म्हापशेकरांचे मनोहर पर्रीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:04 PM2019-03-18T14:04:33+5:302019-03-18T14:04:55+5:30
जन्माने पर्रा गावचे; पण कर्माने म्हापशेकरांचे अशी ओळख असलेले मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा शहराच्या सीमेवर वसलेल्या पर्रा या शांत तसेच निसर्गरम्य गावी झाला.
- प्रसाद म्हांबरे
जन्माने पर्रा गावचे; पण कर्माने म्हापशेकरांचे अशी ओळख असलेले मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा शहराच्या सीमेवर वसलेल्या पर्रा या शांत तसेच निसर्गरम्य गावी झाला. शांत, संयमी, विनम्र, सुस्वभावी अशा गोपाळकृष्ण पर्रीकर तसेच तेवढीच कडक शिस्त, कणखर; पण मायाळू स्वभाव, कर्तृत्ववान, अर्थनियोजक, व्यवस्थापक अशा त्यांच्या मातोश्री राधाबाई (ताईबाय) यांच्या उदरी मनोहर पर्रीकर यांचा जन्म १३ डिसेंबर १९५५ रोजी झाला. पर्रीकर घराण्यात जन्माला आलेल्या पाच भावंडांतील मनोहर चौथा. एकूण तीन बंधू व दोन बहिणी. सर्वात थोरली ज्योती कोटणीस त्यानंतर दुसरी लता शंखवाळकर. तिसरा अवधूत, चौथा मनोहर व सर्वात शेवटी सुरेश.
जन्मासोबत सर्वांचे बालपण पर्रातील घरात साध्या पद्धतीने गेले. दुसरी बहीण लता सोडल्यास सर्वांचे सुरुवातीचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण पर्रा येथे पूर्ण झाले. त्यानंतरच्या शिक्षणानिमित्त म्हापसा येथे आजोळी शिवा कामत धाकणकर यांच्या घरी दाखल झाले. मनोहरांच्या वडिलांचा म्हापशातील त्याकाळी जुन्या मार्केटमध्ये किराणा दुकानाचा व्यवसाय होता. त्यामुळे व्यवसायानिमित्त तेसुद्धा सतत म्हापशात असायचे. सर्व भावंडे आजोळी असल्याने मनोहरांच्या मातोश्रीने आपल्या सर्व मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या पतीसमवेत म्हापशाला येण्याचा निर्णय घेतला व कुटुंब म्हापशात स्थलांतरित झाले.
सुरुवातीला म्हापसा-खोर्ली इथे भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली. नंतर स्वत:चे खोर्ली इथे घर घेतले. म्हापशातील सारस्वत विद्यालयाच्या मराठी शाळेत प्रवेश मिळवला. अप्री (लोवर केजी) खाप्री (अप्पर केजी) ते इयत्ता चौथीपर्यंतचे शिक्षण मराठीतून याच शाळेत घेतले. शिक्षणात मनोहर हुशार असल्याने त्याला डबल प्रमोट करण्यात आले. त्यामुळे त्या काळी इतरांपेक्षा एक वर्ष अगोदर १५व्या वर्षी त्यांनी एसएससी पूर्ण केली. इतर विषयांबरोबर त्याचे गणितही अतिशय चांगले होते. त्यामुळे प्रमोशनात गणिताचा बराचसा फायदा त्यांना झाला. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वर्गात त्यांनी दंगामस्ती केली असली तरी त्यांना शिक्षकाकडून कधी मार खावा लागला नाही, शिक्षकांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड मान व आदर होता.
चौथीतील शिक्षण पूर्ण करून म्हापसा हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत प्रवेश मिळवला. बालपणी त्यांचा स्वभाव हट्टी व थोडा दंगामस्ती करणारा असल्याने त्यांच्या या स्वभावात सुधारणा व्हावी, त्यांच्या स्वभावावर लगाम यावा, ते सुस्वभावी व्हावेत म्हणून मनोहरांच्या आईने त्यांना इयत्ता आठवीत त्यांच्या मामाकडे मडगावला शिक्षणासाठी पाठवले. तिथे लॉयोला हायस्कुलात त्यांनी प्रवेश घेतला; पण तेथेही त्यांच्या बेधडक स्वभावामुळे त्याचे पुढील शिक्षण पूर्ण होऊ न देता मामाने त्यांना ठेवून न घेण्याचा निर्णय घेत त्यांना आपल्या घरी माघारी पाठवून दिले. नंतर इयत्ता ९ वी पासून त्यांनी म्हापशातील न्यू गोवा हायस्कुलात प्रवेश मिळवला. इयत्ता दहावी व अकरावी (त्या वेळेची एस. एस. सी.) त्यांनी वयाच्या १५ वर्षी इथेच पूर्ण केली. त्यानंतर इंटर शिक्षणासाठी सेंट झेवियर कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तेथेच त्यांनी ते पूर्ण केले.
