राज्यात ऑगस्टमध्ये मोठे राजकीय बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 01:33 PM2024-07-05T13:33:20+5:302024-07-05T13:34:02+5:30

संकल्पना मंत्रिपद, सुभाष फळदेसाईंना अतिरिक्त खाते तर निलेश काब्रालना सभापतीपद शक्य

major political changes in the goa state in august | राज्यात ऑगस्टमध्ये मोठे राजकीय बदल

राज्यात ऑगस्टमध्ये मोठे राजकीय बदल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनानंतर येत्या ऑगस्ट महिन्यात राज्यात मोठ्या राजकीय बदलांची शक्यता आहे. काँग्रेसमधून आलेल्या आमदारांपैकी संकल्प आमोणकर यांची मंत्रिमंडळात वर्णी लागू शकते. तसेच मंत्री सुभाष फळदेसाई यांना अतिरिक्त खाते दिले जाऊ शकते. तर आमदार निलेश काब्राल यांना सभापतीपद बहाल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. रमेश तवडकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्यमंत्री तीन दिवस दिल्लीत होते. या दौऱ्यात त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांबरोबरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. पक्षाध्यक्षांच्या या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. अलीकडेच मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्या वाढदिनी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना संकल्प यांची इच्छा लवकरच पूर्ण होईल, असे सूतोवाच केले होते. सावंत यांनी त्यांना सुरुवातीलाच बाल भवनच्या अध्यक्षपदी नेमले होते. परंतु ते त्यावर समाधानी नाहीत. त्यामुळे त्यांनी ताबाही घेतलेला नाही.

सप्टेंबर २०२२ मध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत यांच्यासह जे आठ काँग्रेसचे आमदार फुटले. त्यापैकी केवळ आलेक्स सिक्वेरा यांनाच मंत्रिमंडळात घेतले. इतर कोणालाही स्थान दिलेले नाही. संकल्प हे मुख्यमंत्र्यांचे निकटचे मानले जातात. त्यामुळे मंत्रिपदासाठी आता त्यांचेच नाव आघाडीवर आहे. दिगंबर कामत किंवा रमेश तवडकर यांच्यापैकी एकाला येत्या महिन्यात मंत्रीपद मिळू शकते, अशी माहिती मिळाली. 

मंत्र्यांवर आमदार नाराज

पूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना मनोहर पर्रीकर शुक्रवारी भाजप आमदार, मंत्र्यांची बैठक घेत असत. त्यातून संवाद वाढत असे. एकमेकांना भावना समजत असत. अलीकडे या बैठका बंद झाल्या. त्यामुळे संवाद खुंटला आणि दरी वाढली, असाच काहीसा प्रकार झाला आहे. काही मंत्री खुद्द सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांचे फोन स्वीकारत नाहीत, अशा तक्रारी वाढलेल्या आहेत. काही मंत्री तर सचिवालयातही येत नाहीत, काही मंत्री आपली कामे करतच नाहीत असे आमदार सांगू लागले आहेत.

मुख्यमंत्र्यांना बायपास करुन मंत्री, आमदार का जातात दिल्लीला, भाजपमध्ये चर्चा

अलिकडे मुख्यमंत्र्यांना बगल देऊन काही मंत्री, आमदार दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटू लागले आहेत. वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो दाबोळी उड्डाणपुलाच्या प्रश्नावर थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरींना भेटले. आमदार दिगंबर कामत यांनी कोंब-मडगाव येथील रेल्वे ओव्हरबीजसाठी गडकरींची भेट घेऊन साकडे घातले. सभापती रमेश तवडकर यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गडकरी तसेच केंद्रीय संस्कृतीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांची भेट घेतली. गडकरींना त्यांनी 'श्रमधाम' उपक्रमाखाली गरिबांना मोफत देण्यासाठी बांधलेली घरे लाभार्थीना सुपूर्द करण्यासाठी निमंत्रण दिले तर शेखावत यांना काणकोणच्या लोकोत्सवासाठी आमंत्रित केले. अन्य काही आमदार व मंत्रीही अधूनमधून थेट दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांना भेटून येत आहेत. पूर्वी असे घडत नव्हते. ही पक्षांतर्गत बेशिस्त झाली अशा प्रतिक्रिया लोक व कार्यकर्तेही व्यक्त करत आहेत.

दिल्लीत काही घडलेलेच नाही!

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत राजकीय चर्चा झालेली नसल्याचे सांगितले, नजीकच्या काळात मंत्रिमंडळ फेररचना किंवा कोणतेही फेरबदल केले जाणार आहेत का? पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नहा यांच्याशी याबाबतीत चर्चा झाली आहे का, असे प्रश्न केले असता ते म्हणाले की, दिल्लीत तसे काहीही घडलेले नाही. मोपा विमानतळावरील टॅक्सीवाल्यांचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: major political changes in the goa state in august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.