मोलकरीण घरातून थोडी थोडी करून चोरायची मालमत्ता; पोलिसांकडून अटक
By पंकज शेट्ये | Published: September 27, 2023 06:31 PM2023-09-27T18:31:33+5:302023-09-27T18:33:22+5:30
मोलकरीण ज्योती आणि तिची साथिदार सुमन यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: ७३ वर्षीय हेमील्टन फुर्तादो यांच्या बंगल्यात काम करणारी मोलकरीण ज्योती भंगारे आणि तिची साथिदार सुमन खोटभागी यांनी फुर्तादोच्या घरातील ८ लाख ९० हजाराची मालमत्ता लंपास केल्यानंतर त्याचे काय केले त्याबाबत वास्को पोलीस तपास करित आहेत. दोन महीन्यापूर्वी हेमील्टन यांची पत्नी पडून जखमी झाल्यानंतर तिला इस्पितळात उपचारासाठी दाखल केले त्यावेळी मोलकरीण ज्योती यांनी फुर्तादोच्या घरातील कपाटाची चावी काढून हळू हळू करून कपाटातील सोने आणि रोख रक्कम चोरण्यास सुरवात केल्याचे पोलीसांना चौकशीत कळाले आहे. हेमील्टन यांच्या बंगल्यात चोरी केल्याप्रकरणी अटक केलेल्या ज्योती आणि सुमन यांना बुधवारी (दि.२७) वास्कोच्या प्रथम श्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधिशाने बजाविला.
दाबोळी येथे राहणाऱ्या हेमील्टन यांच्या बंगल्यातून दोन लाखाची रोख रक्कम आणि ६ लाख ९० हजाराचे सोन्याचे दागीने लंपास केल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी उघड झाला होता. त्या चोरी प्रकरणात हेमील्टन आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या बंगल्यात काम करणारी मोलकरीण ज्योती (वय ३५) हीच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे पोलीसांनी ज्योतीला ताब्यात घेऊन चौकशीला सुरवात केली असता ज्योती त्या चोरी प्रकरणात शामील असल्याचा दाट संशय पोलीसांना सुद्धा निर्माण झाला. त्यामुळे पोलीसांनी ज्योती ची कसून चौकशी करायला सुरवात केली असता तिने चोरी केल्याची कबूली दिली. तसेच त्यात तिच्याबरोबर सुमन खोटभागी (वय ३२) नामक अन्य एक महीला शामील असल्याचे पोलीसांसमोर उघड होताच पोलीसांनी तिला ताब्यात घेऊन चौकशीला सुरवात केली. हेमील्टनच्या बंगल्यात झालेल्या चोरीत ज्योती आणि सुमन शामील असल्याचे उघड झाल्यानंतर पोलीसांनी त्यांच्याविरुद्ध भादस ३८१, ४११ आरडब्लुय ३४ कलमाखाली गुन्हा नोंद करून मंगळवारी त्यांना अटक केली. हेमील्टन यांच्या घरातून चोरलेल्या दागीन्यांचे आणि रोख रक्कमीचे ज्योती आणि सुमन यांनी काय केले त्याबाबत पोलीस तपासणी करित आहेत.
दरम्यान पोलीसांनी अटक केलेल्या ज्योती आणि सुमन यांना बुधवारी प्रथम श्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश न्यायाधीशाने बजाविला. वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्वप्नील नाईक अधिक तपास करित आहेत. चोरी प्रकरणात पोलीसांनी अटक केलेली ज्योती भंगारे आणि सुमन खोटभागी ह्या मूळ हुबळी, कर्नाटक येथील असून गेल्या काही वर्षापासून त्या गोव्यात राहतात. ज्योती आणि सुमन ह्या एकमेकाच्या एकदम परिचयाच्या आहेत. हेमील्टन यांच्या बंगल्यावर मोलकरणीची गरज असल्याची माहीती सुमन याला मिळाल्यानंतर एका वर्षापूर्वी ती ज्योतीला तेथे कामासाठी घेऊन गेली. २०२२ सालापासून ज्योती हेमील्टन यांच्या घरात मोलकरीण म्हणून कामाला आहे.
दोन महीन्यापूर्वी हेमील्टन यांची पत्नी घरात पडून जखमी झाल्यानंतर तिला उपचारासाठी इस्पितळात दाखल केले होते. त्याचवेळी ज्योतीने हेमील्टन यांच्या पत्नीची घरात असलेली कपाटाची चावी काढून आपल्याशी लपवून ठेवली. त्यानंतर ज्योतीने हेमील्टनच्या बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागीने आणि रोख रक्कम हळू हळू चोरायला सुरवात केली. चोरलेली मालमत्ता नंतर ती जाऊन सुमनशी ठेवायला द्यायची असे पोलीसांना चौकशीत समजले आहे. हेमील्टनवर उपचारासाठी शस्त्रक्रीया होणार असल्याने त्यांनी कपाटात दोन लाख रुपये आणून ठेवले होते. दोन दिवसापूर्वी हेमील्टनने कपाटात ठेवलेली रक्कम तो पाहण्यासाठी गेला असता ती गायब असल्याचे त्याला आढळून आले. कपाटात ठेवलेले पैसे गायब असल्याचे हेमील्टनला कळताच त्यांनी त्याची माहिती पत्नीला दिली. नंतर दोघांनीही कपाटातील सामानाची तपासणी केली असता कपाटातील दोन लाख आणि ६ लाख ९० हजाराचे सोन्याचे दागीने गायब असल्याचे त्यांना आढळून आले.
घरात चोरी झाल्याचे कळताच हेमील्टनने पोलीसात त्याबाबत तक्रार देऊन त्यात घरातील मोलकरीण ज्योतीचा हात असावा असा संशय व्यक्त केला होता. हेमील्टन आणि त्याच्या पत्नीने ज्योतीवर संशय व्यक्त केल्याने पोलीसांनी तिला घेऊन कसून चौकशीला सुरवात केली असता अखेरीस त्या चोरीचा छडा लावण्यास पोलीसांना यश प्राप्त झाले. हेमील्टन यांच्या बंगल्यातून ज्योतीने चोरलेली मालमत्ता सुमन याच्याशी दिल्यानंतर पुढे त्या मालमत्तेचे काय झाले त्याबाबत पोलीस सद्या तपास करित आहेत.