मनोहर पर्रीकर म्हणजे निश्चयाचा महामेरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:26 AM2019-03-18T01:26:37+5:302019-03-18T01:28:39+5:30

मनोहर पर्रीकर यांचे बालमित्र संजय वालावकर यांनी सांगितलेला मनोहर पर्रीकर यांच्या जीवन प्रवासाचा आढावा

Manohar Parrikar is the determination of Mahmeru | मनोहर पर्रीकर म्हणजे निश्चयाचा महामेरू

मनोहर पर्रीकर म्हणजे निश्चयाचा महामेरू

googlenewsNext

- संजय वालावकर
( मनोहर पर्रीकर यांचे बालमित्र)
मनोहर पर्रीकर म्हणजे आत्मविश्वासाचा महामेरू. दूरदृष्टी असलेला, निर्भीड, अभ्यासूवृत्तीचा, बेधडक, अतुलनीय स्मरणशक्ती, अशक्य हा शब्द माहीत नसलेला; पण तेवढेच प्रेमळ व्यक्तिमत्त्व. त्याचा स्वभाव फणसासारखा. हात लावला तर काटे लागतात, खायला गेलो तर गोड लागतो. त्यामुळे बाहेरील काटे सहन करून आतील गरे खाण्याची कुवत ज्याच्याजवळ आहे त्यालाच मनोहर कळू शकतो. तोच त्याला डोक्यावर घेऊ शकतो; पण ज्याला मनोहर कळलाच नाही, आतील गरे खाल्लेच नाहीत तो मनोहरपासून दूर निघून जातो. टोचलेले काटे सोशीत.
१३ डिसेंबर १९५५ चा तो दिवस. म्हापसा शहराच्या सीमेवर वसलेल्या पर्रा या शांत तसेच निसर्गरम्य गावी गोपाळकृष्ण पर्रीकर यांच्या घरात नररत्न जन्माला आले. असे म्हणतात की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. तसाच पायगुण या बालकाचा होता. देवाने जणू भविष्याची जाण ठेवूनच या बालकाला जन्माला घातले होते, असे त्याला बघितल्यावर त्यावेळी सगळ्यांनाच वाटले. राज्याच्या, देशाच्या हितासाठी वावरणारा एका बालकाचा त्या दिवशी जन्म झाला होता. आज वयाच्या साठीत प्रवेश केलेल्या त्यावेळेच्या बालकाच्या खांद्यावर देशाच्या संरक्षणाची अतिमोठी तसेच शिवधनुष्य पेलावे एवढ्या ताकदीची जबाबदारी दिली आहे. त्याच्यातील हिकमतीच्या जोरावर तो हे शिवधनुष्य पेलणार, यात यशस्वीही होणार यात तसूभर देखील शंका नाही. फक्त प्रत्येक व्यक्तीने त्याचे हात सक्षम करून त्याची ताकद वाढवण्याची खरी गरज आहे.

कुटुंबातला मनोहर
बालपणीच राजबिंडे तेज त्याच्या श्रीमुखावर झळकत होते. निर्धार, आत्मविश्वास बघितल्यावर दुसऱ्याच्या मनात भरणारा, मन हरवून घेणारा मनावर मोहिनी घालणारी व्यक्ती म्हणजे मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर. म्हणूनच कदाचित त्याचे नाव मनोहर ठेवले असेल. जे त्याला, त्याच्या स्वभावाला तंतोतंत जुळले. पर्रीकर घराण्यात जन्माला आलेल्या पाच भावंडांतील मनोहर चौथा. एकूण तीन बंधू व दोन बहिणी. सर्वात थोरली ज्योती कोटणीस त्यानंतर दुसरी लता शंखवाळकर. तिसरा अवधूत, चौथा मनोहर व सर्वात शेवटी सुरेश.
शांत, संयमी, विनम्र, सुस्वभावी, मायाळू असे त्यांचे वडील. आई राधाबाई (ताईबाय) तेवढीच कडक शिस्तीची. ताईबायची कडक शिस्त, कणखर; पण मायाळू स्वभाव, कर्तृत्ववान, अर्थ नियोजक, व्यवस्थापक असा होता. या गोष्टींचा मनोहरावर जास्त प्रमाणात प्रभाव पडला आहे. या प्रभावांचा परिणाम अर्थातच त्याच्यावर झालेला व हे सर्व गुण अंगिकारले आहेत. त्याचे बालपण आनंदात तेवढेच मजेत गेले.
आमच्या वालावकर कुटुंबाचे व पर्रीकर कुटुंबाचे बरेच जवळचे संबंध. एकमेकांचा आधारस्तंभ. चांगल्या-वाईट प्रसंगी एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होणे, सल्ला देणे. एकमेकांची मदत घेणे. असा आमचा घरोबा होता. माझे वडील पुरुषोत्तम वालावलकर, काका दत्तात्रेय वालावलकर (जे नंतर मुंबईला स्थायिक झाले) व मनोहरांचे वडील गोपाळकृष्ण पर्रीकर यांच्यातील सलोख्याच्या संबंधामुळे आपोआप आमच्यातही सलोख्याचे नाते व जवळीक निर्माण झाली. माझ्या वडिलांचा व मनोहरांच्या वडिलांचा म्हापशातील त्याकाळी जुन्या मार्केटमध्ये किराणा दुकानाचा व्यवसाय होता. व्यवसायानिमित्त सलोखा वाढत गेल्याने आम्हा दोघांतही जवळीक वाढत गेली. येथेच आमच्या मित्रत्वाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