स्वत:च्या गुणवत्तेवर, स्मरणशक्तीवर मनोहरांना जबरदस्त विश्वास असल्याने त्यांना अभ्यासाच्या पुस्तकात सतत डोके घालण्याची गरज भासली नाही. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे घरी येऊनही कधी अभ्यास केला नाही. परीक्षेच्या दिवसांत तर संध्याकाळच्या वेळी अभ्यास न करता चक्क ते खेळायला जात असत. त्यामुळे वर्गात शिकवताना डोक्यात साठवलेला अभ्यास बरोबर उत्तरपत्रिकेवर उतरत असे. गणितात तर त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळायचे. इतर विषयांतही एवढ्याच तोडीचे गुण त्यांना मिळत असत. त्यांना वाचनाचीही दांडगी आवड होती.
सेंट झेवियर कॉलेजमध्ये असताना मनोहरांनी कधीच कॉलेजातील वाचनालयाचे तोंड बघितले नाही. तरीही वर्गात ते पहिले यायचे. वर्गात प्राध्यापक जे शिकवत होते ते एकाग्रतेने, शांतपणे ऐकून तेच ग्रहण करायचे. त्यांची जमेची बाजू म्हणजे अतिशय सुवाच्च अक्षराने लिहिलेला अभ्यास. कुणाचे घाणेरडे अक्षर त्यांना आवडतही नसे. शालेय शिक्षणाच्या काळात शाखेवर जाणे सुरू झाले. त्या वेळी मनोहर अवघ्या १२ वर्षांचे होते. खेळायला मिळते म्हणूनच शाखेवर जायला सुरुवात केली. नंतर शाखेवर जाणे नित्यनेमाने वाढत गेले.
जसे त्यांचे प्रौढत्व वाढत गेल्याने त्यातील गंभीरता त्यांना लक्षात येऊ लागली. इथेच त्यांच्यावर संस्कार, नेतृत्व, एकाग्रता, संयम तसेच इतर विषयांना प्रेरणा मिळाली. जन्मताच हिरा असलेल्या मनोहरांवर संघाने पैलू पाडले. संघाच्या शिक्षकांचे योग्य मागदर्शन मिळाल्याने ते घडू शकले. शाखेवर लाभलेल्या संस्कारांचा तसेच इतर मार्गदर्शनाचा पर्रीकरांना खऱ्या अर्थाने राजकीय कारकिर्दीत फायदा झाला. त्यातून दर्जेदार नेतृत्व ते राज्याला देऊ शकले.
इंटरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनोहरांची हुशारी पाहून वडिलांच्या मनात त्यांनी डॉक्टर व्हावे अशी इच्छा होती; पण स्वत:चे निर्णय स्वत:च घेणाऱ्या मनोहरांनी इंजिनियरिंगला प्रवेश घेण्याचे ठरवले. इंटर सायन्सला ए गु्रप घेऊन इंजिनियर होण्याची पूर्वतयारी केली. इंटर सायन्स परीक्षेत आय.आय.टी. प्रवेश परीक्षेला बसले. त्यांना चार ठिकाणी प्रवेश मिळाला. आय.आय.टी. पवई, आय.आय.टी. कानपूर, व्ही.जे.टी.आय. व जीईसी (गोवा इंजिनियरिंग कॉलेज) कानपूरला जाण्यासाठी वडिलांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन मनोहरांनी आय.आय.टी. पवई येथे प्रवेश घेण्याचे पसंत केले. प्रवेश घेताना त्यांनी धातुशास्त्र (मॅटलर्जी) या शाखेची निवड केली. तेथेही त्यांनी आपला ठसा उमटवला होता. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुकुंद आर्यन स्टीलमध्ये काही काळ नोकरीही पत्करलेली.
