गोव्यात मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या मडकईकर यांना आणखी एक दणका 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 02:12 PM2018-09-25T14:12:07+5:302018-09-25T14:15:06+5:30

मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळालेल्या पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी आणखी एक दणका बसला आहे.

major blow to pandurang madkaikar who just lost his ministerial birth | गोव्यात मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या मडकईकर यांना आणखी एक दणका 

गोव्यात मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेल्या मडकईकर यांना आणखी एक दणका 

पणजी : मंत्रिमंडळातून अर्धचंद्र मिळालेल्या पांडुरंग मडकईकर यांना सोमवारी आणखी एक दणका बसला आहे. कुंभारजुवे मतदार संघातून गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरुध्द रिंगणात उतरलेले काँग्रेसचे झेवियर फियाल्हो यांची मडकईकरांविरुध्दची याचिका सर्वोच्च न्यायालयाने कामकाजात दाखल करुन घेतली. 

मडकईकर यांच्याविरुध्दची अपात्रता याचिका हायकोर्टाने गेल्या जुलैमध्ये फेटाळून लावली होती. हायकोर्टाच्या या आदेशाला फियाल्हो यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. फियाल्हो यांच्या म्हणण्यानुसार गेल्या निवडणुकीत मते मिळविण्यासाठी मडकईकर यांनी भ्रष्ट मार्ग अवलंबिला. मतदारांना गिफ्ट कुपन्स वाटली त्यामुळे त्यांना अपात्र ठरविले जावे. हायकोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली. त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती ए. के. सिक्री व न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्यासमोर ही याचिका कामकाजात आली. फियाल्हो यांच्यावतीने अ‍ॅड. विलस थळी, अर्जुन पेडणेकर, शिरीन नाईक व व्ही. एन. रघुपती हे काम पाहणार आहेत.

मडकईकर हे आजारी असून गेले दोनेक महिने मुंबई येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर राजकीय आपत्तीबरोबरच अन्य संकटेही ओढवली आहेत. त्यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात लोकायुक्तांसमोर सुनावणी चालू आहे. मडकईकर यांनी जुने गोवे येथे बॉ जिझस बासिलिका चर्चजवळ सुमारे २00 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या आलिशान बंगल्याचा हवाला देऊन आयरिश यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. 

मडकईकर आणि त्यांची पत्नी जेनिता या उभयतांविरुध्द १९८८ च्या भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ (१) (ड) आणि भारतीय दंड संहितेच्या कलम १२0 (ब) खाली गुन्हे नोंद करून लाचलुचपत विभागाला या प्रकरणात सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी आयरिश यांची मागणी आहे. जेनिता या जुने गोवे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत. २0१५-१६ च्या आयकर विवरणपत्रात मंत्री मडकईकर यांनी स्वत: चे वार्षिक उत्पन्न १,४४,३८९ रुपये एवढे अल्प उत्पन्न दाखवले आहे. असे असताना २00 कोटींचा अलिशान बंगला बांधला  कसा असा प्रश्न आयरिश यांनी उपस्थित केला आहे.


 

Web Title: major blow to pandurang madkaikar who just lost his ministerial birth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.