मनोहरशी असलेले माझे मैत्र
माझ्यात व मनोहर याच्यात फक्त एका वर्षाचा फरक. मी त्याच्याहून एका वर्षाने मोठा; पण वर्षाच्या या अंतराचा फरक सोडला तर आमच्यातील नात्यावर त्याचा परिणाम कधीच झाला नाही. आम्ही फरक करू दिला नाही. भेदभाव तर नाहीच नाही. एकाने सांगितले व दुसऱ्याने ऐकले नाही असे कधीच घडले नाही. आमची दोस्ती म्हणजे नि:स्वार्थी. यात कोणत्याच अटींची बंधने नसायची. एकाने सांगायचे व दुसºयाने ऐकायचे हे आमच्यातील नात्याचे वैशिष्ट्य जे अजूनपर्यंत टिकून आहे व कायम टिकून राहणार आहे. आमच्या नात्यात प्रश्न कधीच उपस्थित झाला नाही. बालवयातील विश्वासाला तडा न जाण्याचे हे एकमेव व शेवटपर्यंत टिकणारे कारण होय. अनेकांनी आमच्या नात्यात दुफळी माजवण्याचा प्रयत्न केला. दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही. करू सुद्धा दिला नाही.
मी त्याच्याहून मोठा असलो तरी तो माझ्याहून बराच हुशार, निटनेटका, एकपाठी, स्पष्टवक्तेपणा, वक्तशीरपणा, खोटारडेपणा सहन न करणे असे अनेक सरस गुण त्याच्या अंगात होते. आजही त्याच्यात हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. त्याच्या हुशारीमुळेच त्याला एक वर्ष अगोदर माझ्याच बरोबरीने शाळेत प्रवेश देण्यात आला. म्हापशातील सारस्वत विद्यालयाच्या मराठी शाळेत प्रवेश मिळवला. अप्री (लोवर केजी) खाप्री (अप्पर केजी) ते इयत्ता चौथी पर्यंतचे शिक्षण मराठीतून याच शाळेत घेतले. शाळेत सुद्धा बरोबरीने जाणे-येणे, एका बाकावर बसणे. खोर्ली येथील मनोहरच्या घरापुढे माझे घर असल्याने घरातून मी अगोदर बाहेर पडायचो, त्याला बरोबर घेऊन शाळेत जायचो. हा नित्यनेम सुरू होता. वर्गात त्याने दंगामस्ती केली असली तरी त्याला शिक्षकाकडून कधी मार खावा लागला नाही, शिक्षकांबद्दल त्याच्या मनात प्रचंड मान व आदर ह७ोता.
चौथीतील शिक्षण पूर्ण करून म्हापसा हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवीत प्रवेश मिळवला. शाळा थोडी लांब असल्याने सायकलवरून डबल सिट जायचो. त्या काळी मनोरंजनाची इतर साधने नसल्याने कधीतरी संध्याकाळच्या वेळेला विटी-दांडू किंवा क्रिकेट खेळायचो. सायकलवरून कधीतरी पणजीपर्यंत फेरफटका मारायचो, समुद्र किनाºयावर जायचो किंवा एखाद्या नयनरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाचा मनमुराद आनंद लुटायचा.
त्याचे वडील दिवसभर आपल्या व्यवसायामुळे घराबाहेर राहत. त्यामुळे घरातील भावंडांवर मनोहराच्या आईचे लक्ष जास्त प्रमाणावर असायचे. बालपणीपासून त्याच्या बेधडक स्वभावामुळे मनोहरला त्याच्या आईकडून बºयाच वेळा मारही खावा लागत असे. एकदा असाच एक प्रसंग घडला. सायकल घेऊन बाहेर फिरायला जाण्याचे आम्ही दोघांनी अगोदर ठरवले होते. त्यामुळे मी सायकल घेऊन त्याच्या घरासमोर आलो. रस्त्यावर राहून सायकलची घंटी वाजवायला सुरुवात केली; पण मनोहरनी घरात मस्ती केल्यामुळे आईने त्याला बाहेर जायला मनाई केली होती. मनाई करताना घरात बसून अभ्यास करण्याचा आदेश त्याला दिला होता. त्याच्या आईचा धाक व भीती मलाही माहीत असल्याने मी बाहेर गप्पच बसलो. तो ऐकत नाही हे बघून त्याच्या आईने त्याला खोलीत बंद करून ठेवले व बाहेरून दाराला कडी लावून घेतली. 
