म्हादईबाबत अमित शहा यांचे मौन अपराधीपणामुळेच,शिवसेनेचा टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2018 01:28 PM2018-05-14T13:28:30+5:302018-05-14T13:28:30+5:30

शिवसेनेची भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर टीका.

Mahadayi Water Dispute : Shiv Sena's Rakhi Prabhudesai criticized BJP President Amit Shah | म्हादईबाबत अमित शहा यांचे मौन अपराधीपणामुळेच,शिवसेनेचा टोला 

म्हादईबाबत अमित शहा यांचे मौन अपराधीपणामुळेच,शिवसेनेचा टोला 

googlenewsNext

पणजी : कर्नाटकमध्ये मतांच्या राजकारणासाठी म्हादई नदीचे पाणी सहा महिन्यात कर्नाटकला देण्याची घोषणा करणारे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी(14 मे) गोव्यातील कार्यकर्ता संमेलनात या विषयावर पाळलेले मौन त्यांची अपराधीपणाची भावना दर्शवते अशी टीका शिवसेनेने केली आहे. 

पार्टीच्या उपाध्यक्ष राखी प्रभुदेसाई नाईक म्हणाल्या आहेत की, शाह यांनी आपल्या भाषणात म्हादईबद्दल एकही चकार शब्द न काढणे आश्चर्यकारक आहे. गोव्यासाठी म्हादईचा विषय महत्त्वपूर्ण असून शाह यांनी रविवारी त्यावर भाष्य करणं अपेक्षित होते. म्हादईच्या पाण्याबाबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी कर्नाटकच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांना लिहिलेल्या पत्रापासून कर्नाटकच्या निवडणूक प्रचारात भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी भाजपला सत्ता दिली तर सहा महिन्यात म्हादईचे पाणी कर्नाटकला देऊ याबाबत केलेल्या विधानापर्यंत शिवसेना प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. शिवसेनेने वेळोवेळी गोव्याचे हित लक्षात घेऊन या कुटील कारस्थानाला विरोधदेखील दर्शवला आहे.

निवडणुका डोळ्यासमोर असल्याने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकच्या जनतेला म्हादईच्या पाण्याबाबत दिलेले आश्वासन म्हणजे कर्नाटकच्या जनतेची निव्वळ फसवणूक आहे. भाजपाची तिच संस्कृती आहे. शिवसेनेची मागणी आहे की, या गंभीर विषयावर शाह यांनी आपल्या पक्षाची भूमिका जाहीर करायला हवी.

म्हादईचे पाणी वळवण्यास भाजपाने परवानगी दिली तर गोव्यात लोक रस्त्यावर उतरतील आणि भाजपा आघाडीचे सरकार खाली खेचतील याची पूर्ण कल्पना भाजपाला आहे. अमित शहा यांच्या म्हादईवरील कालच्या मौनाने त्यांच्या मनात अपराधीपणाची भावना आहे हे दाखवून दिले आहे, असे राखी यांनी म्हटले आहे. 

पुढे त्या असंही म्हणाल्या आहेत की, राज्यात खाणी बंद झाल्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. लाखो लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला असतानादेखील शाह यांनी त्याची अपेक्षित दखल घेतली नाही. केवळ दोन वाक्यात त्यांनी या विषयावर जुजबी वक्तव्य करत कोर्टामार्फत तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील एवढेच बोलून गोमंतकीयांचा अपमान केला आहे. शाह यांनी खाणींबाबत केलेले वक्तव्य बघितले तर खाणींच्या प्रश्नावर भाजपा फारसा गंभीर नाही हे स्पष्ट झाले आहे. ज्या पक्षाची केंद्रात आणि गोव्यात सत्ता आहे त्या पक्षाच्या अध्यक्षाला गोव्यातील महत्त्वाच्या विषयावर बोलावेसे वाटले नाही. हे प्रश्न सोडवण्यासाठी गोमंतकीय जनतेला आश्वस्त करावे असे वाटले नाही ही दु:खद बाब आहे.

Web Title: Mahadayi Water Dispute : Shiv Sena's Rakhi Prabhudesai criticized BJP President Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.