'मंगेशी मंदीरातील विनयभंग प्रकरणी चौकशी व्हायला हवी'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 06:29 PM2018-07-19T18:29:33+5:302018-07-19T18:29:40+5:30
मंगेशी येथील श्री मंगेशी मंदिर समितीकडे सादर झालेल्या विनयभंगाच्या दोन तक्रारींबाबत चौकशी व्हायला हवी
पणजी : मंगेशी येथील श्री मंगेशी मंदिर समितीकडे सादर झालेल्या विनयभंगाच्या दोन तक्रारींबाबत चौकशी व्हायला हवी, असे मत राज्याचे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे आणि पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष असलेले भाजप आमदार निलेश काब्राल यांनी व्यक्त केले आहे.
दोघा तरुणींनी मंगेशी मंदिर समितीकडे विनयभंगाची तक्रार केलेली आहे. यापैकी एक तरुणी ही एमबीबीएसचे शिक्षण घेत असून ती अमेरिकेत राहते. या तरुणी मंगेशी मंदिरात आल्या होत्या, तेव्हा तेथील पुजारी धनंजय भावे याने त्यांना पकडले व विनयभंग केला अशी तक्रार आहे. प्रदक्षिणा घालण्यास सांगून मग आपल्याला घट्ट पकडले व अत्यंत गैरवर्तन केले अशा प्रकारच्या तक्रारींविषयी सोशल मिडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. याविषयी पत्रकारांनी गुरुवारी मंत्री गावडे यांना पर्वरी येथील विधानसभा प्रकल्पाबाहेर विचारले असता, ते म्हणाले की मला या प्रकरणी चौकशी झालेली हवी आहे. मी स्वत:ही या प्रकरणी चौकशी करून घेत आहे. हे मंदिर माङया मतदारसंघात येते.
मंत्री गावडे म्हणाले, की मी मंदिराच्या समितीवरील कुणाला विचारलेले नाही. पण विनयभंगाच्या तक्रारीविषयी ग्रामस्थ आणि तेथील रहिवासी काय म्हणतात ते मला जाणून घ्यायचे आहे.
आमदार काब्राल हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की मंदिर ही पवित्र जागा असते, अशा जागेच्या ठिकाणी विनयभंग केला जाणो हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. पोलिसांनी सखोल तपास काम करायला हवे. मंदिर, मशिद, चर्च असो किंवा रस्त्यावर कुणी विनयभंग केलेला असले तरी, त्या प्रकरणी कारवाई व्हायला हवी.
मंदिर समितीने आपण केलेल्या एका तक्रारीच्या चौकशीवेळी सकृतदर्शनी पुरावा मिळालेला नाही, असे पत्रत म्हटले आहे.
दरम्यान, मंगेशी मंदिर हे फोंडा तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध मंदिर असून या मंदिराचे भाविक जगात अनेक ठिकाणी आहेत. या मंदिराला रोज मोठय़ा संख्येने लोक भेट देतात. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मंगेशी गावातील हे मंदिर जगात प्रसिद्ध आहे. आता निर्माण झालेल्या वादामुळे मात्र राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.