खोलीत बंद असलेल्या मनोहरने तेथे असलेल्या काचेच्या खिडकीची तावदाने मूठ मारून तोडण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याच्या हाताला बरीच जखमही झाली. हातातून रक्त वाहत होते. हात दुखू लागल्याने त्याने खोलीत आरडा-ओरड सुरू केली. त्याचा आरडा-ओरड ऐकून त्याच्या आईने घातलेली कडी उघडली. कडी उघडून त्याच्या हातावर मलमपट्टी केली. खोलीतून परत मोकळ््या वातावरणात आलेल्या मनोहरने पळण्याची ही संधी साधून तेथून लगेचच पळ काढला.
बालपणी त्याचा स्वभाव हट्टीपणाचा असला तरी आम्ही कधी दंगामस्ती केली नाही. हल्लीची मुले जी बालवयात असताना करतात, त्याप्रमाणे लोकांची टर उडवणे, फजिती उडवणे, दुसऱ्याला हीन ठरवणे, दुसऱ्याच्या वस्तूला हात लावणे असे प्रकार कधी केले नाहीत. कधी खेळताना मस्ती केली असली तरी मोठ्यांचा आदर कसा करावा, मान कसा ठेवावा हे तो जाणून होता. पानावर वाढलेले अन्न टाकून द्यायचे नाही याचे पालन कटाक्षाने केले जायचे. अन्नाचे महत्त्व नंतर शाखेवर गेल्यावर समजायला लागले.
पण त्याला माशांची भारी आवड. आज तब्येतीतील काही तक्रारीमुळे खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागत असले तरी वेळात वेळ काढून आमच्या घरी येऊन एक तरी जेवण घेत असतो.
बालपणी त्याची आई घरात शुक्रवारचे कडक व्रत पाळायची. त्यामुळे त्या दिवशी घरात शिवराक जेवण असायचे. जेवणात कांदा सुद्धा नसायचा. त्या दिवशी तो घरातील शाकाहारी जेवण टाळायचा व जेवायला बाहेर जायचा. आईला निमित्त मात्र भूक नसल्याचे सांगायचा. यावेळी त्याचे जेवण आमच्या घरी किंवा एकाद्यावेळी बाहेरही होत असे.
त्याच्या या स्वभावात सुधारणा व्हावी, त्याच्या स्वभावावर लगाम यावा, आपला मुलगा सुस्वभावी व्हावा म्हणून मनोहरच्या आईने त्याला इयत्ता आठवीत त्याच्या मामाकडे मडगावला शिक्षणासाठी पाठवले. तिथे सेंट लॉयोला हायस्कूलात त्याने प्रवेश घेतला; पण तेथेही त्याच्या बेधडक स्वभावामुळे त्याचे पुढील शिक्षण पूर्ण होऊ न देता मामाने त्याला ठेवून न घेण्याचा निर्णय घेतला व गोपाळकृष्णांना, मनोहराला परत घरी नेण्याची विनंती केली. हा एका वर्षाचा कालखंड दोघानांही अज्ञातवासात काढल्याप्रमाणे बराच त्रासदायी ठरला होता. नंतर इयत्ता ९ वी पासून त्याने म्हापशातील न्यू गोवा हायस्कुलात प्रवेश मिळवला. इयत्ता दहावी व अकरावी (त्यावेळेची एस. एस. सी.) त्याने इथेच पूर्ण केली. त्यानंतर इंटरचे शिक्षण सेंट झेवियर कॉलेजमध्ये पूर्ण केले.
मामाकडून परत घरी आल्यानंतर मनोहराचे वडील अभ्यास कर, अभ्यास कर म्हणून त्याच्या मागे कायम तगादा लावायचे; पण स्वत:च्या गुणवत्तेवर, स्मरणशक्तीवर मनोहराला जबरदस्त विश्वास असल्याने तो कधीही अभ्यासाचे पुस्तक उघडून पाहात नसे. त्याने घरी येऊन कधी अभ्यास केला आहे असे मी कधी पाहिले सुद्धा नाही किंवा आठवत सुद्धा नाही. परीक्षेच्या दिवसात तर संध्याकाळच्या वेळी अभ्यास न करता चक्क तो खेळायला जात असे. परीक्षेवेळी मात्र डोक्यात साठवलेला अभ्यास बरोबर उत्तर पत्रिकेवर उतरत असे. त्यामुळे गणितात तर त्याला पैकीच्या पैकी गुण मिळायचे. इतर विषयातही एवढ्याच तोडीचे गुण त्याला मिळत असत. त्याला वाचनाची दांडगी आवड असल्याने परीक्षेच्या दिवसात बाबुराव अर्नाळकर यांच्या रहस्य कथांचे पुस्तक वाचण्यावर तो जास्त भर द्यायचा.

