पंतप्रधान मोदींमुळेच महिलाशक्तीचा सन्मान: मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2024 01:39 PM2024-03-07T13:39:14+5:302024-03-07T13:40:30+5:30
नारीशक्ती वंदन संमेलनाला साखळीत प्रतिसाद, स्वावलंबी बनवणार
लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत देशातील नारी शक्तीला चौफेर प्रगतीची द्वारे खुली झाली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केले.
मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रात महिलांनी उत्तुंग झेप घेत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत समाज, कुटुंब, प्रदेशासाठी मोठे योगदान देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. महिलांसाठी ३३ टक्के राजकीय आरक्षण देऊन भारतीय राजकारणात स्त्री शक्तीला मोठा मान दिला.
महिला दिनाच्या निमित्ताने रवींद्र भवनात आयोजित नारी शक्ती वंदन संमेलनात महिलांची मोठी उपस्थिती लाभली. यावेळी व्यासपीठावर भाजप महिला नेत्या सुलक्षणा सावंत, नगराध्यक्ष रश्मी देसाई, निकिता नाईक, विनंती पार्सेकर, सिद्धी पोरोब, तसेच विविध महिला सरपंच, पंच, उपसरपंच, नगरसेविका, मंडळ अध्यक्ष गोपाल सुर्लकर व इतर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांनी अकरा कोटी गरीब लोकांना घरे बांधून देताना ती महिलांच्या नावावर करण्याचा कायदा आणला. तसेच पाणी, रस्ते, वीज, सिलिंडर, अशा सगळ्या योजना दारोदारी पोहोचवताना महिलेला आपले घर चालवताना सर्व प्रकारचा दिलासा मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था गेल्या दहा वर्षांत केली.
शेती कौशल्य विकास तसेच बिनव्याजी कर्ज व इतर माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्यात भाजप सरकारचे मोठे योगदान आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महिला शक्ती ही मोठी शक्ती असून पन्नास टक्के महिलांचा सहभाग देशातील राजकारणात निर्णय ठरत असून महिलांना खऱ्या अर्थाने सबल करण्याचे महान कार्य मोदीजींनी केले आहे, असे त्यांनी सांगितले. गोव्यातही स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर योजनेच्या मार्फत महिला मोठ्या संख्येने पुढे सरसावत स्वावलंबी होत असल्याने समाधानी असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
...म्हणून त्यांना जनतेने झिडकारले
काँग्रेस राजवटीत गेल्या साठ वर्षांत महिलांसाठी कोणत्याही योजना आखल्याचे आठवत नाही, उलट देशाचे तुकडे करण्यात काँग्रेसच्या नेत्यांनी धन्यता मानली, अनेक घोटाळे केले. काँग्रेसचे पंतप्रधान रिमोट कंट्रोलप्रमाणे वागत होते. त्यामुळे काँग्रेसला आज देशातील जनतेने पूर्णपणे झिडकारले. यावेळी संसदेत चारशे पार सदस्य संख्या होईल. भाजप सरकार पुढे सरसावत पुन्हा एकदा देशाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. महिलांनी पुन्हा एकदा भाजपला सर्वप्रकारची साथ द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी महिलांसाठी आखलेल्या योजनांचा सविस्तर आढावा घेतला, यावेळी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच सरकारी योजनांना चालना देण्यासाठी महिला मंडळ स्वयंसहायता गट यांच्यातर्फे कार्य करणाऱ्या महिला प्रतिनिधींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
रवींद्र भवनपर्यंत रॅली
यावेळी पंतप्रधानांनी महिलांसाठी विशेष संबोधन केले, त्याचे थेट प्रक्षेपण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हजारो महिलांनी पाहिले, सकाळी नारी शक्त्ती वंदन संमेलनांतर्गत भव्य महिला शक्तीची रॅली साखळी हॉस्पिटल रवींद्र भवन या दरम्यान काढण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री यांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
'नारीशक्ती बनताहेत आत्मनिर्भर'
सुलक्षणा सावंत म्हणाल्या, नारी शक्त्तीला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर स्वयंपूर्ण, कणखर बनवण्यात पंतप्रधान मोदी यांच्या विविध योजना खऱ्या अर्थाने उपयुक्त ठरत आहेत. आज महिला शक्ती भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून पुन्हा एकदा देशात पंतप्रधानपदी मोदी विराजमान होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.