मांडवी नदी होणार प्रदूषणमुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 01:12 PM2017-11-24T13:12:36+5:302017-11-24T13:24:27+5:30
मलनि:स्सारण प्रकल्पांवर भर : ८00 कोटींचे प्रकल्प
पणजी : गोव्यातील मांडवी नदी प्रदूषणमुक्त आणि स्वच्छ रहावी यासाठी मलनि:स्सारण प्रकल्पांवर भर दिला जात आहे. मलनि:सारण महामंडळाने ७११ कोटी ७५ लाख रुपये खर्चाची काही प्रकल्पांची मोठी योजना तयार केली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याने सुमारे ८ कोटी ७२ लाख रुपये, पंचायत खाते तसेच महापालिकेने ८८ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचे प्रस्ताव ठेवले आहेत.
मांडवी नदीच्या किना-यावरील कारखाने तसेच असंख्य घरांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. राजधानी शहरात तर कसिनो तसेच जलसफरी करणा-या बोटींनी गर्दी केल्याने मोठे प्रदूषण होत आहे. पाच कसिनो आणि पर्यटकांना जलसफरी घडवून आणणा-या दहाहून अधिक बोटी येथे आहेत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने (एनआयओ) केलेल्या संशोधनात नदीतील प्रदूषण आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर मलनि:सारण महामंडळाने व्यापक योजना तयार केली आहे. मांडवी नदीत मालिम जेटीवर सुमारे ३५0 हून अधिक मच्छिमारी ट्रॉलर्स आहेत. पणजी व आजुबाजुच्या परिसरासाठी मच्छिमारी खात्यानेही काही प्रस्ताव ठेवले आहेत. सप्टेंबर २0१८ पर्यंत ८0८ कोटी ४७ लाख रुपये खर्चाचे प्रकल्प येतील.
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या अहवालानंतर राष्ट्रीय हरित लवादाने गेल्या २१ जुलै रोजी सरकारला या नदीच्या स्वच्छतेसाठी कालबध्द कार्यक्रम आखण्याचा आदेश दिला होता. मंडळाने सलग २८ महिने या नदीतील प्रदूषणाचा अभ्यास केला. एनआयओच्या अभ्यासात या नदीतील पाण्यात ‘फीकल कॉलिफॉर्म’चे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले आहे. येथील आरोग्य संचालनालयानेही पाहणी केली. नदी तटावरील रेइश मागुश, बिठ्ठोण, नेरुल, कांदोळी, मयें आदी उत्तरेकडील भागात तसेच जुने गोवें, गोलती-दिवाडी, खोर्ली, करमळी आदी दक्षिणेकडील भागातील घरे, कारखाने, व्यावसायिक आस्थापनांमधून सांडपाणी थेट नदीत सोडण्यात येत असल्याचे आढळून आले. काही भागात नदी तटावर एवढी दाट लोकवस्ती आहे की तेथील घरांना सोक पिट बांधणे शक्य नाही.
ताळगांव, दोनापॉल, करंझाळे आदी भागांसाठी मलनि:स्सारण महामंडळाने १५ एमएलडी प्रकल्पाचा प्रस्ताव ठेवला असून त्यासाठी १४४ कोटी २५ लाख रुपये खर्च येणार आहे. पर्वरी, बिठ्ठोण भागासाठी २८३ कोटी ५0 लाख रुपये खर्चाच्या प्रकल्पाचा प्रस्ताव आहे. साल्वादोर दु मुंद ,पेन्ह द फ्रान्स, सुकूर, नेरुल, पिळर्ण, रेइश मागुश, पोंबुर्फा आदी भागातील लोकांना याचा फायदा होईल. जुने गोवेंसाठी २८४ कोटी रुपये मलनि:स्सारण प्रकल्पाचा प्रस्ताव आहे.