मनोहरचे कॉलेजविश्व
सेंट झेवियर कॉलेजमध्ये असताना मनोहरने कधीच कॉलेजातील वाचनालयाचे तोंड बघितले नाही. तरीपण वर्गात तो पहिला यायचा. वर्गात प्राध्यापक जे शिकवत ते एकाग्रतेने शांतपणे ऐकून तेच ग्रहण करायचा. त्याची जमेची बाजू म्हणजे अतिशय सुवाच्च अक्षराने लिहिलेले नोट्स. बस्स एवढाच त्याचा अभ्यास. कुणाचेही घाणेरडे अक्षर त्याला अजूनपर्यंत आवडत नाही. त्यामुळे त्याच्या सुवाच्च अक्षराचा अजूनपर्यंत त्याला अभिमान आहे. कॉलेजात शिकवताना फिजिक्स शिकवणारे प्रा. कुयेलो लेक्चरच्या शेवटी म्हणायचे ‘अ‍ॅनी क्वेश्चन’ त्यावर प्रश्न विचारायला उभा राहणाºया मनोहरला ते म्हणायचे पर्रीकर यू सिट डाउन. यू आर अ‍ॅक्टिंग टू स्मार्ट. मग मनोहर खाली बसायचा.

मनोहरचे ‘संघ’टन
शालेय शिक्षणाच्या काळात शाखेवर जाणे सुरू झाले. संगतीने शाखेवर जात असू. त्यावेळी मनोहर अवघ्या १२ वर्षांचा होता. शाखेवर खेळायला मिळते म्हणूनच शाखेवर जायला सुरुवात केली. त्या वेळी दुर्गानंद नाडकर्णी हे गोव्यातील संघाचे प्रचारक म्हणून काम पाहायचे. शाखेवर जाणे नित्यनेमाने वाढत गेले. वयाबरोबर त्यातील गांभीर्य त्याच्या लक्षात येऊ लागले. इथेच त्याच्यावर संस्कार, नेतृत्व, एकाग्रता, संयम आदी गुणांचा संयोग झाला. तसेच इतर विषयांना मूठमाती मिळाली. जन्मत:च हिरा असलेल्या मनोहरावर संघाने पैलू पाडले. संघाचे त्याला योग्य मागदर्शन घडल्याने तो योग्य दिशेने घडू शकला.
मनोहरातील धीटपणा, कणखरपणा याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. अशक्य, भीती, पळून जाणे, माघार घेणे, घाबरणे हे शब्द त्याच्या कोशात कधीच नव्हते. शाखेवर वर्ग सुरू असताना काही गुंडांनी चाल केली होती. तेव्हा दंडुका घेऊन त्यांना एकटा सामोरे जाणारा मनोहर अजूनपर्यंत मला आठवतो. आम्ही दोघांनी येझदी मोटारसायकलवरून मुंबईपर्यंत केलेला प्रवास अजून लक्षात आहे. त्या प्रवासातील आठवणी अजूनपर्यंत ताज्या आहेत. या प्रवासातील थरार आठवला की अंगावर अजून काटा उभा राहतो. मुंबईतील माझे काका दत्तात्रेय वालावलकर यांनी आम्ही केलेल्या प्रवासातील साहसावर दोघांची चांगलीच खरडपट्टी काढली. मोटारसायकल ताब्यात घेऊन गॅरेजमध्ये लॉक करून ठेवली व परत आमची रवानगी बसने गोव्यात केलेली. नंतर काही दिवसात तीच मोटारसायकल बसने परत गोव्यात काकांनी पाठवून दिली.

आयआयटी प्रवेश
इंटरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मनोहरची हुशारी पाहून वडिलांच्या मनात त्याने डॉक्टर व्हावे असे होते; पण स्वत:चे निर्णय स्वत:च घेणाºया मनोहरने इंजिनियरिंगला प्रवेश घेण्याचे ठरवले. इंटर सायन्सला ए गु्रप घेऊन इंजिनियर होण्याची पूर्वतयारी केली. इंटर सायन्स परीक्षेत आय.आय.टी. प्रवेश परीक्षेला बसला. मनोहरला चार ठिकाणी प्रवेश मिळाला. आय.आय.टी. पवई, आय.आय.टी. कानपूर, व्ही.जे.टी.आय. व जीईसी (गोवा इंजिनीयरींग कॉलेज). कानपूरला जाण्यास वडिलांनी विरोध केल्यामुळे त्यांच्या शब्दाला मान देऊन मनोहरने आय.आय.टी. पवई येथे प्रवेश घेणे पसंत केले. प्रवेश घेताना त्याने धातुशास्त्र (मॅटलर्जी) या शाखेची निवड केली. त्याच्या दिसण्यामुळे आयआयटीत विद्यार्थी त्याला अमोल पालेकर म्हणत.
मुंबईत आयआयटीत असताना देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या वेळी मनोहरने छुप्या पद्धतीने पत्रके वाटण्याचे काम केले होते. सुमारे १९७४-७५  साली त्याचा मुंबईत असताना डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्याशी संबंध सुद्धा आला ह७ोता.
आयआयटीतील पाच वर्षांच्या काळात आम्ही एकमेकांपासून दुरावलो. सुट्टीच्या दिवसांत तो घरी यायचा. त्या वेळी एकमेकापासून झालेला दुरावा भरून काढायचो. सुट्टीचे दिवस कापरासारखे उडून जायचे. आपल्या स्वभावानुरूप त्याने झेप घ्यायला इथूनच सुरुवात केली. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुकुंद आयर्न स्टीलमध्ये नोकरीला सुरुवात केली.

