पर्रीकरांनी आयुष्यभर जपल्या पर्रा येथील कलिंगडाच्या स्मृती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:00 PM2019-03-18T14:00:58+5:302019-03-18T14:49:14+5:30
म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत.
पणजी - म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या ज्या पर्रा गावात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जन्मले त्या गावाची खासियत म्हणजे तेथील चविष्ट कलिंगड. पर्रीकर आपल्या भाषणांतून अनेकदा या कलिंगडांची खासियत सांगत असत. पर्रा येथील या कलिंगडांशी जणू त्यांचे भावनिक नाते होते. जाहीर सभांमधील भाषणे असो किंवा विधानसभेतील, एकही त्यांचे भाषण असे नसेल की ज्यामध्ये या कलिंगडांचा उल्लेख झालेला नसेल.
कलिंगडाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्मृतीही त्यांनी अनेकदा भाषणातून जागवल्या. ते म्हणत असत की, लहान असताना कलिंगड खाण्यासाठी आम्ही शेतावर जायचो तेव्हा शेतकरी मोठे कलिंगड खाण्यासाठी मोफत देत असत पण त्यांची एक अट असे, ती म्हणजे कलिंगड खाल्यानंतर तोंडात ज्या बिया राहतात त्या बाजूला टोपलीत टाकायच्या. आम्ही तसे करत असू आणि शेतकरी या बियांचे संवर्धन करून नंतर पुढील मोसमात नवे पीक घेण्यासाठी त्या बिया वापरत असत. त्यामुळे नवे पीकही मोठ्या कलिंगडांचे मिळत असे परंतु अलीकडच्या काळात ही पद्धत बंद झाली. दिवसेंदिवस कलिंगड छोटी होत गेली आणि आता या कलिंगडांना पूर्वीची सर राहिलेली नाही, अशी खंत ते व्यक्त करीत असत.
मुंबईतही जपल्या स्मृती
पर्रीकर सांगायचे की, मी मुंबईत पवई येथे आयआयटीमध्ये शिकण्यासाठी गेलो. तेथे शिक्षण पूर्ण करून तब्बल साडे सहा वर्षांच्या कालखंडानंतर मी पर्रा येथे आलो तेव्हा पूर्वीसारखी कलिंगड दिसली नाहीत. बाजारात फिरलो परंतु ती कलिंगड गायब झालेली होती. शेतकरी आम्हाला बालपणात केवळ बियांसाठी मोफत कलिंगडे खाऊ घालीत होता. त्याचा पुत्र आता शेती करू लागला होता. बाजारात चांगला दर मिळत असल्याने त्याने मोठी कलिंगडे मुलांना मोफत खाऊ देणे बंद केले होते. त्यामुळे त्याला बियाही मिळणे बंद झाले आणि बाजारात छोटी कलिंगड येऊ लागली.
पर्रीकर म्हणत की, दर २५ वर्षानंतर पिढी बदलते. आज आम्ही ज्या चुका करत आहोत त्याचे परिणाम दोनशे वर्षानंतरही दिसू शकतात.