मनोहरायणाच्या निमित्ताने

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:47 AM2019-03-18T01:47:51+5:302019-03-18T01:51:31+5:30

मनोहर पर्रीकर षष्ट्यब्दपूर्ती गौरव समारोह समितीचे सदस्य डॉ. नंदकुमार कामत मनोहर पर्रीकर यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

Manohar Parrikar news | मनोहरायणाच्या निमित्ताने

मनोहरायणाच्या निमित्ताने

googlenewsNext

- डॉ. नंदकुमार कामत
(मनोहर पर्रीकर षष्ट्यब्दपूर्ती गौरव समारोह समितीचे सदस्य)

(मनोहर पर्रीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त लोकमतने हा लेख प्रसिद्ध केला. आज पर्रीकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आम्ही पुनर्प्रकाशित करत आहोत. )
मनोहरायण हे खरे तर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर जी चरित्रात्मक कादंबरी लिहिण्याचा संकल्प केला होता त्या अपुऱ्या राहिलेल्या कादंबरीचे शीर्षक होय़ २०११ सालच्या झंझावाती दौऱ्यात पर्रीकरनी सर्वत्र आवाहन केले होते - ‘मला स्पष्ट बहुमत द्या़ एकदा तरी द्या़ स्थिर सरकार व चांगले प्रशासन देऊ़’ २०१२ मार्चमधील विधानसभा निवडणुकीपूर्वीचा काळ लक्षात घेतला तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाची काय स्थिती होती? एकदा वैतागाने माजी-मुख्यमंत्री दिगंबर कामत बोलताना मी ऐकले - ‘हे सरकार मी कसे सांभाळतो ते मलाच ठाऊक़’ २०११ साली जिथे जावे तिथे चर्चा ऐकायला मिळायची मुख्यमंत्री एक की पाच? आणि सगळ्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना़ आॅगस्ट २००७ मध्ये सरकार पाडण्याची संधी हुकल्यावर विरोधी पक्षनेतेपदी असलेल्या पर्रीकरना खात्री पटली - आता जनतेसमोर जायचे तर विधानसभा दणाणून सोडायला हवी़ सरकारची लक्तरे लोंबवायला हवीत़ थेट बूथ पातळीवर पक्ष संघटन मजबूत करायला हवे़ जेव्हा शहा आयोग स्थापन झाला तेव्हा पर्रीकरांच्या लक्षात आले असावे - हीच वेळ आहे - ‘एक घाव आणि दोन तुकडे.’ २०११ साली त्यांनी बेकायदेशीर खाणींचे बिंग फोडले़ हे सगळे गोवा मुक्तीपासून दाबून ठेवण्यासाठी उद्योगपतींनी प्रचंड मेहनत घेतलेली. त्यामुळे बेकायदेशीर खाणव्यवसाय हा जनतेच्या दृष्टीने मोठा विश्वासघात होता़ सार्वजनिक संपत्तीची ती निर्ल्लज्ज लुटालुट होती़ काँग्रेसच्या चिलखताला पडलेले हे जबरदस्त भगदाड होते़ लोक वाचत होते, ऐकत होते़ जानेवारी २०११ पासून ३ मार्च २०१२च्या मतदानापर्यंत जनमानसातील पर्रीकरांची प्रतिमा उजळत गेली़ दिल्लीची काँग्रेसप्रणीत आघाडीची सत्ता संपुष्टात यायला सव्वा दोन वर्षे बाकी होती़ समजा पर्रीकरांसाठी भाजपला मतदान केले तरी कुणीही २००५ सालची पुनरावृत्ती होणार नाही याची खात्री देत नव्हता़