मनोहरचा गृहस्थाश्रम प्रवेश
आयआयटीतील शिक्षणाच्या काळात सगळ््यांना धक्का देणारा अविश्वसनीय असा पराक्रम मनोहरने केला होता. मनोहर चक्क प्रेमात पडला होता. सुरुवातीला आमचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता; पण त्याने स्वत: तसे सांगितल्यावर त्यावर विश्वास बसला. मुंबईत बोरीवली येथे मनोहरच्या मामाच्या घरी राहणाऱ्या त्याच्याच नात्यातील मुलीवर त्याने प्रेम केले. लोणावळा येथील मेधा कोटणीस. तीही त्याच्या मामाच्या घरी नोकरीनिमित्त राहात होती.
एरवी लोक जीवनात स्थिर झाल्यावर लग्न करतात; पण मनोहरने नियमाच्या विरोधात वाहत्या पाण्याच्या प्रवाहात उलट प्रवास केला होता. मुंबईतच लग्न केल्यावर त्याने नोकरी सोडून दिली. गोव्यात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार करून पत्नी मेधाला घेऊन तो गोव्यात स्वगृही परतला. आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्धार केला. मेधा लग्नापूर्वी मुंबईत बीएमसीत नोकरीला होती; पण लग्न झाल्यानंतर तिनेही नोकरीचा राजीनामा दिला. या दोघांना बघितल्यानंतर मनाला बरेच समाधान वाटले होते. आनंद गगनात मावेनासा झाला होता. लग्न झाल्यावर मनोहर आता स्थिर होईल असे वाटणारे हे समाधान होते; पण स्थिर झाला तर तो मनोहर कसला! धडपडत राहणे हा त्याचा स्वभावच होता.
मुंबईतून परत आल्यानंतर मनोहरने हायड्रोलीक सिलींडर तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. तसेच त्याच्याजवळ म्हापसा शहराचा संघचालक म्हणून जबाबदारी देण्यात आली. वेळेचे व्यवस्थापन कसे करावे हा गुण मनोहरकडून शिकून घेण्यासारखा असल्याने स्वत:चा व्यवसाय व संघाचे काम चोखपणे बजावू लागला.
मेधाचा जन्म जणू मनोहरसाठीच झाला आहे हे या जोडीला बघून मनापासून वाटले. त्यालाही तसेच कारण होते. स्वत:चा व्यवसाय सुरू केलेल्या मनोहरांची घरातून सकाळी बाहेर पडण्याची वेळ ठरलेली असायची, मात्र येण्याची वेळ कधीच निश्चित नव्हती. जे काही घडायचे ते अनियमितपणे; अगदी वादळासारखे असायचे. वेळी घरात आला तर रात्रीची १२ ही वेळ ठरलेली असायची. आला तर घरात राहणार की परत बाहेर जाणार हेही ठरलेले नसायचे. वादळाचे हे आघात झेलायची ताकद तिच्यात होती, हे जाणवत होते. ती सामान्य स्त्री नव्हती म्हणूनच असामान्य अशा मनोहराशी तिने सुखाचा संसार केला. काही समाजिक संस्थांमध्ये कार्य करून मेधाने समाजसेवाही केली.
मनोहराप्रमाणेच किंबहुना त्याच्याहून जास्त तिलाही वाचनाची भारी आवड होती. वेळ मिळेल तसा वाचनाचा आनंद घेत अनेक लेखकांची पुस्तके तिने वाचून काढली होती. काही पुस्तके संग्रही सुद्धा ठेवली.
ज्या शांतपणे व कणखरपणाने मेधाने त्याला साथ दिली त्याच साथीच्या जोरावर मनोहरांनी अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली. सुरुवातीला मनोहरने ज्या वेळी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी त्याच्या वडिलांनी त्याला विरोध केला होता; पण त्याची अर्धांगिनी मेधा यांनी दिलेल्या पाठबळामुळे मनोहर अनेक शिखरे सर करू शकला. मनोहरचा स्वभाव उंचावरून पडणाऱ्या धबधब्याप्रमाणे आहे. तर मेधाचा स्वभाव शांत निर्मळ वाहणाºया नदीप्रमाणे होता. असे असून देखील त्यांचा झालेला संगम हा सर्वात यशस्वी आहे. आज मनोहरने जे काही यश मिळवले आहे त्याचे संपूर्ण श्रेय मेधालाच द्यावे लागेल. कारण त्याच्या मागे समर्थपणे ती उभी राहिली.

