मनोहर पर्रीकर हॉस्पिटलमध्येच; उपचार सुरू, विश्रांतीचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 12:31 PM2018-02-26T12:31:05+5:302018-02-26T12:31:05+5:30

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डिहाड्रेशनचा त्रास होऊन त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रविवारी (25 फेब्रुवारी) रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन हॉस्पिटलमध्ये त्यांना (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. 

Manohar Parrikar is in hospital | मनोहर पर्रीकर हॉस्पिटलमध्येच; उपचार सुरू, विश्रांतीचा सल्ला

मनोहर पर्रीकर हॉस्पिटलमध्येच; उपचार सुरू, विश्रांतीचा सल्ला

googlenewsNext

पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना डिहाड्रेशनचा त्रास होऊन त्यांचा रक्तदाब कमी झाल्यामुळे रविवारी (25 फेब्रुवारी) रात्री बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन हॉस्पिटलमध्ये त्यांना (गोमेकॉ) दाखल करण्यात आले आहे. पर्रीकर यांनी आजारातून पूर्ण बरे होईपर्यंत विश्रांती घेण्याची गरज आहे, अशी भावना त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री तसेच भाजपाचे काही आमदारही व्यक्त करत आहेत.

पर्रीकर यांच्यावर गेल्या आठवड्यात मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पर्रीकर मुंबईत असताना त्यांच्या आरोग्याच्या विविध तपासण्या करून त्याविषयीच्या अहवालांवर अमेरिकेच्या डॉक्टरांचेही सल्ले घेण्यात आले. पर्रीकर यांनी लिलावती हॉस्पिटलमध्येच सगळे उपचार पूर्ण करावेत व मग गोव्यात यावे, असे भाजपाच्या कोअर टीमलाही वाटत होते. तथापि, गेल्या गुरुवारी अचानक मुख्यमंत्री पर्रीकर लिलावतीमधून डिस्चार्ज घेऊन गोव्यात आले. त्यांनी विधानसभेत प्रवेश केला व सभागृहात गोव्याचा 2018-19 सालासाठीचा अर्थसंकल्प मांडला.

वास्तविक मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री सुदिन ढवळीकर यांनी अर्थसंकल्प सादर करावा असे ठरले होते. सभापतींनी आणि भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांनीही पूर्वी तसे जाहीरही केले होते. मात्र मंत्र्यांना व भाजपाच्या आमदारांनाही कल्पना न देता र्पीकर गोव्यात दाखल झाले व त्यांनी अर्थसंकल्प मांडला. त्याविषयी त्यांचे कौतुकही झाले. लिलावती हॉस्पिटलमधून डिस्चार्ज दिल्यानंतर थेट गोव्यात येऊन अर्थसंकल्प मांडणारे मुख्यमंत्री असे पर्रीकर यांचे वर्णन अनेक प्रसार माध्यमांमधून केले गेले. तथापि, मुख्यमंत्री आरोग्याच्या दृष्टीने धोका पत्करत आहेत, अशी भावनाही पर्रीकर यांच्या चाहत्यांमधून व्यक्त झाली.

अर्थसंकल्प मांडल्यानंतर पर्रीकर गुरुवारीच सायंकाळी दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी गेले. त्यांनी घरी विश्रंती घेतली. शासकीय कामाच्या अत्यंत महत्त्वाच्या फाईल्स तेवढ्या त्यांच्या घरी पाठवल्या गेल्या. सर्व फाइल्स ते पाहू शकले नाहीत. काही फाइल्स त्यांनी निकालात काढल्या. मुख्यमंत्री सोमवारी मंत्रालयात येतील असे काही मंत्र्यांना अपेक्षित होते. तथापि, रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना डिहायड्रेशन झाले व रक्तदाब कमी झाला. यामुळे त्यांना दोनापावलहून गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. तिथे त्यांच्यावर सोमवारीही उपचार सुरू राहिले. आरोग्य मंत्री विश्वजित राणे तसेच देशाचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल सुशांत नाडकर्णी यांनीही गोमेकॉ इस्पितळाला सोमवारी सकाळी भेट दिली. पर्रीकर यांची प्रकृती सुधारत असून ते उपचारांना प्रतिसाद देत आहेत, असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पणजीत पत्रकार परिषद घेतली. पर्रीकर हे संरक्षण मंत्री होते, त्यावेळी त्यांना दिल्लीतील प्रदूषण महागात पडले, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी सोमवारी व्यक्त केली. पर्रीकर लवकर बरे होऊन नव्याने कामाला लागू दे, असे राऊत म्हणाले.

Web Title: Manohar Parrikar is in hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.