मनोहर पर्रीकर सचिवालयात येणे अशक्यच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 05:18 AM2018-12-06T05:18:46+5:302018-12-06T05:18:57+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी ते सचिवालयात येऊ शकणार नाहीत.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असली तरी ते सचिवालयात येऊ शकणार नाहीत. त्यांचे निवासस्थानच सचिवालय झाले आहे, अशी चर्चा सुरू आहे.
दिल्लीतील एम्समध्ये पर्रीकर यांची प्रकृती जशी होती, त्या तुलनेत आता ती चांगली आहे. मात्र, ते पातळ आहार घेतात. ते शारीरिकदृष्ट्या अशक्त असल्याने व्हीलचेअरवर बसतात, असे त्यांना भेटलेल्या आमदारांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पर्रीकरांंच्या एका नाकपुडीत ट्यूब आहे. ते घरात फिरतात; पण घराबाहेर पडून सचिवालयातून कामकाज करणे यापुढे शक्य नाही, याची खात्री आमदारांनाही पटली आहे.
पर्रीकरांची बौद्धिक क्षमता कमी झालेली नाही; पण त्यांना खासगी निवासस्थानीच राहणे भाग पडले आहे. ते आता अधिकाऱ्यांच्या, मंत्री, आमदारांच्या बैठका या निवासस्थानीच घेतात. (वृत्तसंस्था)
>मुख्य सचिव प्रतिज्ञापत्र देणार
पर्रीकर यांच्या आरोग्याविषयीची सद्य:स्थिती कळावी म्हणून एका संस्थेच्या कार्यकर्त्याने न्यायालयात याचिका सादर केली आहे. पर्रीकर यांना स्वत:चे आरोग्य गुप्त ठेवण्याचा अधिकार आहे, असा दावा सरकारने करून ती याचिका ‘मेन्टेन’ करण्यासारखीच नाही, अशी भूमिका घेतली. उद्या, गुरुवारी मुख्य सचिव न्यायालयाला प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.