कौटुंबिक धक्के
ज्या शांतपणे ती मनोहरच्या आयुष्यात आली त्याच शांतपणे ती मनोहरच्या आयुष्यातून अल्पशा आजाराने निघूनही गेली. मनोहरच्या आयुष्यातील त्याला बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता. जाण्याअगोदर उत्पल व अभिजात हे दोन तारे त्यांना देऊन गेली. सुरुवातीला १९९७ साली मनोहरचे वडील गोपाळकृष्ण यांना व त्याच्या बाराव्याला त्याची आई राधाबाई यांना देवाज्ञा झाली. २००० साली त्याची पत्नी मेधाचे निधन झाले. अडीच वर्षांच्या अंतरात त्याचे घर रिक्त झाले. कमी वेळात त्याने बरेच गमावले. त्याची मानसिक अवस्था विचित्र झाली होती. मनात असलेली गोष्ट व शल्य दुसºयाला न सांगणारा असा त्याचा स्वभाव. त्याच्या या स्वभावामुळे अनेक गोष्टी तो आतल्या आत लपवून ठेवायचा; पण मी त्याला बालपणापासून ओळखत असल्याने त्याचा चेहरा पाहून त्याच्या मानसिक स्थितीची जाणीव व्हायची. त्यातून त्याला मार्ग सुचवायचा प्रयत्न करून त्याचे मन हलके करायचा प्रयत्न करीत होतो. घरातील परिस्थिती आणि भावनांचा कल्लोळ यात स्वत:ला सावरीत त्याने मार्ग काढायला सुरुवात केली.
ज्या वेळी त्याच्या पत्नीला देवाज्ञा झाली त्या वेळी त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मुले उत्पल व अभिजात लहान होती. अभिजात तर बराच लहान असल्याने अनेक वेळा तो आपल्या वडिलांनी आपल्याला शाळेत सोडावे म्हणून हट्ट करीत असे. मनोहरच्या लाल दिव्याच्या गाडीतून जायला तो तयार नसे. किंवा इतर दुसºया कोणाबरोबरही जायला तो तयार नसायचा. इतर मुलांप्रमाणे त्याच्या बाबानेच त्याला शाळेत सोडावे असा त्याचा हट्ट होता. त्यामुळे मनोहर अनेक वेळा स्कूटरवरून किंवा माझी गाडी घेऊन त्याला शाळेत सोडत असे. सोडताना परत न्यायला येण्याचे वचन देत असे; पण मुलाला दिलेले वचन त्याला पाळणे बºयाच वेळी जमतही नसे. काही वेळा अभिजातची मी समजूत काढायचो किंवा त्याला आणायला शाळेत सुद्धा जायचो.

संघातून भाजप
१९७८-७९ साली मनोहर व तिसवाडीचे संघचालक म्हणून काम बघणारे श्रीपाद नाईक यांना संघाच्या जबाबदारीतून मुक्त करून त्यांच्यावर राजकारणाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपाची राज्यात पाळेमुळे रुजवण्याची व या पक्षाला उभारी देण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आली. जीवाचे रान करून दोघांनीही हा पक्ष जोपासला. पक्षाला सत्ता मिळवून दिली. पक्षाचे काम करताना अनेक राजकारण्यांनी त्यांच्यावर, पक्षावर टीका केली. हेटाळणी केली. पक्षाला व त्यांच्या कामाला तुच्छ म्हणून हिणावले. त्यांची टर उडवली; पण कोणाच्याही विरोधाची तमा न बाळगता टीकेला समर्थपणे तोंड देत एका तपानंतर पक्षाचे चार आमदार विधानसभेवर निवडून आणले. विधानसभेवर त्यांचे आमदार निवडून आल्यानंतर पक्षाला मजबुती देण्यासाठी पक्षाची दुसरी फळी निर्माण केली. आज राज्यात भाजपाचे पूर्ण बहुमत असलेले 
सरकार सत्तेवर आहे. याला कारणीभूत या दोघांनीही दिलेले योगदान व केलेला त्याग. त्यांच्या त्यागाला गोव्याच्या इतिहासात नक्कीच स्थान मिळेल हे नि:संशय!

मुख्यमंत्रीपद आणि विकास
गोव्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी राज्याचे पूर्ण चित्र पालटून टाकले. विकास म्हणजे काय याचा अर्थ लोकांना माहीत सुद्धा नव्हता तो त्यांनी लोकांना पटवून दिला. आज पंचायतीवरील पंचापासून ते सर्व आमदार-नेतेमंडळी निवडून आल्यावर विकासाची भाषा बोलतात. हा वास्तवपूर्ण विकास मनोहरने करून दाखवला. विकास या विषयावर लोकांना बोलण्याची ताकद मनोहरने दिली. त्याच्यामुळेच आज प्रत्येक व्यक्ती विकासाच्या गतीवर बोलत असतो. विकास होत नसल्यास त्यावर प्रखर टीका सुद्धा करतो.
राज्यातील जनतेला आज २४ तास पाणी पुरवठा होतो. गोव्यात स्वत:ची वीज निर्मिती होत नाही. दुसऱ्या राज्यातून वीज आयात करावी लागते. राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या राज्यात भारनियमन आहे; पण राज्यात स्वत:ची वीज नसताना अखंडितपणे २४ तास वीज उपलब्ध करून दिली. लोकांना आज ज्या काही मूलभूत साधन-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत त्याला मनोहरच जबाबदार असल्याचे मी अभिमानपूर्वक सांगू शकतो.
२०१२ साली राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पुन्हा आरुढ झाल्यानंतर राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक होती. याही स्थितीत त्याने लोकाभिमुख अनेक योजना राबवल्या. पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. त्याबरोबर इतरही योजना अमलात आणून दाखवल्या. राज्याची स्थिती परत रुळावर आणून दाखवली आणि हे फक्त आत्मविश्वासाचा महामेरू मनोहरच करून दाखवू शकतो. अनेक वेळा तिजोरी रिकामी झालेली असायची. सरकारी कर्मचाऱ्यांना ठरावीक दिवशी पगार देण्याएवढी सुद्धा रक्कम तिजोरीत शिल्लक नसायची; पण मनोहर स्वत:च्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्यावर मात करून दाखवायचा.
राज्यात काँग्रेस सत्तेवर असताना शिवोली पुलाचे काम २० वर्षे रखडले होते. सत्तेवर येताच एका वर्षाच्या कालावधीत त्याने तो पूर्ण करून दाखवला. या पुलाचे उद्घाटन नंतर लोकांच्याच हस्ते करण्यात आले. राज्यात अनेक विकासकामांचा सपाटा त्याने लावला. पहिल्या इफ्फीसाठी साधन सुविधांची उभारणी त्याने विक्रमी वेळेत करून दाखवली. रात्री-अपरात्री स्वत: फिरून सुरू असलेल्या कामाची पाहाणी सुद्धा तो एकटाच करीत असे.
त्याच्या असे एकट्याने फिरण्याबाबत मला अनेकदा चिंता वाटत असे. मुख्यमंत्री म्हणून रात्री-अपरात्री एकटे फिरणे योग्य नसल्याने मी त्याला एके दिवशी त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करून सोबत सुरक्षा घेण्याची विनंती केली. त्यावर त्याने मार्मिकपणे उत्तर दिले, ‘मी सुरक्षित नाही तर माझी जनता कशी सुरक्षित राहील?’ त्याचे उत्तर ऐकून माझ्याकडे गप्प बसण्याखेरीज दुसरा पर्याय नव्हता.
आपले काम हे आपली साधना आहे असे सतत मानणारी ती व्यक्ती आहे. त्याचे अनेक गुण घेण्यासारखे आहेत. त्याचा आत्मविश्वास, निर्भीडपणा, वक्तशीरपणा, स्पष्टोक्ती, हक्कासाठी लढणारा, आव्हाने स्वीकारणारा, दूरदृष्टी असलेल्या या नेत्यावर सुरुवातीला अनेकांनी विश्वास ठेवला नाही. लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवायला अनेक वर्षे घेतली. त्यानंतर मात्र त्याला स्वत:च्या काळजात स्थान दिले. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास त्याने दिल्लीला जायच्या निर्णयावेळी दिसून आले.

