सिंधुदुर्गात औद्योगिक गुंतवणुकीसाठी गोव्याच्या कारखानदारांना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2019 02:34 PM2019-03-05T14:34:13+5:302019-03-05T14:34:37+5:30
गोव्यातील कारखानदारांनी सिंधुदुर्गात गुंतवणूक करावी यासाठी काही सवलती देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे.
पणजी : गोव्यातील कारखानदारांनी सिंधुदुर्गात गुंतवणूक करावी यासाठी काही सवलती देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले आहे. सीमेवरील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीत गोव्यातील उद्योजकांनी निदान विस्तार विभाग तरी उघडावेत, अशी शेजारी राज्याची अपेक्षा आहे.
येथील मांडवी हॉटेलमध्ये नुकत्याच महाराष्ट्र, गोवा गुंतवणूकदारांच्या परिषदेत या विषयावर चर्चा झाली. गुंतवणूकदारांना राज्य जीएसटीचा १00 टक्के परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. सावंतवाडीचे आमदार तथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले की, ‘ गोव्याच्या कारखान्यांमध्ये सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात लोक कामाला येतात. त्यांना त्यांच्या गावातच जर नोकऱ्यांची सोय उपलब्ध झाली तर ते सोन्याहून पिवळे ठरेल त्यासाठी महाराष्ट्र सरकार आवश्यत त्या सवलती देण्यास तयार आहे. राज्य जीएसटीच्या बाबतीत तर पूर्ण सवलत दिली जाईल. गोव्यातील कारखानदारांनी आडाळी येथे येऊ घातलेल्या औद्योगिक वसाहतीत किंवा कुडाळ अथवा सिंधुदुर्गातील अन्य औद्योगिक वसाहतींमध्ये निदान मूळ कारखान्याचे विस्तार विभाग तरी सुरु करावेत. प्रदूषण न करणारे उद्योग सिंधुदुर्गात यावेत एवढीच अपेक्षा आहे.’
या परिषदेत आडाळी औद्योगिक वसाहतीच्या वैशिष्ट्यांबरोबरच उद्योग विभागाशी संबंधित सर्व धोरणांचे सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
दरम्यान, गोव्यातील औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांमध्ये शेजारी सिंधुदुर्ग, कारवारमधून नोकरीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. करासवाडा, म्हापसा, डिचोली, थिवी, वेर्णा औद्योगिक वसाहतींमध्ये सिंधुदुर्गातील लोक काम करतात.
‘फॅब्रिकेशन, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग जुळवणी करणारे युनिट उघडणे शक्य’
गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष तथा गोव्यातील उद्योजक मांगिरीश पै रायकर म्हणाले की, ‘फार्मास्युटिकल कारखाने सिंधुदुर्गात चालवणे शक्य नाही. कारण तेथे आवश्यक ते कुशल मनुष्यबळ मिळू शकणार नाही. फॅब्रिकेशन युनिट, इलेक्ट्रॉनिक सुटे भाग जुळवणी करणारे युनिट तेथे येऊ शकतात. सिंधुदुर्ग तसेच त्याही पुढे रत्नागिरी तसेच अन्य भागात गोव्यातील कारखानदार माल पाठवतात. त्यांना वाहतुकीच्यादृष्टीने अंतर वाचविण्यासाठी सिंधुदुर्गात कारखाने किंवा विस्तार विभाग थाटण्याचा विचार करता येईल.’
सिंधुदुर्गातून मोठ्या प्रमाणात गोव्याच्या कारखान्यांमध्ये लोक नोकरीला येतात, याला रायकर यांनीही दुजोरा दिला. प्राप्त माहितीनुसार सावंतवाडी, वेंगुर्ले आदी भागातून गोव्याच्या कारखान्यांमध्ये नोकरीसाठी येणाऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्यांची विशेष व्यवस्थाही आहे. वेंगुर्ले येथून पहाटे ६.३0 वाजता खास म्हापशापर्यंत बस आहे. तसेच परतीच्या प्रवासाकरिता सायंकाळी ५.३0 वाजता एसटी बसची व्यवस्था आहे. नियमित कामाला येणाऱ्या पासधारकांची या बससाठी गर्दी असते.