मग पर्रीकरांनी संपर्क यात्रेचा धाडसी निर्णय घेतला आणि अचानक वातावरणात सकारात्मक, आशावादी बदल जाणवू लागला़ निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या, पण आता ख्रिस्ती मतदारही कंटाळून पर्रीकरांना संशयाचा फायदा द्यायला तयार होते़
अशी आश्वासक वातावरण निर्मिती होत असताना एक क्रांतिकारक घटना घडली. हा चमत्कारच होता़ आणि तो फ क्त मनोहर पर्रीकरांमुळेच झाला़ बंडखोर रक्ताच्या, कुणालाही न जुमानणाºया माथानी साल्ढानांचे परिवर्तऩ माथानीची आणि माझी ओळख १९७७ च्या विद्यार्थी आणि रापणकार आंदोलनापासून. ते गोमंत लोक पक्षाचे उमेदवार असताना त्यांचा प्रचार केला होता़ त्यांचे जवळचे स्नेही कालापूरचे रॉक फु र्ताद ‘रॉकीत’ माझे जानी दोस्त़ तिथे माथांनीची भेट, गप्पा व्हायच्या़ तळागाळातील कष्टकरी समाजाचे, मच्छीमारांचे, रापणकारांचे नेतृत्व केलेल्या माथानींचे मतपरिवर्तन २००२ सालापासून झाले असावे़ कुठ्ठाळीचे आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी पर्रीकरना पाठिंबा दिला त्यामागचे एक महत्त्वाचे कारण होते - जे खासगीत त्यांनी मला सांगितले होते - पर्रीकरनी मिरामार किनारपट्टी खासगीकरण प्रकल्प गुंडाळला़ तो प्रकल्प गुंडाळला यापेक्षा माथानी म्हणत - तुझा एक सदस्यीय सुनावणी आयोगाचा अहवाल त्यांनी स्वीकारला याचेच मला आश्चर्य वाटले़ पर्रीकरनी ७ फे ब्रुवारी २००२ रोजी माझा अहवाल स्वीकारल्याचे जाहीर करून सर्वांना धक्का दिला़ त्या पाठोपाठ आकस्मिक विधानसभा विसर्जनाची शिफारस करून त्यांनी दुसरा धक्का दिला़ आमदारांचा घोडेबाजार होण्याची भीती त्यांना दिसत होती़ त्यापेक्षा जनतेच्या कौलाला सामोरे जाणे त्यांनी पसंत केले़ जोपर्यंत केंद्रात भाजप-प्रणीत राष्ट्रीय आघाडीचे सरकार होते, अटल बिहारीजी पंतप्रधानपदी होते तोपर्यंत जून २००२ मध्ये सत्तेवर आलेल्या त्यांच्या सरकारला तशी भीती नव्हती़
पण हे दुसरे मंत्रिमंडळ सांभाळताना पर्रीकरना अनेक कसरती कराव्या लागल्या़ त्यातील काही त्यांच्या मनाविरुद्ध होत्या़ त्यांचा मूळचा स्वभाव याचे त्याचे ऐकून कुणाबद्दल मत तयार करण्याचा नाही़ दुर्जनातील दुर्जनालाही ते सुधारण्याची एक तरी संधी देतात़ काही शासकीय अधिकाऱ्यांबद्दल वारंवार तक्रारी यायच्या़ पण पर्रीकरना त्यातील काहींची कार्यक्षमता ठाऊक असायची़ असेच होते, मनमिळावू स्वभावाचे एक सनदी अधिकारी सूर्यनारायण़ त्यांच्यावर काही कारणामुळे सातत्याने कारवाई करण्याची मागणी होत असताना पर्रीकरनी एक धाडसी निर्णय घेतला़ आपल्या पणजी मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली़ त्यांना चक्क तत्कालीन नगरपालिकेच्या मुख्याधिकारीपदी नेमण्यात आले़ आणि सहा महिन्यांत काय आश्चर्य़ पणजी मार्केटमध्ये मासे विक्रेत्यांसाठी नव्या शेडस उभ्या झाल्या़ सूर्यनारायणांकडून पर्रीकरनी हे काम करवून घेतले़ जी माणसे, जे सनदी अधिकारी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरले त्यांना संधी देऊन पर्रीकरनी प्रशासनात चांगली शिस्त आणली़ मी गेली १६ वर्षे संजीत रॉड्रिग्सना ओळखतो़ पर्रीकरनी त्यांची योग्यता व क्षमता ओळखली़ इफ्फ ीच्या गोव्यातील प्रथम आगमनाच्या वेळी संजीत रॉड्रीगीजनी बरेच कष्ट घेतले़ संजीत हा टीका सोसूनही हस्तांदोलन करणारा अधिकारी़ पर्रीकर नेहमी सांगायचे - गोव्यात मला खूप काही करायचेय, पण योग्य माणसे कुठून आणू? अवघे काही अधिकारीच मन लावून काम करतात़
१९९१ सालापासून माझे मनोहर पर्रीकर या राजकारणातील उगवत्या सूर्याकडे लक्ष होते़ जुलै १९९० पासून आम्ही काही मंडळींनी भूतखांब-केरी पठारावरील नायलॉन ६,६ प्रकल्पाबद्दल संशय व्यक्त केला होता़ आंदोलनाच्या अगदी शेवटच्या टप्प्यात जेव्हा चर्चसंस्थेने वाजवीपेक्षा अधिक रस घ्यायला सुरुवात केली तेव्हा मनोहर पर्रीकर पुढे आले़ वास्तुविशारद कमलाकर साधलेंच्या ‘भूतखांबचा लोकलढा’ या वाचनीय पुस्तकात सगळा साग्रसंगीत इतिहास आला आहे़ प्रा़ सुरेंद्र सिरसाट सभापतीपदी असताना मडगावचे माजी आमदार अनंत नरसिंह ऊर्फ बाबू नायक यांच्या अध्यक्षतेखाली गोवा विधानसभेने संपूर्ण नायलॉन ६,६ प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी सभागृह समिती नेमली होती़ आमदार सायमन डिसौझा, विनयकुमार उसगांवकर, मानुएल फ र्नांडिस, राणू प्रभुदेसाई हे इतर सदस्य होते़ बाबूनी अहवाल तयार करण्याचे काम प्रा़ कामत दलालांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीकडे सोपविले होते़ त्यावर माझीही वर्णी लागली़ एनआयओचे डॉ़ सिंगबाळ, डॉ. नारायण वर्दे, झेफ रिनो डिसौझा, हे इतर सदस्य होते़ शेवटी अहवाल लेखनाची जबाबदारी माझ्या डोक्यावर आली़ २२ नोव्हेंबर १९९० रोजी तो पूर्ण करून बाबू नायकांकडे दिला़ सायमन डिसौझा अहवालावर स्वाक्षरी करण्यास तयार नव्हते़ त्यांना टाळून मग बाबंूनी इतर सदस्य आमदारांच्या सह्या घेऊन अहवाल सभापती प्रा़ सिरसाटांना सादर केला़ त्यानंतर पंधरा दिवसांत पुलोआ सरकार कोसळले़ त्या वेळी नायलॉन ६, ६ प्रकल्पाचे पुढे काय रामायण घडणार आहे याची कल्पना स्थानिक आमदार डॉ़ जल्मींनाही नव्हती व मनोहर पर्रीकरनाही़
पण शेवटच्या टप्प्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आंदोलनातील सहभागी कार्यकर्त्यांच्या ‘ओ’ ला ‘ओ’ देऊन अत्यंत कठीण काळात जेव्हा मनोहर पर्रीकर तिथे पोहोचले तेव्हा नेतृत्वात जोम व जोष आला़ नोव्हेंबर १९९४ मध्ये ते पणजीतून निवडून आले होते़ सरकारने आंदोलकांची जी दडपशाही केली त्याचा त्यांनी निषेध केला़ आंदोलनाला हिंसक वळण लागण्यापूर्वीच विधानसभेच्या निवडणुका झाल्या म्हणून स्व़ डॉ़ काशिनाथ जल्मी पुन्हा निवडून येऊ शकले़ त्या फेब्रुवारी १९९५  मध्ये झाल्या असत्या तर त्यांची अनामत रक्कमही वाचू शकली नसती़