क ाम, काम आणि क ाम
ज्या वेळी मनोहर पहिल्यांदा राज्याचा मुख्यमंत्री झाला त्या वेळी सतत तो १७ ते १८ तास काम करायचा. मुख्यमंत्री या नात्याने त्या वेळी विधानसभेत असलेल्या दिग्गजांसमोर काढलेले त्याचे पहिले उद्गार आजही आठवतात. ‘आपल्याला मुख्यमंत्री झाल्याचा आनंद नाही, तसेच सत्ता गमावण्याची भीती सुद्धा नाही. जनतेने आपल्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. दिलेल्या या संधीचे सोने करून दाखवणार आहे.’
राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर असताना मंत्रिमंडळाच्या बैठकांवर मुख्य सचिवांचे नियंत्रण असायचे. तेच मंत्रिमंडळात जास्त प्रमाणावर बोलायचे. त्यामुळे मी कुतूहलापोटी तो पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर एक दिवस सहज प्रश्न केला. तुझ्या मंत्रिमंडळात एवढी दिग्गज मंडळी आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीवेळी त्यांना कशा पद्धतीने हाताळतोस? मनोहरने मार्मिक उत्तर दिले. बैठकीपूर्वी आपण पूर्णपणे अभ्यास करून नंतर बैठकीला जातो. उत्तरे तयार असल्याने सर्वांच्या शंकाचे निरसन होते, त्यामुळे प्रश्न मांडायचा प्रश्नच उपस्थित होत नाही. सरकारी सेवेतील अनेक आयएएस अधिकारी त्याच्यासमोर उभे राहायला सुद्धा घाबरतात. एवढा त्याचा दरारा आहे. हा दरारा अभ्यासातून, प्रामाणिकपणातून निर्माण झाला आहे.

