कुंभमेळा: हिंदूंच्या एकतेचे प्रतीक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2025 10:38 IST2025-02-11T10:38:04+5:302025-02-11T10:38:47+5:30
कुंभमेळा म्हणजे हिंदूंची सर्वांत मोठी धार्मिक यात्रा। कुंभमेळा, त्याचे अंतरंग, साधूंचे आखाडे याचे सर्वांना कुतूहल असते. ही धर्मजिज्ञासा लक्षात घेऊन हा लेखप्रपंच.

कुंभमेळा: हिंदूंच्या एकतेचे प्रतीक!
चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था
प्रयागराज येथील कुंभमेळ्याला कोणत्याही निमंत्रणाविना, आर्थिक अनुदान असं काही नसतानाही कोट्यवधी भाविक येतात. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदूंची धर्मश्रद्धा. गंगामाता आणि पवित्र त्रिवेणी संगमावरील तीर्थ यांच्यावरील श्रद्धेपोटी हिंदू समाज साधू-संतांसह एकत्र येतो. कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे केवळ दर्शन नव्हे, तर आध्यात्मिक संमेलन आहे. हा मेळा परदेशी नागरिकांना हिंदू धर्माच्या अंतरंगाचे दर्शन घडवतो.
प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार ठिकाणी भरणाऱ्या कुंभमेळ्यांच्या निमित्ताने धर्मव्यवस्थेने चार खुली व्यासपीठे हिंदू समाजाला उपलब्ध करून दिली. कुंभमेळ्याची ही चार क्षेत्रे म्हणजे चार दिशांची प्रतीके होत. वाहतुकीच्या आधुनिक साधनांचा शोध लागण्याच्या आधीपासून कुंभमेळे भरत आहेत.
साधूंचे पर्वकाळातील पवित्र स्नान यालाच शाही स्नान म्हणतात. यासाठी आखाड्यांतील साधू-संतांची शस्त्रांसह मिरवणूक निघते. मिरवणूक बघायला दुतर्फा अफाट जनसमुदाय जमतो. 'कुंभमेळ्यात हिमालयाच्या गुहेत ध्यानधारणा करणारे सिद्धपुरुष, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पायी प्रवास करणारे संन्यासी, शस्त्रधारी आखाड्यांतील संत-महंतांचे दर्शन होते. विविध योगमार्गातील साधू-संतांच्या दर्शनाचा अमोल लाभ कुंभमेळ्यामुळे भाविकांना होतो.
साधू-संतांची धर्म, अध्यात्म, रामायण, भागवत इत्यादी विषयांवरील रसाळ प्रवचने, व्याख्याने भाविकांच्या श्रवणभक्तीला चालना देतात. कुंभमेळ्यातील प्रत्येक संप्रदायाच्या मंडपात किंवा आखाड्यात भाविकांसाठी अहर्निश अन्नछत्रे चालतात!
लाखो भाविकांच्या अन्नपाण्याची व्यवस्था होते. यावर्षी महाकुंभात विविध आखाडे, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती, महर्षी अध्यात्म विश्व विद्यालय अशा विविध संघटनांनी एकत्र येऊन हिंदू राष्ट्र अधिवेशन, हिंदू एकता पदयात्रा यांचे आयोजन केले होते. या कुंभमेळ्याला हिंदू भाविकांचा जनसागर लोटला आहे, हे हिंदू एकतेचे दर्शन आहे.