मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:12 PM2019-03-18T12:12:04+5:302019-03-18T12:19:18+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे.
पंकज शेट्ये
वास्को - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याच्या विकासासाठी, गोमंतकीय लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले असून त्यांच्या निधनाने गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. मनोहर पर्रीकर व माझी मागच्या ४० वर्षापासून मैत्री असून स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चालन, डाऊन टू अर्थ असे व्यक्तीमत्व आम्ही सर्वांनीच गमावलेले असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे रविवारी (17 मार्च) निधन झाल्याचे वृत्त मिळताच उशिरा रात्री नितीन गडकरी गोव्यात दाखल झाले. याप्रसंगी गोव्यात दाखल झाल्यानंतर बोलताना मनोहर पर्रीकर केवळ भाजपचे नेते नव्हते तर ते माझे जीवलग मित्र असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगून मागच्या ४० वर्षापासून आमची दोघांची मैत्री असल्याचे सांगितले. जेव्हा मी महाराष्ट्रातून भाजपचे काम करायचो तेव्हापासून आपण गोव्यात येत असून आमची दोघांची घनिष्ठ मैत्री होती असे गडकरी यांनी सांगितले. संघटनेच्या व आपल्या तत्वावर चालण्यासाठी वचनबद्द, एकदम विनम्र, स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ चाल - चलन यांचे मनोहर पर्रीकर एक चांगले उदाहरण असल्याचे गडकरी यांनी याप्रसंगी सांगून त्यांनी सतत गोव्याच्या विकासासाठी व हितासाठी काम केलेले असल्याचे म्हणाले.
मनोहर पर्रीकर यांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गोव्याचा आणखी विकास कसा करायचा, गोमंतकीय नागरीकांच्या हितासाठी कसे काम करायचे याकरीताच झिजलेले असून त्यांच्या निधनामुळे गोव्याचे मोठे नुकसान झाले आहे. पर्रीकरांच्या निधनामुळे गोव्याबरोबरच भारतीय जनता पक्षाचे सुद्धा मोठे नुकसान झाले असल्याचे गडकरी म्हणाले. जेव्हा भाजप गोव्यात शून्यातून वर येत होता तेव्हापासून मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात भाजपच्या विकासासाठी काम केलेले असून गोव्यात भाजपची सत्ता स्थापन करण्यात व लोकसभेत भाजपचे दोन्ही खासदार निवडून आणण्यामागे पर्रीकरांचा सिंहाचा वाटा असल्याचे गडकरी यांनी सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी सतत गोव्याच्या विकासासाठी, जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी काम केलेले असून असा नेता भविष्यात मिळणे एकदम कठीण असून त्यांचे स्वप्न पुढे नेण्यासाठी नेत्यांनी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून काम करणे गरजेचे असल्याचे याप्रसंगी सांगितले. मनोहर पर्रीकर यांनी गोव्याच्याच नव्हे तर देशाच्या हितासाठी सुद्धा अनेक उत्तम कामे केली असून देश त्यांना कधीच विसरू शकणार नसल्याचे ते शेवटी बोलताना म्हणाले.
गोव्यातील ‘अटल सेतू’ या मांडवीवरील तिसऱ्या पूलाच्या उद्घाटन समारंभावेळी माझी व पर्रीकरांची शेवटची भेट
मनोहर पर्रीकर यांनी आपल्याला ‘अटल सेतू’ पूलाच्या उद्घाटनाला बोलविल्यानंतर आपण या समारंभाला आल्यानंतर प्रथम त्यांची त्यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतल्याची माहिती गडकरी यांनी दिली. मनोहर पर्रीकर हे गोव्याच्या विकासाचे एक ‘आदर्श स्तंभ’ असल्याची प्रतिक्रिया नितीन गडकरी यांनी व्यक्त करून ‘अटल सेतू’ पूलाच्या उद्घाटनाच्या वेळी आमची दोघांची शेवटची भेट असल्याचे त्यांनी सांगितले.