मनोहर पर्रीकर : राजकारणाच्या दलदलीतील कमळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 06:56 AM2019-03-18T06:56:52+5:302019-03-18T06:57:22+5:30
मनोहर पर्रीकर यांनी स्वत:वर शिंतोडे उडू दिले नाहीत. राजकीय पैसा स्वत:साठी कधी वापरला नाही. त्यामुळे भाजपाचे चिन्ह ‘कमळ’ असले तरी या पक्षात आज विरळा बनलेल्या कमळाप्रमाणे ते निष्कलंक, आकर्षक, आल्हादक व सुंदरतेचे प्रतीक बनले होते...
- राजू नायक
मनोहर पर्रीकर या वटवृक्षाखाली भाजपा वाढली याबद्दल दुमत असणार नाही. पर्रीकरांनी आपले रक्त भाजपासाठी दिले. ज्या पक्षाला लोक चेष्टेने घेत होते. या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविणे म्हणजे अनामत रक्कम हरविणे होते. त्या पक्षाला चेतना दिली, पक्षाला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि विरोधकांच्या छातीत धडकी भरविण्याइतपत पक्ष सक्षम, बळकट केला.
आज पर्रीकरांविना भाजपा याचा आम्ही विचार करतो तेव्हा भाजपाचे कसे होणार, अशी चिंता दाटून येते. तशी ती भाजपाच्या असंख्य नेते व कार्यकर्त्यांना वाटलेली असणार. कारण पर्रीकरांनी एकहाती पक्षाची संघटना आणि विधिमंडळ पक्ष चालविला, असेच नव्हे तर अनेक अनोळखी चेहऱ्यांना अस्तित्व मिळवून दिले. त्यांच्यामुळेच अनेक जण नेते, आमदार, मंत्री बनू शकले. परंतु, असेही मानणारे आहेत की पर्रीकर हे वटवृक्षाप्रमाणे होते, त्यामुळे त्यांच्या सावटाखाली दुसरी फळी तयार होऊ शकली नाही. याचा अर्थ पर्रीकरांनी स्वत:ला आव्हान मिळेल म्हणून दुसरे नेते तयार होऊ दिले नाहीत का?
या प्रश्नाचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट निश्चित लक्षात घ्यावी लागेल की पर्रीकरांनी आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना ‘पुढे’ येऊ दिले नाही. संरक्षणमंत्री बनण्यासाठी त्यांनी पणजी मतदारसंघाचा राजीनामा दिला तेव्हा आपल्या पुत्राला ते सहज उमेदवारी देऊ शकले असते. भारतीय राजकारणाची ही एक शोकांतिकाच होऊन बसली आहे. गांधी कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्या शिवसेनेपासून प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना नंतर उपरती होऊन त्यांना आपल्या पुत्र-पुत्रींना राजकीय क्षितिजावर घेऊन येण्याचा व आपली गादी चालवण्यास देण्याचा मोह झालाच; परंतु पर्रीकरांनी भाजपासाठी स्वत:च येथे सुपीक भूमी तयार केली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पुत्राला किंवा भाच्याला पणजीची जागा दिली असती तर कोणी विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता; परंतु पर्रीकरांनी आपल्याबरोबर राजकीय कार्य करणाºया सिद्धार्थ कुंकळयेकरांना संधी दिली. माझ्या मते, दुसरी फळी ती ही! दामू नाईक, नरेंद्र सावईकर, प्रमोद सावंत, सिद्धार्थ, दत्तप्रसाद नाईक... अशी असंख्य नावे सांगता येतील. किंबहुना मी म्हणेन, दुसरी फळी तयार करण्यासाठी लागणारी भाजपाएवढी पक्षसंघटना दुसरी कुठेच नाही. भाजपा आणि रा.स्व. संघाने वेगवेगळ्या पातळीवर काम करायचे व पक्षाला माणसे पुरवायची अशी ती बांधणी आहे. ही बांधणी कार्यकर्त्यांना अक्षरश: राबवून घेते. त्यांना कार्यक्रम देते आणि त्यांच्यातूनच निवडणूक ‘मशिन’ तयार करते. जे उमेदवार पाहात नाहीत. पक्षाचे चिन्ह लोकांपर्यंत नेण्याचे काम करतात. एक गोष्ट मान्य करावी लागते की अशा संघटनांमध्ये लोकशाहीची फारशी कदर केली जात नाही. पर्रीकर हे काहीसे एककल्ली, हुकूमशहाच होते आणि त्यांना ‘इगो’ही होता. त्यामुळे त्यांच्याशी वाद घालणारा, विरोध करणारा खपत नाही. असे अनेकजण पक्षातून बाहेर फेकले गेले आहेत; परंतु तशी एकचालकानुवर्ती नेतृत्वाची व्यवस्था आज जवळजवळ प्रत्येक पक्षात आहेच की!