या आंदोलनामुळे मनोहर पर्रीकरना गोव्यातील ग्रामीण स्तरावरील काँग्रेसविरोधी धुमसत्या असंतोषाची कल्पना आली़ २०११-१२ दरम्यान त्यांनी जी पदयात्रा केली त्यामागे हे सगळे अनुभव होते़
म्हणून सत्तेवर येताच, स्थिर सरकारचे आता ते मुख्यमंत्री असल्याने जून २०१२ मध्ये त्यांना गळ घातली की मी ‘मनोहरायण’ लिहिणार आहे़ ते चरित्र असेल किंवा चरित्रात्मक कादंबरी असेल तर त्यांनी माझ्यासाठी वेळ द्यावा़ त्यानंतर ते इतके व्यग्र झाले की नंतर माझी भुणभुण ऐकून ते म्हणाले - तू एक पूर्ण प्रश्नावली पाठव; मग मी देईन आवश्यक माहिती़ त्या वेळी मी म्हटले - अगदी बालपणापासूनची माहिती हवी आहे़
उत्पल पर्रीकर हा त्यांचा ज्येष्ठ चिरंजीव अभियंता आहे़ त्याच्या फेसबुकवर मनोहर पर्रीकर व बंधूंचा कोवळ्या वयातील फ ोटो एक दिवस पाहायला मिळाला़ लक्षात राहतात ते त्यांचे चमकदार डोळे, भरदार केशसंभार व निरागस चेहरा़ गेल्या २० वर्षांत मनोहर पर्रीकर या व्यक्तिमत्वावर बरे वाईट आणि अगदी वाईट म्हणजे अब्रुनुकसानीच्या स्तरापर्यंत जाणारे लेखन झाले आहे़ त्यांची काही व्यंगचित्रे तर हीन अभिरुचीची होती़
पर्रीकरांचा बालवयातील तो चमकदार, तजेलदार निरागस चेहरा मला नेहमी विचारमग्न करतो़ आपल्या विवाहोत्तर खासगी जीवनाबद्दल, व्यवसायाबद्दल ते कधी बोलत नाहीत़
मी एक सदस्यीय आयोग म्हणून २००२ साली मिरामार खासगीकरण प्रकल्पावर सुनावणी घेत असताना एका इंग्रजी वृत्तपत्राला त्यांनी सांगितले - मी २००७ नंतर राजकारणातून मुक्त होण्याचा विचार करतोय़
त्यांनी जे सांगितले ते खरेच होते़ हल्ली ६० वर्षे पूर्ण केल्यावर व पंतप्रधानांनी दिलेली जबाबदारी आटोपल्यावर २०१९-२० नंतर निवृत्त होण्याचा जो विचार त्यांनी बोलून दाखविला तो प्रामाणिक होता, खरा होता - ती लोकांना भावनाविवश करणारी खेळी नव्हती़
संघाच्या मुशीतून, संघाच्या शिस्तीतून, संघीय संस्कारातून त्यांचे नेतृत्व साकारलेले़ १९९४ पासून मी पाहिलेय सतीश धोंडनी सावलीसारखी त्यांची कशी साथ दिली ते़ कितीही उशीर होवो सतीश विधानसभेच्या निमंत्रित कक्षात बसून असायचा़ जीवाला जीव देणारे असे कार्यकर्ते लाभल्यानेच पर्रीकरना राजकारणात काही धाडसी खेळ्या करता आल्या़ त्यांना सार्दिनचे सरकार मुळीच पाडायचे नव्हते़ खरे तर ते त्यांचेच संयुक्त सरकार होते़ पण काही गोष्टी अत्यंत अशिष्ट व अनिष्ट पद्धतीने चालल्या होत्या़ भाजपला हे पसंत पडणारे नव्हते़ पर्याय दोनच होते - सरकार पाडणे किंवा राष्ट्रपती राजवट़ १९८९ ते २००२ हा कालखंडच असा होता की सरकार पाडण्यासाठी वा घडविण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या थैल्या घेऊन ‘किंगमेकर्स’ तयार असत़
