राज्यभर महाशिवरात्री उत्साहात साजरी, मुख्यमंत्री, मंत्री, आमदार यांनी घेतले दर्शन
By समीर नाईक | Published: March 8, 2024 04:24 PM2024-03-08T16:24:03+5:302024-03-08T16:26:24+5:30
शुक्रवारी राज्यभर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला.
समीर नाईक, पणजी: शुक्रवारी राज्यभर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्यातील सर्व महादेव देवस्थानमध्ये विविध धार्मिक पूजा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लोकांनी सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हरवळे येथील श्री क्षेत्र रुद्रेश्र्वर मंदिरात आपल्या कुटुंबीयांसोबत सकाळीच दर्शन घेतले. तसेच इतर आमदार, मंत्री यांनी देखील आपापल्या मतदारसंघातील प्रसिद्ध महादेवाच्या मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले.
महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी रात्र जागविली होती, अनेक देवळामध्ये नामस्मरण जपचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. पहाटेपासून दुग्ध अभिषेक व इतर विधीना सुरुवात झाली होती. अनेक भक्तगण अनवाणी चालत देवाच्या दर्शनासाठी आले होते. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने अनेक देवळांमध्ये खास फराळ लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.
प्रमुख देवळांमध्ये भाविकांची अलोट गर्दी :
तांबडीसूर्ला येथील महादेव मंदिर, हरवळे येथील श्री क्षेत्र रुद्रेश्र्वर मंदिर, म्हार्दो येथील मंगेश मंदिर, ओझरी येथील महादेव मंदिर, ताळगाव येथील शंकर देवस्थान, सांतिनेझ येथील ताडमाड मंदिर, या सारख्या अनेक प्रमुख देवस्थानमध्ये भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. दुपारपर्यंत ३ वाजेपर्यंत देखील अनेक देवळांमध्ये मोठ्या रांगाच होता.
सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन :
सर्व महादेवाच्या मंदिरांमध्ये महाशिवरात्रीचे औचित्य साधून धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आलेच आहे, पण यासोबत विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भजन, कीर्तन, नृत्य, वेशभूषा, नाटक, यांचा समावेश आहे.