मल्लिकार्जुन महाविद्यालयाला नॅक परिशीलनात 'ए' श्रेणी,
By समीर नाईक | Published: April 26, 2023 05:35 PM2023-04-26T17:35:01+5:302023-04-26T17:35:45+5:30
मल्लिकार्जुन महाविद्यालय नेहमीच होतकरू आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहे.
काणकोण: काणकोण येथील ज्ञान प्रबोधिनी मंडळ संचालित श्री मल्लिकार्जुन व श्री चेतन मंजु देसाई महाविद्यालयाने नुकतीच नॅक परिशीलनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि त्यात महाविद्यालयाने 4 पैकी 3.25 गुण मिळवत 'ए' श्रेणी प्राप्त केली.
मल्लिकार्जुन महाविद्यालय नेहमीच होतकरू आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्याच्या जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आलेले आहे.
विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव झटणारे शिक्षक, सतत कार्यमग्न राहणारा कर्मचारी वर्ग, सर्वांगीण विकासाला नेहमी प्रोत्साहन देणारे प्राचार्य प्रो. डॉ. मनोज कामत व ज्ञान प्रबोधिनी मंडळाचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव मंजुनाथ देसाई, कोषाध्यक्ष राजेंद्र देसाई व कार्यकारी मंडळ आणि शिक्षणाच्या ओढीने या महाविद्यालयात प्रवेश घेणारा प्रत्येक प्रामाणिक विद्यार्थी यांच्या बळावर महाविद्यालयाने नॅकच्या पहिल्या परिशीलन प्रक्रियेत 2.81 गुण मिळवत 'ब' श्रेणी मिळवलेली होती. तीच जिद्द कायम राखत, महाविद्यालयाचा सर्वांगीण विकास साधत महाविद्यालयाने यंदा 'ए' श्रेणी मिळवण्याचा मान पटकावलेला आहे.
30 व 31 मार्च रोजी महाविद्यालयात प्रत्यक्ष नॅक कमिटीचे सदस्य परीक्षणासाठी आले होते. भारतातील विविध भागांतून आलेल्या या सूज्ञ परीक्षकांनी महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज, कार्यालयीन कामकाज, व्यवस्थापन, महाविद्यालयाची इमारत, विज्ञान प्रयोगशाळा, जिमखाना, उपहारगृह, महाविद्यालयातील सर्व तांत्रिक सुविधा इत्यादींची कसून पाहणी केली. आजी माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर वर्ग, व्यवस्थापन, प्राचार्य, पालक संघ इत्यादींशी संवाद साधत सर्व पातळ्यांवर महाविद्यालयाचे परीक्षण केले आणि बारकाईने सर्व घटकांचा अभ्यास करत महाविद्यालयाला 'ए' मानांकन दिले.