकरांमध्येही आहे. समाज माध्यमावरुन ते व्यक्तही होत आहे.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी गोव्याशी नाळ जुळलेली असलेली व्यक्ती पुन्हा एकदा पोतरुगालचा प्रधानमंत्री होते याचा आम्हा गोमंतकीयांना विशेष अभिमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मडगावातील नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. फ्रान्सिस कुलासो म्हणाले, आंतोनियो कॉस्ता हे जरी मडगावात जन्माला आले नाही तरी त्यांचे वडील ओर्लादो कॉस्ता हे मूळ मडगावकर. आंतोनियोला घरात ‘बाबूश’ या टोपण नावाने हाक मारायचे. आज जेव्हा ते परत प्रधानमंत्री झाले आहेत ते पाहून आम्हाला आमचा बाबूश प्रधानमंत्री झाला याचे फार मोठे कौतुक आहे.
कॉस्ता यांचे घर मडगावातील आबाद फारिया रस्त्यावर असून तेथे त्यांची काकी सिनिका व त्यांची चुलत बहिण आना कारिना हे रहातात. आंतोनियो यांनी पोतरुगालच्या निवडणुकीत जे यश मिळविले त्याचे आम्हाला कौतुक असून मी त्यांना लगेच एसएमएस पाठवून त्यांचे अभिनंदन केले असे आना कारिना म्हणाल्या. पोतरुगालची आर्थिक स्थिती अगदी डबघाईला आली असताना त्यांनी आपल्या कौशल्याने त्या राज्याची आर्थिक घडी पुन्हा बसवली याचेच आम्हाला अधिक कौतुक वाटते असे ‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या.
दोन वर्षापूर्वी कॉस्ता हे पहिल्यांदाच पोतरुगालचे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी मडगावच्या या आपल्या घराला भेट दिली होती. त्यावेळीही आनाने असाच आनंद व्यक्त केला होता. आंतोनियो प्रधानमंत्री झाले आहेत याचा आनंद त्यांचे मडगावातील शेजारी असलेले आर्थेम सिल्वा यांनाही झालेला आहे. याचे कारण म्हणजे, चाळीस वर्षापूर्वी ज्यावेळी आंतोनियो आपल्या वडिलांबरोबर मडगावात आले होते त्यावेळी सुमारे 15 दिवस त्यांचे वास्तव मडगावात होते. त्यावेळी आंतोनियोला बरोबर घेऊन मडगावात फिरण्याचे काम आर्थेमवरच पडले होते. त्या जुन्या आठवणींना उजाळा देताना आर्थेम म्हणाले, त्यावेळी आंतोनियो 16-17 वर्षाचा असेल. ािसमस साजरे करण्यासाठी त्याचे सर्व कुटुंब त्यावेळी मडगावात आले होते. आंतोनियोचा रिकाडरे हा माङया वयाचा, आंतोनियो माङयापेक्षा चार वर्षानी मोठा. ते दोघेही माङयाच वयाचे असल्याने मीच त्यांना त्यावेळी मडगावात घेऊन फिरायचो. त्यांच्याबरोबर फुटबॉल खेळल्याचेही मला आठवते.
गोवा - पोतरुगीज फ्रेंडशिप सोसायटीचे माजी अध्यक्ष एलिन कुलासो यांनीही आंतोनियो परत प्रधानमंत्री झाला याचा आपल्याला विशेष आनंद झाल्याचे सांगितले. याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, काही वर्षापूर्वी मी पोतरुगालमध्ये गेलो होतो त्यावेळी त्या देशाची अर्थव्यवस्था एवढी डळमळीत झाली होती की, भिका:यांचा देश अशी त्या देशाची प्रतिमा झाली होती. मात्र आंतोनियोने देशाची सुत्रे आपल्या हातात घेतल्यानंतर त्यांनी पोतरुगालला आपल्या सुधारित धोरणांनी पुन्हा एकदा श्रीमंत देशांच्या पंक्तीत आणून बसविले. दोन वर्षातच त्यांनी ही करामत केली. जर त्यांच्याकडे आणखी चार वर्षे पोतरुगालचा ताबा राहिला असता तर हे राष्ट्र आणखीनच भरभराट करेल अशी अपेक्षा असल्यामुळेच आपल्याला अधिक आनंद होत असल्याचे ते म्हणाले.
प्रतिष्ठित घराण्यांपैकी कॉस्ता घराणो
कॉस्ता यांचे घराणो मूळ मडगावचे नव्हे. मात्र मडगावच्या बाहेरुन जी दोन घराणी आली आणि नंतर मडगावात त्यांची प्रतिष्ठीत घराण्यामध्ये गणना होऊ लागली त्यापैकी एक घराणो म्हणजे होली स्पिरीट चर्चच्या बाजूला असलेले आल्वारिस घराणो आणि दुसरे घराणो म्हणजे आबाद फारिया रस्त्यावर असलेले कॉस्ता यांचे घराणो. मडगावच्या जुन्या इतिहासाची नोंद ठेवणारे मडगावचे माजी नगराध्यक्ष वाल्मिकी फालेरो यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, कॉस्ता घराणो हे मुळ तिसवाडीतील सांत आन येथील फिदाल्गांचे घराणो. मात्र नंतर तिसवाडीत प्लेगची साथ सुरु झाल्यानंतर हे घराणो मडगावात येऊन स्थायिक झाले. नंतर या घराण्याचा विस्तारही होत गेला. सध्या हॉस्पिसियोची जी वारसा महत्वाची इमारत आहे तीही याच कॉस्ता घराण्याची. आंतोनियो कॉस्ता यांचे वडील ऑर्लादो कॉस्ता यांचा जन्म मडगावात झाला होता. मात्र नंतर ते आंगोलात स्थायिक झाले. आंतोनियो यांचा जन्मही आंगोलातलाच. आंतोनियोचे वडील ऑर्लादो हे चांगल्यापैकी लेखक होते. आणि सालाझारच्या हुकूमशाहीविरोधात त्यांनी पोतरुगालात लढा दिला होता. ते कम्युनिस्ट विचारसरणीचे होते. त्यांचाच वारसा पुढे चालविताना आंतोनियो यांनी सोशलिस्ट पक्षाची कास धरली.