राज्य उत्सवाचा दर्जा नको; शिरगावच्या श्री लईराई देवस्थानच्या आमसभेत महाजनांनी केला विरोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 10:36 IST2025-04-07T10:35:19+5:302025-04-07T10:36:03+5:30
बैठकीस उपस्थित महाजनांनी हा प्रस्ताव मान्य नसल्याचे जाहीर केले.

राज्य उत्सवाचा दर्जा नको; शिरगावच्या श्री लईराई देवस्थानच्या आमसभेत महाजनांनी केला विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्य सरकारने अलीकडेच शिरगाव येथील लईराई देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाला राज्य उत्सव दर्जा देण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. काल, रविवारी झालेल्या देवस्थानच्या महाजनांच्या आमसभेत याला विरोध करण्यात आला. बैठकीस उपस्थित महाजनांनी हा प्रस्ताव मान्य नसल्याचे जाहीर केले.
लईराई देवस्थानचे नूतन अध्यक्ष दीनानाथ गावकर व समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या महाजनांच्या आमसभेला ८२ महाजन उपस्थित होते. नूतन समितीचे अध्यक्ष गावकर, भास्कर गावकर, आतिश गावकर, दयानंद गावकर, वासू गावकर, महादेव गावकर, प्रकाश गावकर, सुभाष गावकर व इतर महाजन उपस्थित होते. नूतन अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले की, श्री लईराई देवस्थान हे महाजनी देवस्थान असल्याने कोणताही निर्णय घेताना महाजनांच्या सभेत त्याला मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यादृष्टीने मी देवस्थान समितीचा ताबा घेतल्यानंतर दोन दिवसांपूर्वी कला व संस्कृती खात्याच्या संचालकांना भेटून यासंदर्भात विचारणा केली होती. त्यावेळी त्यांनी सरकारने फक्त ही घोषणा केलेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यावेळी महाजनी देवस्थान असल्याने महाजनांची मान्यता घेतल्याशिवाय पुढील निर्णय घेणे योग्य नाही, अशा प्रकारची सूचना केली आहे.
रविवारी देवस्थान सभागृहात झालेल्या महाजनांच्या सभेत सुरुवातीलाच देवीच्या जत्रोत्सवास राज्य उत्सव दर्जा देण्यास महाजनांनी विरोध केल्याचे दीनानाथ गावकर म्हणाले. ते म्हणाले, लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लईराई देवस्थानच्या जत्रेला सरकार दरवर्षी सर्व प्रकारचे सहकार्य करते. पायाभूत सुविधा, वाहतूक सुविधा दिली जाते. कायदा व सुव्यवस्थेवर लक्ष दिले जाते. सरकारने यापुढेही अशाच प्रकारे आपले सहकार्य चालू ठेवावे. अनेक योजना आहेत. त्याला सरकारचे सहकार्य अपेक्षित आहे.
झाले होते स्वागत...
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात लईराई देवस्थानच्या जत्रोत्सवाला राज्य उत्सव म्हणून मान्यता देताना येथे आणखी सुविधा पुरवल्या जातील. तसेच इतर योजनाही राबवू, अशी घोषणा केली होती. त्याचे स्थानिक पातळीवर स्वागतही झाले होते. मात्र, महाजनांनी त्यास विरोध केला आहे.
योग्य पद्धतीचा अवलंब नाही
'आमचे महाजनी देवस्थान आहे. त्यामुळे महाजनांची मान्यता घेणे गरजेची असते. सरकारने घोषणा केली असली तरी त्याबाबत योग्य पद्धतीचा अवलंब झालेला नाही. त्यामुळे राज्योत्सव दर्जाला आम्ही मान्यता दिलेली नाही. सर्वानुमते त्यास आमचा विरोध आहे, असे अध्यक्ष दीनानाथ गावकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, बैठकीत जत्रोत्सवानिमित्त हाती घेण्यात येणाऱ्या विविध कामांबाबत चर्चा झाली. अनेक सदस्यांनी आपापल्या सूचना मांडल्या. सरकार दरवर्षी पाचदिवसीय जत्रेनिमित्त वेगवेगळ्या सुविधा देते. त्या सरकारने जरूर पुरवाव्यात. मात्र, थेट सरकारपुरस्कृत राज्य दर्जाला विरोध असल्याचा ठराव आमसभेनेत मंजूर केला.