महाबळेश्वर सैल यांना ‘सरस्वती सम्मान’
By admin | Published: March 10, 2017 02:21 AM2017-03-10T02:21:03+5:302017-03-10T02:21:14+5:30
पणजी : गोमंतकीय लेखक महाबळेश्वर सैल यांना वर्ष २०१६साठीचा प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सम्मान’ प्राप्त झाला आहे. २००९ साली प्रसिद्ध
पणजी : गोमंतकीय लेखक महाबळेश्वर सैल यांना वर्ष २०१६साठीचा प्रतिष्ठेचा ‘सरस्वती सम्मान’ प्राप्त झाला आहे. २००९ साली प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या ‘हावठण’ या कोकणी कादंबरीची या पुरस्कारासाठी निवड झाली असून सरस्वती सम्मानच्या मानकऱ्यांत समाविष्ट झालेले ते पहिले कोकणी लेखक ठरले आहेत.
मराठी आणि कोकणी अशा दोन्ही भाषांतून सकस लेखन करणाऱ्या महाबळेश्वर सैल यांना याआधी साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे १९९१पासून सरस्वती सम्मान दिला जातो. रु. १५ लाख, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. आतापर्यंतच्या या पुरस्काराच्या मानकऱ्यांत हरिवंशराय बच्चन, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, मनुभाई पंचोली, सुनील गंगोपाध्याय, एस. एल. भैरप्पा अशा दिग्गजांचा समावेश आहे. या पंक्तीत एका गोमंतकीय लेखकाने स्थान मिळवल्याचा आनंद गोव्याच्या साहित्यिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.
२०१६ सालासाठीच्या सरस्वती सम्मानसाठी २२ भारतीय भाषांमधून २००६ ते २०१५ दरम्यान प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा विचार करण्यात आला. या संदर्भातील निवड प्रक्रिया विस्तृत असते. संबंधित भाषांतील प्रकाशित साहित्यातून एका पुस्तकाची निवड करण्याचे काम त्या त्या भाषेसाठी नेमलेली समिती करत असते. या समित्यांकडून शिफारस केलेल्या २२ पुस्तकांचे परीक्षण पाच भाषा समित्या करतात. त्यातून निवडलेल्या पाच पुस्तकांचे अंतिम परीक्षण निवड समिती करत असते. यंदासाठीची निवड समिती सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए. एस. आनंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. या समितीने दीर्घ चर्चेअंती सैल यांच्या कादंबरीची निवड केल्याचे बिर्ला फाउंडेशनतर्फे प्रसारित पत्रकात म्हटले आहे.
‘हावठण’ या कादंबरीतून सैल यांनी विकासाच्या ओघात पारंपरिक व्यवसायांची झालेली कोंडी प्रभावीपणे चित्रित केली आहे. सैल सातत्याने मराठी आणि कोकणीतून लेखन करत आहेत. त्यांची आतापर्यंत मराठीतून चार नाटके व एक कादंबरी, तर कोकणीतून सात कादंबऱ्या, पाच कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. इंग्रजी, हिंदी, मराठी, कन्नड व मल्याळम भाषांतून त्यांच्या साहित्याचा अनुवाद झालेला आहे. ‘पलतडचो मनीस’ हा कोकणी चित्रपट सैल यांच्या एका लघुकथेवर आधारित आहे. (प्रतिनिधी)