इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून कोसळून २३ वर्षीय कामगाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 09:28 PM2020-01-30T21:28:00+5:302020-01-30T21:31:04+5:30
वास्को पोलीसांनी दिली असून हे प्रकरण त्यांच्याकडून सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले आहे.
वास्को - दक्षिण गोव्यातील आल्त दाबोळी भागातील महामार्गाच्या बाजूला बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून रवीचंद्रन बिंद नामक कामगार खाली कोसळून जागीच ठार झाला. मरण पोचलेला हा कामगार २३ वर्षीय असल्याची माहिती वास्को पोलीसांनी दिली असून हे प्रकरण त्यांच्याकडून सध्या अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आले आहे.
वास्को पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक निखील पालयेकर यांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.३०) दुपारी २.३० च्या सुमारास सदर घटना घडली. आल्त दाबोळी येथे एका इमारतीचे बांधकाम चालू असून या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर रवीचंद्रन हा ‘प्लास्टरींग’ चे काम करत होता. रवीचंद्रन हा ‘पेन्टर’ असून प्लास्टरींगचे काम करताना अचनक तो सहाव्या मजल्यावरून खाली जमनीवर कोसळून जागीच ठार झाल्याची माहीती पोलीसांनी दिली. पोलीसांना माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन मयत रवीचंद्रनच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो शवचिकित्सेसाठी बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात पाठवून दिला.
मरण पोचलेला रवीचंद्रन हा शांतीनगर, वास्को भागात मागच्या काही काळापासून राहत असून तो मूळ उत्तरप्रदेश येथील असल्याची माहिती पोलीसांनी दिली. रवीचंद्रन या इमारतीवरून अपघाती पडला की यामागे अन्य काही कारण आहे का याबाबत पोलीस तपास करीत असून सध्या हे प्रकरण अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निखील पालयेकर यांनी दिली. वास्को पोलीस सदर प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.