प्रशासन सक्रिय करण्यास प्राधान्य, म्हादई व खाण प्रश्न हाताळूच : मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 08:37 PM2019-05-28T20:37:57+5:302019-05-28T20:41:25+5:30
खाणींचा प्रश्न लवकरच केंद्राकडे नेणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती
पणजी : निवडणूक आचारसंहिता आता उठलेली असल्याने राज्य प्रशासन सक्रिय करण्यासाठी आपण प्राधान्य देईन. तसेच म्हादई पाणी प्रश्न व राज्याचा खनिज खाणप्रश्न आपण प्राधान्याने हाताळीन, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.
चौघा नव्या आमदारांच्या शपथविधी सोहळ्य़ानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की निवडणूक आचारसंहितेच्या काळात काही प्रकल्प अडकले. काही कामे प्रलंबित राहिली. ती मार्गी लावली जातील. प्रशासनाची घडी मला नीट करायची आहे. शिवाय म्हादई पाणीप्रश्न व खनिज प्रश्नही सोडवायचा आहे. खनिज खाणी लवकर सुरू करण्यासाठी प्राधान्य आहे. आपण अजून हा विषय नव्याने केंद्र सरकारकडे मांडला नाही, कारण केंद्रातील नवे सरकार स्थिरस्थावर होऊ द्या. खाण मंत्रालय सांभाळणारे नवे मंत्री कोण तेही स्पष्ट होऊ द्या. मग मी केंद्राकडे गोव्याचा प्रस्ताव घेऊन जाईन.
मंत्र्यांना अतिरिक्त खाती लवकर देणार काय असे विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, की अगोदर आपण सर्व मंत्र्यांशी चर्चा करीन. त्यांची काय अपेक्षा आहे हे जाणून घेईन. त्यांना कोणते खाते हाताळणो जास्त आवडेल हे मी विचारून घेईन. तसेच आमदारांशी महामंडळांच्या विषयाबाबत बोलेन व मग पाऊले उचलीन. सध्या मंत्रिमंडळाची फेररचना करण्याचा मात्र निर्णय झालेला नाही. येत्या 4 रोजी मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेण्याचा विचार आहे.
4 जून रोजी अधिवेशन
सभापतींची निवड करण्यासाठी 4 जून रोजी विधानसभा अधिवेशन बोलविण्याचा विचार आहे. तारीख अजून निश्चित झालेली नाही. मंत्री विजय सरदेसाई व अपक्षांशी बोलून मी तारीख निश्चित करीन, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हंगामी सभापती मायकल लोबो यांनी मात्र येत्या 4 रोजी विधानसभा अधिवेशन होईल, असे पत्रकारांना सांगितले. अनेक दिवसांचे मोठे पावसाळी अधिवेशन जुलै महिन्याच्या दुस:या किंवा तिस:या आठवडय़ात बोलविले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
दरम्यान, आपल्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार तीन वर्षाचा उर्वरित काळ पूर्ण करील. आमचे सरकार भक्कम आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळातून कुणाला वगळण्याचा वगैरे निर्णय नाही. सत्ताधारी आघाडीतील सहकारी पक्ष व अपक्षांना सोबत घेऊन आपण पुढे जाईन. मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सरकारला पूर्वी दिलेले पाठींब्याचे पत्र मागे घेतले की नाही ते मला ठाऊक नाही. त्यांनी जर पाठींबा मागे घेतला नाही तरी, आमची हरकत नसेल. उद्या चर्चिल आलेमाव यांनी जरी आमच्या सरकारला पाठींबा दिला तरी, आम्ही त्या पाठींब्याचे स्वागत करू. आलेमाव पाठींबा देतो असे अनेकदा सांगतात पण त्याविषयीचे पत्र मात्र देत नाहीत, असे मुख्यमंत्री म्हणाले.