मुंबईत बोरवली येथे मनोहर यांच्या मामाच्या घरी राहाणाºया त्यांच्याच नात्यातील मुलीवर त्यांचे प्रेम जुळले. लोणावळा येथील मेधा कोटणीस. तीही त्यांच्या मामाच्या घरी नोकरी निमित्त राहात होती. २ जून १९७९ साली मनोहर २३ वर्षांचे असताना त्यांनी मेधाशी मुंबईतच लग्न केले. लग्नानंतर त्यांनी मुंबईतील नोकरी सोडून दिली होती. गोव्यात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार करून पत्नी मेधाला घेऊन ते घरी गोव्यात स्वगृही परतले. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. मुंबईतून परत आल्यानंतर मनोहरांनी हायड्रोलिक सिलिंडर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. तसेच त्याच्याजवळ म्हापसा शहराचा संघचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. वेळेचं व्यवस्थापन कसे करावे, हा गुण मनोहरांकडून शिकून घेण्यासारखा असल्याने स्वत:चा व्यवसाय व संघाचे काम चोखपणे बजावीत होता. हे करीत असताना त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल घालायला सुरुवात केली. राजकीय क्षेत्रात सुरुवातीच्या काळात जरी त्यांना आपला जम बसवायला उशीर लागला असला तरी त्यांनी नंतर माघारी वळून बघितले नाही.
याच दरम्यान मनोहर यांच्या घरी उत्पल व अभिजात हे दोन तारे जन्माला आले. त्यामुळे तारेवरच्या कसरतीप्रमाणे त्यांनी आपले सर्व व्याप व्यवस्थितपणे सांभाळत चरितार्थ चालविला. त्यांच्या पत्नीची यथायोग्यपणे त्यात त्यांना साथही लाभली. म्हणूनच तर पर्रीकर यशस्वी होऊ शकले. जीवनात पत्नीची कमतरता भासूनही तसेच अनेक समस्यांना यशस्वीपणे तोंड देऊनही त्यातून मार्गक्रमण केले. मुख्यमंत्री असताना सरकारच्या लाल दिव्याच्या गाडीतून आपल्या मुलाला न्यू गोवा हायस्कुलात सोडण्यासाठी न जाता अनेकवेळा ते आपला मित्र संजय वालावलकर यांच्या दुचाकीवरून मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेलेले आहेत. मुख्यमंत्री असताना सुरुवातीला रात्रीच्या वेळी सरकारी फाइल्स घेऊन ते म्हापशातील खोर्ली येथील आपल्या घरीही यायचे.
सुरुवातीला १९९७ साली मनोहर यांचे वडील गोपाळकृष्ण यांना व त्यांच्या बाराव्याला त्यांची आई राधाबाई यांना देवाज्ञा झाली. २००० साली त्यांची पत्नी मेधाचे निधन झाले. अडीच वर्षांच्या अंतरात त्यांचे घर रिक्त झाले होते. कमी वेळात त्यांनी बरेच गमावले होते. घरात एकामागून एक अशा झालेल्या आघातातून त्यानी मानसिक संतुलनावर कधीच परिणाम व्हायला दिला नाही. त्यांनी आंगीकारलेली लढावू वृत्तीच त्यांना त्यांच्या घरच्या संकटसमयी कामी आली.
आजच्या घडीला म्हापशातून त्यांचा क्वचित एखादा विरोधक आढळून आला असला तरी तो विरोधक पर्रीकरांचा वैयक्तिक विरोधक नसून त्यांच्या राजकीय क्षेत्रातील असलेला विरोधक होता. त्यामुळे प्रत्येक म्हापशेकराच्या मनात त्यांच्याविषयी मान-सन्मान आदर असल्याचे आढळून येते. एका सामान्य व्यक्तीच्या घराण्यात जन्माला आलेली व्यक्ती त्याच्या असामान्य कर्तृत्वामुळे देशाच्या संरक्षणमंत्रिपदावर आरूढ होते, ही गोष्ट सर्वांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशामुळे आज त्यांनी प्रत्येक म्हापशेकराच्या घरात मानाचे स्थान बाळगले आहे. प्रत्येकजण त्यांच्याबद्दल आदर बाळगूनही आहे.