प्रतापसिंह राणेंचे सरकार पडणार याची कल्पना मला डॉ़ काशिनाथ जल्मींकडून मिळाली होती़ आॅगस्ट १९९८ मध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्या होत्या़ कुठच्याही पद्धतीने दोतोर विलीबाबना सिंहासनारूढ व्हायचे होते़ त्या वेळी भाजपचे फ क्त चार आमदार होते़ - मनोहर पर्रीकर, दिगंबर कामत, श्रीपाद नाईक, नरहरी हळदणकऱ मग़ो़चे आठ आमदार होते़ तीन अपक्ष आमदार होते़ सांताक्रुझच्या तत्कालीन आमदार व्हिक्टोरिया फ र्नांडिसना विधानसभेच्या कामकाजासाठी माझी मदत, सल्ला व मार्गदर्शन हवे असायचे़ त्यांना मी ते संपूर्ण आमदारकीच्या काळात म्हणजे २०१२ पर्यंत दिले व त्यातून माझे प्रचंड शिक्षण झाले़ जुन्या विधानसभेत व्हिक्टोरिया बाई आणि पर्रीकर एकाच दुहेरी आसनावर बसायचे़ त्यामुळे आमची पर्रीकरांशी चांगली गट्टी जमली़ कधीकधी पर्रीकरांचे कागदपत्र अनवधानाने बाई उचलून आणायच्या़ बार्इंच्या राजकीय महत्त्वाकांक्षेकडे पर्रीकरांचे बारीक लक्ष होते़ कधीतरी सरकार पाडण्यासाठी वा घडवण्यासाठी त्यांची मदत लागेल असा त्यांचा हिशेब असावा़ विरोधी पक्षनेते म्हणून जून ९९ मध्ये त्यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा माझे त्यांच्याकडे एक काम निघाले़ ते व्हावे म्हणून पासपोर्ट कचेरीत पावसाचा मारा सहन करीत ते माझ्याबरोबर चालत आले़ वाटेत त्यांनी सहज प्रश्न केला़ ‘व्हिक्टोरियाबाई समाधानी आहेत का?’ मी म्हटले, ‘नाही, ज्येष्ठ असूनही त्यांना फक्त सरकार पक्षाने फलोत्पादन मंडळाचे अध्यक्षपद दिलेय़ त्यांच्यापेक्षा कनिष्ठ, अननुभवी व्यक्ती मंत्रीपदी आहेत़’ गंमत म्हणजे पर्रीकरनी हे ऐकून काही भाष्य केले नाही़ पण नोव्हेंबर १९९९ मध्ये सरकार कोसळून व्हिक्टोरियाबाई मंत्री झाल्या़ मला पर्रीकरांच्या वाढत्या राजकीय जाणीवेचे तेव्हा कौतुक वाटले़ कुठच्याही सत्तेच्या पदामागे धावण्याचा त्यांचा स्वभाव नाही़ २४ आॅक्टोबरला आमदारपदी असतानाच २००० साली ते प्रथमत: मुख्यमंत्री झाले़ त्या वेळी पक्षांतर बंदी नव्हती़ आमदार अपात्र ठरवणे अवघड होते़ २४ आॅक्टोबर २००० ते २७ फे ब्रुवारी २००२ पर्यंत त्यांनी चांगले प्रशासन दिले़ पण भाजपच्या शिस्तीशी, विचारसरणीशी देणे घेणे नसलेली न जुळणारी माणसे त्यांना स्वीकारावी लागली़ त्यावेळीच पहिल्यांदा राजकीय संन्यासाचा विचार त्यांनी केला असावा़
आपण प्रामाणिक आहोत, चांगले काम करू शकतो, चांगले शासन-प्रशासन देऊ शकतो तर गोव्याचे मतदार भाजपला स्वत:च्या बळावर सरकार का चालवायला देत नाहीत या प्रश्नाचे उत्तर पर्रीकरना शेवटी माथानीमुळे मिळाले़
माथानींनी गोमंत लोक पक्ष विसर्जित करून भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा अपेक्षेप्रमाणे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला़ त्यांच्या मित्र व समर्थकांनी, हितचिंतकांनी त्यांना खडसावले,
फै लावर घेतले़ सगळ्यांचा मुद्दा, आक्षेप एकच होता़ भाजप हा हिंदुत्ववादी, जातीयवादी पक्ष तर तुझ्यासारखी ख्रिश्चन व्यक्ती यांच्याशी कसे सख्य साधते?
