बँड अॅम्बॅसेडर बनून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 03:18 PM2023-12-10T15:18:42+5:302023-12-10T15:19:55+5:30
भाजयुमोतर्फे युवती संमेलन
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : युवकांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ब्रँड अॅम्बॅसेडर व्हा आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवा असे, आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी येथे केले. भाजयुमोने पणजीत आयोजित केलेल्या युवती संमेलनात ते बोलत होते.
यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, भाजयुमो राष्ट्रीय उपाध्यक्षा अर्पिता बडेजेन, भाजप नेते दामू नाईक, गोवा भाजयुमोचे अध्यक्ष समीर मांद्रेकर, सुलक्षणा सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री सावंत म्हणाले, आज पंतप्रधान मोदींचे कार्य पाहता जगभर देशाचे कौतुक होत आहे. तुम्हा सर्वांना त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर होण्याची संधी आहे. फक्त सभांमध्ये सहभागी होऊन फायदा नाही तर त्यासाठी आपण कार्य केले पाहिजे. भाजपने कसा देशभर विकास केला याची माहिती आपल्या मित्र तसेच आजूबाजूच्या लोकांना सांगणे गरजेचे आहे. विकसित भारत बनविण्यासाठी युवक-युवतींची खरी गरज आहे.
पंतप्रधान मोदींमुळे भारत आज विश्वगुरु बनण्याच्या मार्गावर आहे. देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. काँग्रेसच्या काळात दोन पंतप्रधान, दोन संविधान व दोन तिरंगा असल्याचे वाटत होते. पण आता एक प्रधानमंत्री एक तिरंगा व एकच संविधानाचे कार्य दिसते. देशात विविध योजना राबविल्या जात आहेत. गोवा सरकारही विविध योजना महिलांसाठी व गरिबांसाठी राबवित आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महिलांना जहाज प्रशिक्षण देणार: नाईक
केंद्रीय राज्य मंत्री श्रीपाद नाईक उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, आज महिला सर्वच क्षेत्रात पुढे आहे. वैमानिकासह अनेक मोठमोठ्या पदावर महिला आहेत. केंद्रीय जहाज बांधणी मंत्राल- यातर्फे गोव्यातील महिलांना जहाजावर काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पंतप्रधान मोदींचे कार्य आणि भाजपचा विकास पाहून अनेक युवक-युवती भाजपकडे वळत आहेत. सुरवातील भाजपकडे केवळ २ खासदार होते आता २०२४ मध्ये हाच आकडा ४०० पार होणार आहे, असेही म्हणाले.
३३ टक्के आरक्षण भाजपमुळे : तानावडे
राजकारणामध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे काम भाजपने केले आहे. भाजपने कधीच महिला-पुरुष असा भेदभाव केलेला नाही. म्हणूनच आज देशातील महिला सक्षम झाल्यात. मागील अनेक वर्षे काँग्रेस सरकारच्या काळात महिलांना योग्य ते व्यासपीठ दिले जात नव्हते. परंतु, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले आहेत. महिलांसाठी विविध योजनाही भाजपने सुरु केल्या आहेत, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.