आधारभूत किमत २०० रुपये करा, काजू उत्पादकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 04:01 PM2024-04-25T16:01:45+5:302024-04-25T16:02:06+5:30
या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात.
- नारायण गावस
पणजी : यंदाच्या वर्षी काजू उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली असून अनेक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी आता राज्यभरातून शेतकऱ्यांकडून केली जात आहे. किमान दोनशे रुपये आधारभूत करावी अशी मागणी होत आहे. यंदा उत्पादन ५० टक्क्यांनी कमी झाल्याचे अनेक शेतकरी सांगत आहेत. दरम्यान गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी आधारभूतसाठी अर्ज केले हाेते यातील काही शेतकऱ्यांना अजूनही आधारभूत किमत मिळालेली नाही.
या वर्षी काजूला मोठा फटका बसला आहे. यात अवकाळी पाऊस, वातावरणातील झालेला बदल यामुळे काजू उत्पादन घटले असे काही काजू उत्पादक शेतकरी तसेच कृषी तज्ञ सांगतात. पण यंदाच्या वर्षीही सरकारने काजू उत्पादकांना आधारभूत देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी १२५ रुपये दर होता यंदा काजू दर हा १११ ते ११३ रुपये पर्यंत आहे. त्यामुळे या वर्षी आधारभूत किमान २०० रुपये द्यावी अशी मागणी होत आहे. यंदा लागवडही कमी आणि दरात खूप कमतरता असल्याने अनेक शेतकऱ्यांना याचा त्रास झाला. त्यामुळे सरकारने आधारभूत किमती वाढ करावी. सत्तरी काणकोण केपे अशा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी हा पूर्णपणे काजू उत्पादनावर अवलंबून असतात. त्यामुळे या शेतकऱ्यांना या वर्षी मोठी आर्थिक अडचण समारा जावे लागणार आहे.
या वर्षी काजूच्या मशागतीसाठी केलेला खर्चही उभा झालेला नाही. काजू रोपट्यांना खत घालणे तसेच गवत कापणी त्यांना पाणी देणे यासाठी कामगारांची मोठी आवश्यकता असते. या कामगारांचा रोजंदारीवर खूप खर्च येत असतो. त्यांना केलेला खर्चही या काजू उत्पादनातून उभा होत नाही. त्यामुळे सरकारने यंदा किमान २०० रुपये आधारभूत किमत करावी असे सत्तरीतील शेतकरी रामा गावकर यांनी सांगितले. काणकोणचे शेतकरी कृष्णा वेळी म्हणाले, आता काजू व्यावसाय परवडत नाही तसेच पूर्वी सारखा दरही नाही आणि उत्पादनही मिळत नाही. त्यामुळे हा व्यावसाय करणे कठीण झाले आहे. जर सरकारला आता हा व्यावसाय शेतकऱ्यांकडून करुन घ्यायचा असेल तर त्यांना अर्थिक सहाय करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान २०० रुपये आधारभूत किमत द्यावी असे ते म्हणाले.