अशा वेळी माथानीने दिलेल्या उत्तराची खोल चिकित्सा त्या वेळी कुणी केली नाही़ माथानी हे काही नुकतेच दुधपिते राजकारणी नव्हते़ मग़ो़, काँग्रेस सगळ्या राजवटी, सगळे राजकारण त्यांनी जोखले होते़ चर्चसंस्थेची धाव कुठून कुठपर्यंत हेही त्यांनी ओळखले होते़
त्यांनी ज्या व्यक्तीच्या भरवाशावर सर्वांना चूप केले ती व्यक्ती होती मनोहर पर्रीकऱ
माथानी म्हणाले ‘आरे ही आमची गोंयची, गोंयकारांची भाजपा मुरे’़ माथानींना म्हणायचे होते - पर्रीकर राष्ट्रीय स्तरावरचे राजकारण गोव्यात चालवून घेणार नाहीत़
उत्कृष्ट, सातत्यपूर्ण नेतृत्वाला, चारित्र्यवान, निर्भीड नेतृत्वाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मान देतो़ संघाने मनोहर पर्रीकरांची सोन्यासारखी पारख केली़ ते झळाळून निघाले़ चमकदार निघाले, सच्चे निघाले, मग संघाच्या ‘एकचालकानुवर्तित्व’ धोरणाप्रमाणे मनोहर पर्रीकरांना राजकारणात मुक्तहस्त मिळाला आणि संघाने टाकलेल्या या दुर्दम्य विश्वासाचे २०१२ साली पर्रीकरनी सोने केले़ संघाची खरीखुरी विजयादशमी २०१२ साली गोव्यात झाली़
मनोहरायण लिहून पूर्ण करायचे तर अशा असंख्य आठवणी व प्रसंग आहेत की मनोहर पर्रीकर माणूस म्हणून किती मोठे, पालक म्हणून किती प्रेमळ, प्रशासक म्हणून किती नि:स्पृह याची असंख्य उदाहरणे मी देऊ शकेऩ काही प्रसंगी भाषणे किंवा लेखनामुळे त्यांच्यावर मी टीका केली़ त्यांनी राग आला, वाईट वाटले तरी एका शब्दाने मला कधी दुखवले नाही़ मला आधी त्यांच्या संवेदनशील स्वभावाची मुळीच कल्पना नव्हती़ ते प्रथमत:च मुख्यमंत्री झाले तेव्हा एकदा मी भेटण्याची वेळ ठरवून त्यांच्या कचेरीत हजर झालो़ अर्धा तास झाला पण भेट होईना़ पण बरेच लोक त्यांच्या केबिनमध्ये आत - बाहेर करताना दिसत होते़ मी विनंती केली़ पण माझा नंबर 
लागेना़ सुमारे तासभराने भेट झाली़ चिडून मग मी लिहिले - मुख्यमंत्र्यांच्या कचेरीबाहेर एक तास़ खरेतर माझे काम सार्वजनिक महत्त्वाचे होते़ पर्रीकरनी तो लेख वाचला होता़ नंतरच्या एका भेटीत त्यांनी मला फै लावर घेतले असते़ पण माझ्याकडे पाहून ते थंडपणे म्हणाले - ‘तू कशाला लिहायला हवे होतेस - तुझ्यासाठी माझा दरवाजा कधीही खुला असेल’ त्यांचा सूर दुखावलेला होता़ मलाही वाईट वाटले़ त्यानंतर खाणा-जेवणाची नीट व्यवस्था नसताना, दोन मुलांना विधुरावस्थेत वाढवताना त्यांची सारखी होणारी तगमग, दमछाक माझ्या पत्नीने माझ्या लक्षात आणून दिली व मी आणखी शरमिंदा झालो़ काही दिवसांपूर्वी पर्रीकर वास्कोत होते़ स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदानी त्यांना जेवण दिले़ ‘गोमंतकीय नुस्त्याचे’ जेवण आवडीने जेवताना भारताचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांचे छायाचित्र फेसबुकवर त्यांच्या एका चाहत्याने प्रसिद्ध केले़ त्यावर मी प्रतिक्रिया दिली़ ‘किती आनंद झाला पर्रीकरना शांतपणे जेवताना पाहूऩ मेधातार्इंच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी कसे दिवस काढले, याची फ ार थोड्यांना कल्पना असेल’ लगेच या प्रतिक्रियेवर असंख्य सकारात्मक कॉमेंटस आले़