आदरयुक्त दरारा
त्याच्या दराºयाचा किस्सा मला आजही आठवतो. चर्चिल आलेमाव हे राज्यातल्या राजकारणातील मोठे व्यक्तिमत्त्व. कुठल्याही मंत्र्याच्या केबिनमध्ये त्याची परवानगी न घेताच आत जाण्याची प्रवृत्ती त्यांच्यात आहे. एके दिवशी ते मनोहरला भेटायला मंत्रालयात आलेले; पण आत घुसण्याची ताकद त्याच्यात होईना. बाहेर असलेल्या मनोहरच्या सचिवामार्फत आत जाण्याची परवानगी त्यांनी मागितली. परवानगी मिळाल्यावरच आत जाऊन त्यांनी मनोहरशी चर्चा केली.
दुसºयांवर प्रभुत्व गाजवण्याच्या मनोहरच्या स्वभावाचा परिणाम अनेक वेळा कळत न कळत मला जाणवतो. कधीतरी त्याला भेटायला जाताना तो कुठे आहे याची जाणीव त्याला फोन न करताच नकळतच व्हायची. सचिवालयात किंवा पणजी आल्तिनो येथील महालक्ष्मी बंगल्यात असला तर त्या ठिकाणी तशी वातावरण निर्मिती असायची. त्याच्या प्रभुत्व गाजवण्याच्या स्वभावामुळेच हे नकळत कळून यायचे.
माननीय अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण आडवाणी यांना आदर्श मानणारा मनोहर आज राजकारणात नसता तर यशस्वी उद्योगपती झाला असता. त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने अनेक शिखरे उद्योग जगतात पादाक्रांत केली असती. आज त्याच्या दिमतीला नोकर-चाकर, मर्सिडिस गाड्या असत्या; पण लोकांची सेवा करण्यासाठी त्याने स्वत:ला वाहून घेतले आहे.
बालपणापासून त्याने कधीच स्वत:च्या कपड्यांकडे लक्ष दिले नाही. आजही त्याचे लक्ष नसते. जे मिळेल ते चढवायचे. संघाची शाखा सोडल्यास त्याला पायात बूट घालणे कधीच आवडत नाही; पण यावर्षी २६ जानेवारीला दिल्लीत झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ््याला त्याने परिधान केलेला जयपुरी कोट त्याच्या दिसण्याला, त्याच्या प्रकृतीला शोभेसा होता. संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेला तो कार्यक्रम असल्याने कार्यक्रम संपताच लगेचच त्याने तो काढून टाकला व आपली शर्ट-पॅन्ट परिधान केली.
अनेक वेळा मनोहर म्हणतो आपल्याला १० वर्षे मुख्यमंत्री पद मिळाले तर गोव्यावर असलेल्या कर्जाच्या बोज्यातून त्याला मुक्त करीन. ती त्याची मोठी जबरदस्त  महत्त्वकांक्षा आहे. आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची सगळी क्षमता त्याच्यात आहे. सर्व गुण त्याच्या अंगी असून सुद्धा त्याला आपला कार्यकाळ पूर्ण करण्याची व त्यातून आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याची संधी कधीच मिळू शकली नाही. सुरुवातीला ज्या वेळी तो मुख्यमंत्री झाला त्या वेळी त्याच्याजवळ पूर्ण बहुमत नव्हते. त्यामुळे २००२ साली त्याचे सरकार पाडण्यात आले. त्यानंतर २०१२ साली तो परत मुख्यमंत्री पदावर आरुढ झाला. या वेळी त्याच्याजवळ पूर्ण बहुमत असलेले सरकार होते; पण देशहिताचे महत्त्व व त्याची नेतृत्व करण्याची कुवत लक्षात घेऊन त्याला दिल्लीत बोलावण्यात आले. देशसेवेसाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्याच्यावर दृढ विश्वास असल्याने मनोहर नक्कीच त्याला पात्र ठरेल. इतर कुठल्याही सेवेपेक्षा देशसेवेला महत्त्व देणाऱ्या मनोहरचे हात मजबूत करण्याची, त्याची क्षमता वाढवण्याची आता खरी गरज आहे. देशाला मनोहरच्या, त्याच्यातील नेतृत्वगुणांची खरी गरज असली तरी आम्हाला दीर्घ काळासाठी मनोहरची खरी गरज आहे.

मनोहरची सावली
माझ्या आयुष्याची पूर्ण वाटचाल त्याच्या बरोबरीने झाली. सावलीला कधी स्वतंत्र अस्तित्व नसते. त्यामुळे मी त्याची सावली असल्यासारखाच वाढलो. तो ज्या वेळी संगतीला असतो त्या वेळी कुठलीच गोष्ट अशक्य वाटत नाही. अनेकवेळा त्याच्याबरोबर खासगी विषयावरही आमच्यात चर्चा होत असते.
ज्या वेळी त्याला दिल्लीत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला त्या वेळी पहिल्यांदा जीवनात पोकळी निर्माण झाल्यासारखे वाटू लागले; पण नंतर त्यातून स्वत:ला सावरून घेतले; कारण त्याला आलेले बोलावणे हे देशसेवेसाठी होते. त्याच्या दिल्लीला जाण्यात मला गर्व प्रतीत होतो.अत्यानंद होतो. सुरुवातीला दिल्लीत जायला त्याची मानसिक तयारी नव्हती. राज्याची चिंता त्याला सतावत होती; पण शेवटी केवळ देशाच्या सेवेसाठी तो दिल्लीत जाण्यास तयार झाला.
दिल्लीतील मनोहराच्या शपथविधी कार्यक्रमाला मला नेण्याचा हट्ट केला. सुरक्षा कारणास्तव तिथे जाणे शक्य नसले तरी मनोहराला शपथ घेताना पाहायचे होते. केलेला हट्ट मनोहरने पुरवला. त्या वेळी त्याचा शपथ घेतानाचा सोहळा पाहून डोळ्यातून आनंदाश्रू सुद्धा वाहू लागले.....

आज मनोहर आजोबा झाला आहे. त्याचा मुलगा उत्पल याच्या घरी ध्रुव याने जन्म घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मनोहरचे कुटुंब पूर्ण झाले आहे. खासगी जीवनात तो आनंदात आहे. सर्व सुखी आहेत. असे असले तरी तो देशाचा नेता आहे. त्यामुळे त्याचे भवितव्य देशच ठरवणार आहे हे मनोहरने मान्य करायला हवे. देशसेवेसाठी गोव्याने एक मनोहर दिला असला तरी गोव्यात देशसेवेसाठी, देशाच्या हितासाठी अनेक मनोहर तयार व्हावेत अशी माझी मनातून इच्छा आहे. 
(शब्दांकन -  प्रसाद म्हांबरे )
 

 

Web Title: Manohar Parrikar is the determination of Mahmeru

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.