‘मगो’ची गोव्यात स्वबळाची भाषा
By admin | Published: September 19, 2016 04:59 AM2016-09-19T04:59:19+5:302016-09-19T04:59:19+5:30
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची भाषा करत असून, निवडणुकीत जनता सर्वांना जागा दाखवून देईल, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली
पणजी : आम्हाला गृहीत धरू नका, या भाजपाने दिलेल्या इशाऱ्याने चिडलेले महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकर्ते स्वबळावर लढण्याची भाषा करत असून, निवडणुकीत जनता सर्वांना जागा दाखवून देईल, अशा संतप्त प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केल्या.
शनिवारी भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (मगो) व भारतीय भाषा सुरक्षा मंचचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर यांना अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला होता. त्यावर मगोचे खजिनदार आपा तेली तसेच श्रीधर मांद्रेकर, दामू दिवकर, सुदेश मळकर्णेकर, महेश पणशीकर (सर्व मध्यवर्ती कार्यकारिणी सदस्य) चिडले आहेत. भाजपाने युतीचा धर्म किती पाळला, हे सर्वांना ठाऊक आहे. केवळ वाद नको म्हणून आम्ही मौन पाळून होतो. दीपक ढवळीकर यांचे महत्त्वाचे सहकार खाते काढले.
लवू मामलेदार यांना महामंडळ देऊन बोळवण केली. त्यांना फोंड्यात भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून फारच उपद्रव झाला. २0१२मध्ये युतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मगो पक्षाला सामावून घ्यायला हवे होते, तसे घेतलेच नाही. पाच वर्षांत पक्षाला दुय्यम वागणूक दिल्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनात उपेक्षितपणाची भावना आहे, असे पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना कार्यकर्त्यांमधील असंतोषाबद्दल विचारले असता, २४ सप्टेंबरला पक्षाची मध्यवर्ती कार्यकारिणी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्व प्रश्नांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>बांधकाम खाते उपकार नव्हे
आम्हाला कोणी इशारा देण्याची गरज नाही, बांधकाम खाते देऊन उपकार केलेले नाहीत. निवडणूकपूर्व युतीचा करार म्हणून मंत्रिपदे दिली गेली. युती होती म्हणूनच भाजपाचे २१ उमेदवार निवडून आले. आता युती नको असेल तर मगोला बाहेर ठेवून २६ उमेदवार निवडून आणून दाखवावेत, असे आव्हान पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.