जोपर्यंत संरक्षणमंत्री म्हणून ते आपले काम चोख बजावत आहेत तोपर्यंत ते कितीवेळा गोव्यात येऊन जातात हा वादाचा मुद्दा होऊच शकत नाही़ सगळ्यानांच ठाऊक आहे की संरक्षणमंत्रीपद त्यांनी आपण होऊन मागितले नव्हते़ त्यांना मुख्यमंत्रीपदाची पाच वर्षे पूर्ण करायची होती़ ज्येष्ठ राजकारणी म्हणून गोवा मंत्रिमंडळ व प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करणे हा त्यांचा हक्क आहे़
अभ्यासूवृत्ती, ग्रंथप्रेम, वाचनप्रेम, गुणग्राहकता यामुळे पर्रीकरनी विधानसभेत व बाहेर आपले असंख्य चाहते निर्माण केले़ वर्षभरामागेच मी या चाहत्यांना आवाहन केले होते की पाहा तुमच्या मनोहरभार्इंना १३ डिसेंबर २०१५ रोजी साठ वर्षे पूर्ण होत आहेत़ तुम्हीच आतापासून तयारी करा, पण सरकारी खर्च नको़
मनोहर पर्रीकर आपला वाढदिवस साजरा करीत नाहीत़ तरीसुद्धा त्यांना वृत्तपत्रात जाहिरात देऊन आपण गोव्याबाहेर जात आहे वगैरे नाटके करणे जमत नाही़ त्यांचे चाहते, मित्रमंडळी, कार्यकर्तेच शामियाना वगैरे घालून त्यांना अक्षरश: तिथे ओढून नेतात ही वस्तुस्थिती मी स्वत: पाहिलेली आहे़ मुख्यमंत्री पार्सेकर सरांच्या अध्यक्षतेखाली भलीमोठी १३५ सदस्यांची समिती त्यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सोहळयासाठी स्थापन झाली़ त्या मुख्यमंत्र्यांनी आग्रहाने व आर्जवाने माझे नाव समाविष्ट केले व मी होकारही दिला याचे एक कारण म्हणजे मनोहर पर्रीकरांच्या पावलांचे काही वर्षांपूर्वी कला अकादमीत घेतलेले जवळून दर्शऩ
पर्रीकर पादत्राणे काढत असताना मी त्यांच्या मागे उभा होतो़ सहज माझे त्यांच्या दोन्ही पायांच्या तळव्यांकडे लक्ष गेले़
गोव्यातील एकाही प्रस्थापित राजकारण्याच्या पायाचे तळवे असे नसतील़ पर्रीकरांच्या तळव्यांना चालून, चालून, भेगा पडून त्यांची अक्षरश: चाळण झालेली मला दिसली़ त्यांना त्याच्या औषध पाण्याची, मलमपट्टीची काही फिकीर नसावी़
पण आजही ते दृश्य डोळ्यांसमोरून हलत नाही़ त्या असंख्य भेगांतून मला दिसले ते एक वेगळेच मनोहर पर्रीकर ज्यांनी तळागाळात जाऊन बहुजन समाजाचा विश्वास व प्रेम संपादन केले़ राजकारणात त्यांनी असंख्य मित्र जोडले. तसेच असंख्य शत्रू व टीकाकारही निर्माण केले़ त्यांच्याबद्दल जरा चांगले लिहिले तर ‘पर्रीकरांचा बिरबल’ म्हणून एकाने टीका केली़ पण जे मनोहरायण लिहून पूर्ण करण्याचा मी संकल्प केलाय ते दाखवून देईल की अशा कुठच्या शक्तींनी केवळ मत्सर, भीती, असूयेपोटी तो पर्रीकराचो मनीस म्हणून गोवा बचाव अभियानातून मला बाहेर ठेवले़ खरे तर तो पर्रीकरांचाच सन्मान होता़. 

Web Title: Manohar Parrikar news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.