मी पर्रीकरांना गेली ३० वर्षे ओळखतो. भाजपा संघटनेत ते सक्रिय झाले तेव्हा सुरुवातीला ज्या पत्रकारांशी संबंध होते त्यात मी एक होतो. मला आठवते, त्याप्रमाणे त्यांनी व्यवसायात नुकताच जम बसवला होता व राजकीय तत्त्वज्ञानच नव्हे तर राजकीय कौशल्यही आपल्याला अवगत आहे आणि त्या जोरावर मी राजकारणात तड गाठणार हा आत्मविश्वास त्यांच्या चेहºयावर दिसे.
त्यानंतर भारतात हिंदुत्वाचे राजकारण वाहाण्यास सुरुवात झाली. मगोपने भाजपाला साथ केली. १९९४मध्ये या पक्षाचे चार उमेदवार जिंकून आले. सुरुवातीला मगोप, हिंदुत्ववाद याचा त्यांना लाभ झालाच; परंतु त्यानंतर पर्रीकरांनी स्वत:चे स्वतंत्र राजकारण सुरू केले व मागे वळून पाहिले नाही. त्यांच्याएवढा राजकारणाचा अभ्यास कोणी केला नसेल. त्यातूनच गोव्यात काँग्रेस पक्षाच्या बंडखोरीला पर्रीकरांनी फूस दिली. काँग्रेसला संपवायला या पक्षाची नस काय आहे हे त्यांना माहीत होते. काँग्रेस बंडखोरांबरोबर भाजपाने सरकार स्थापन केले; परंतु स्वत: पर्रीकरांनी मंत्रीपद स्वीकारले नाही.
त्यावेळी त्यांचा दोस्त बनलेला एक पत्रकार मला सांगतो, पर्रीकरांनी त्यांना घेऊन पणजीत दोन चकरा मारल्या. नंतर त्याला घेऊन ते म्हापशातील घरी गेले. तेथे जेवण घेतले तरी या चार तासांमध्ये त्यांना स्वत:बद्दल विचारण्याचे धाडस पर्रीकरांना होत नव्हते. शेवटी धीर धरून पर्रीकरांनी विचारले, मी मुख्यमंत्री बनलो तर लोक मला स्वीकारतील? तो त्यांचाच पाठीराखा होता. त्या पत्रकाराने त्यांना छातीठोकपणे उत्तर दिले, खरंच, तुम्ही हे शिवधनुष्य पेलू शकता. जातीयवादातून लोक तुमच्याकडे पाहाणार नाहीत.
पर्रीकरांनी कठोरपणे राज्यशकट हाकले, कधी नतद्रष्टांची साथ घेतली, कधी त्यांना पाडले, कधी राजकीय तडजोडी केल्या तर कधी पक्षसंघटनेलाही विश्वासात न घेता सरकारही स्थापन करण्यास ते कचरले नाहीत!
पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत त्यांनी प्रशासनात दरारा निर्माण केला, भ्रष्ट नेत्यांना कठोर शिक्षा केल्या, तुरुंगात डांबले याचा जनमानसावर विलक्षण परिणाम झाला व पर्रीकरांची ‘छबी’ श्रीमान स्वच्छ, प्रामाणिक तशीच राजकीय सुपरमॅन अशी बनली. केवळ गोव्यात नव्हे तर महाराष्ट्रासह देशभर त्यांना प्रचंड मान होता. या ३० वर्षांत त्यांनी प्रचंड बरे-वाईट राजकारण केले, खाणचालकांना खेळविले, प्रचंड पैशांची उलाढाल केली, भ्रष्ट, अप्रामाणिक नेत्यांच्याही मांडीला मांडी लावून ते बसले; परंतु स्वत: अत्यंत साधे राहिले. मोठ्या विलासी गाड्यांचा त्यांनी कधी हव्यास बाळगला नाही, साधेपणाने प्रवास केला. त्यामुळे पत्रकार, बुद्धिवादी, मध्यमवर्गीय त्यांच्यावर प्रसन्न होते. महाराष्ट्रात ते लग्न समारंभात गेले तर रांगेत उभे राहून जेवण घेतात, कार्यकर्त्यांच्या समारंभांना उपस्थित राहातात, अप्रामाणिक कार्यकर्त्यांना सांभाळून घेत नाहीत, पोलिसांच्या नोकºया ते पैसे न घेता देतात, असे माझ्या कानावर पडले होते. (ते मोटरसायकलने फिरतात- ही एक प्रचंड गाजलेली अफवा) पर्रीकरांनीही जाणीवपूर्वक या सर्व कथा-दंतकथांचा व्यवस्थित उपयोग करून घेतला. शिवाय राजकारणाच्या आजच्या दलदलीत बरेच शक्य तेवढे चारित्र्यवान असे ते राहिले.
(लेखक गोवा आवृत्तीचे
संपादक आहेत)