बियर व पर्यटक वादाने गोव्यातील मनोहर पर्रीकर सरकार हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 12:22 PM2018-02-15T12:22:41+5:302018-02-15T12:22:55+5:30
मुलींच्या बियर पिण्याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पर्यटकांविषयी मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेली विधानं गेला आठवडाभर देशभरात गाजली.
पणजी : मुलींच्या बियर पिण्याविषयी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि पर्यटकांविषयी मंत्री विजय सरदेसाई यांनी केलेली विधानं गेला आठवडाभर देशभरात गाजली. मात्र, या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पर्रीकर सरकारला हैराण करून सोडले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अशा वादांना वैतागले असून सर्वच राजकारण्यांनी काळजीपूर्वक भाषा वापरावी व कठोर शब्दांचे प्रयोग करणं टाळावेत, असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी आपल्या सर्व मंत्र्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.
''महाविद्यालयांमध्ये जाणा-या तरुण-तरुणींविषयी प्रश्न विचारण्यात आला होता व मुलीही आता बियर पितात याविषयी आपण चिंता व्यक्त केली होती. बियर पिण्यापासून कुणाला रोखले नव्हते किंवा पिणं बंद करा असेही सांगितले नव्हते, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांना दिले. बियर पिण्याच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून सोशल मीडियावर टीका होत असल्यानं मनोहर पर्रीकर प्रथमच अस्वस्थ दिसत होते.
''आपल्याला चिंता व्यक्त करण्याचा अधिकार नाही काय?'', असा प्रश्नही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. महाविद्यालयात जाणा-या मुलींविषयी आपण बोललो होतो, असे पर्रीकर यांनी सूचित केले. पर्रीकर यांच्याविरुद्ध यापूर्वी ट्विटरवरून बियरच्या विषयावर प्रचंड टीका झाली. मुलींनी बियर का पिऊ नये असे प्रश्न पर्रीकर यांना नेटीझन्सनी विचारले होते. पर्रीकर यांनी पत्रकार परिषदेतून दिलेल्या स्पष्टीकरणानंतर अद्यापही सोशल मीडियावर चर्चा थांबलेली नाही. आधी गोव्यातील कॅसिनोंमध्ये गोमंतकीय तरुण-तरुणी जातात, त्यांच्याविषयी चिंता व्यक्त करा व तेथेही मोठ्या प्रमाणात मद्यपान केले जाते, त्याविषयीही काही तरी करा? असे सल्ले नेटीझन्सकडून फेसबुकवरून पर्रीकर सरकारला दिले जात आहेत.
उत्तर भारतीय पर्यटक पृथ्वीवरील घाण करत आहेत, अशा प्रकारचे विधान पर्रीकर मंत्रिमंडळातील कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी केले होते. तसेच गोव्यात गोंयकारपण न सांभाळणा-या पर्यटकांना हाकलून लावू, असे विधान पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी केले होते. सरकारमधील विविध घटकांची ही विधाने म्हणजे गोवा सरकारच्या एकूण मानसिकतेविषयी प्रश्न निर्माण करणारी ठरली.
या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले असता, ''आता सर्वच राजकारण्यांनी काळजीपूर्वक विधाने करायला हवीत असे भाष्य पर्रीकर यांनी केले. राजकारण्यांच्या विधानांचा चुकीचा अर्थ काढून चुकीच्या संदर्भात ती वापरली जात आहेत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. गोव्यात सर्वाचेच स्वागत आहे. फक्त रस्त्यावर लघवी करणे, कचरा टाकणे वगैरे प्रकार पर्यटकांनी करू नयेत एवढेच मंत्र्यांना सांगायचे होते. कदाचित त्यांना आपले म्हणणे व्यवस्थितरित्या मांडता आले नाही किंवा इतरांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला असावा, असे मुख्यमंत्री म्हणाले व या विषयावर आपल्याला आणखी काहीच बोलायचे नाही असे आवाज वाढवत पर्रीकर यांनी नमूद केले.