मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते..
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 12:23 AM2019-03-18T00:23:06+5:302019-03-18T00:23:36+5:30
मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी र्पीकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेकांना आठवल्या. गेले वर्षभर कॅन्सरशी झुंजल्यानंतर व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आजारपणातही गोव्याची चिंता वाहिलेला हा नेता शेवटी धारातीर्थी पडला.
- सदगुरू पाटील
पणजी - मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते या कविवर्य सुरेश भटांच्या ओळी पर्रीकर यांच्या निधनाच्या वृत्तानंतर अनेकांना आठवल्या. गेले वर्षभर कॅन्सरशी झुंजल्यानंतर व प्रचंड इच्छाशक्तीच्या बळावर आजारपणातही गोव्याची चिंता वाहिलेला हा नेता शेवटी धारातीर्थी पडला.
1994 सालचा काळ. लांब हाताचा इ ी न केलेला शर्ट आणि शर्टाच्या रंगाला मॅच न होणारी पँट घालून पर्रीकर जुन्या सचिवालयातील प्रेस रुममध्ये धावत धावत यायचे. पणजीतील आदिलशाह पॅलेसमध्ये तळमजल्यावर प्रेस रुम होता. भाजपवर झालेल्या टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी किंवा आपल्याकडील नवी माहिती पत्रकारांना देत दुस-या दिवशी प्रसार माध्यमांना हेडलाईन पुरविण्यासाठी पर्रीकर प्रेस रुममध्ये यायचे. पत्रकारांच्या बाजूची प्लॅस्टीक खुर्ची थोडी ओढून घेत ते बसायचे. त्यांना बिनसाखरेचा चहा लागायचा. चहाचा कप हातात घेत मग ते भडाभड आपल्याकडील माहिती द्यायचे. काँग्रेसच्या नेत्यांवर बेधडक आरोप करायचे. त्यावेळी राणे सरकार अधिकारावर होते आणि राणेंच्या त्यावेळच्या चार मंत्र्यांचा उल्लेख पर्रीकर गँग ऑफ फोर असा करायचे.
अफाट उत्साह, प्रचंड धाडस, राग आला तर विरोधकांना तोंडातून अस्सल गोमंतकीय शिवी देत पर्रीकर बोलायचे. रिलायन्स साळगावकरशी झालेला वीज करार, माविन गुदिन्हो यांचे वीज अनुदान प्रकरण, तिळारीच्या कालव्यांचे निकृष्ट बांधकाम, ढासळलेली कायदा व सुव्यवस्था असे अनेक विषय 1994 सालानंतर विधानसभेत पर्रीकर सतत गाजवत राहिले आणि वारंवार पत्रकार परिषदा घेत व वारंवार प्रसार माध्यमांच्या संपर्कात राहत पर्रीकर आपले मुद्दे लोकांर्पयत पोहचवत राहिले. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. आमच्यासारखे अनेक पत्रकार पर्रीकर यांच्याकडे जायचे तेव्हा तुम्ही माझ्या गाडीत बसा आपण गाडीतच बोलत बोलतच मुलाखत पूर्ण करूया असे पर्रीकर सांगायचे. आपले मुद्दे आणि सरकारविरोधी आपली टीका अधिकाधिक लोकांर्पयत पोहचविण्यासाठी वर्तमानपत्रंच्या शक्तीचा व्यथायोग्य वापर करण्याचे जबरदस्त कौशल्य पर्रीकर यांच्याकडे होते. पर्रीकर विरोधी पक्षनेते झाले तेव्हा ते खूप व्यस्त असायचे. गोव्यातील विविध समस्या घेऊन अनेक सामाजिक कार्यकर्ते, आरटीआय कार्यकर्ते आणि अन्य लोक विरोधी पक्षनेत्याच्या दालनामध्ये हक्काने यायचे. पर्रीकरांसमोर मांडला गेलेला विषय पर्रीकर दुस-या दिवशी गाजवतील याची लोकांना खात्री असायची. पर्वरीतील विधानसभा प्रकल्पात विरोधी पक्षनेत्यासाठी असलेल्या दालनाचा पर्रीकर यांनीच सर्वाधिक चांगल्या प्रकारे वापर केला. आम्ही अनेकदा त्या दालनात जात असे तेव्हा मुख्यमंत्र्याच्या केबिनबाहेर लोक कमी पण पर्रीकरांच्या केबिनबाहेर पर्रीकर यांच्यासाठी थांबलेले लोक जास्त अशी स्थिती दिसायची. पर्रीकर यांच्यावरील कामाचा ताण व स्ट्रेस कधी कधी त्यांच्या स्वभावातून अनुभवास यायचा. त्यांचा स्वभाव त्या स्ट्रेसमुळे थोडा चिडचिडा व रुक्ष झाला होता याचाही अनुभव आम्ही घेतला. काहीवेळा त्यांना एखादे भाजपविरोधी वृत्त छापून आलेले आहे असे आठवले तर ते थोडे नाराज व्हायचे. आपले म्हणणे ते मांडायचे पण त्यांची ती नाराजी क्षणिक असायची. पर्रीकरांचा स्वभाव तापट होता. मुख्यमंत्रीपदी असताना सकाळी साडेसात वाजताच ते लोकमतसारखे वृत्तपत्र वाचायचे. विशेषत: खनिज खाणप्रश्नी एखाद्या वृत्तात चुकीची माहिती आलेली आहे असे आढळले तर पर्रीकर साडेसातलाच फोन करायचे. खुलासा छापू नका पण तुम्हाला कळायला हवे म्हणून सांगतो, असे तावातावाने माझ्याशी पर्रीकर बोलायचे. मात्र दुस-या दिवशी त्यांच्या मनात कोणताही राग नसायचा हे प्रत्यक्ष भेटीवेळी कळायचे. पर्रीकर यांनी राजकारणात समर्थक प्रचंड जोडले व शत्रूही अनेक निर्माण केले. पर्रीकर संरक्षण मंत्रीपदी असताना आम्हाला चौदा-पंधरा पत्रकारांना दिल्लीत त्यांच्या कार्यालयाला भेट देण्याचा व राज्यसभेतच्या प्रेक्षक दालनात बसून त्यांचे काम पाहण्याची संधी मिळाली. तुमचे गोव्याचे पर्रीकर अगदी साध्या पद्धतीने वागतात असे काही केंद्रीय मंत्री, काही मंत्र्यांचे कर्मचारी वगैरे सांगायचे. गोव्यातील भाजपचे ते ख-या अर्थाने बाप ठरले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने पूर्ण गोवाच नव्हे तर विरोधी पक्षही सून्न झाला.