मी लवकरच तुमच्यात परतेन, मनोहर पर्रिकरांचा कार्यकर्त्यांसाठी भावनिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:59 PM2018-05-13T21:59:34+5:302018-05-13T21:59:34+5:30
पर्रिकर जेव्हा गोव्यात परततील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी पुन्हा गोव्यात येईन, असे शहा म्हणाले.
पणजी : माझ्यावरील उपचार यशस्वी ठरत आहेत. येत्या काही आठवडयांत मी लोकांमध्ये पुन्हा येऊ शकेन, असा संदेश गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना पाठवला आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात रविवारी सायंकाळी गोवा प्रदेश भाजपचे बुथस्तरीय कार्यकर्ता संमेलन पार पडले. शहा यांचे भाषण सुरू होण्यापूर्वी शहा यांच्या उपस्थितीतच पर्रिकर यांचा व्हिडिओ संदेश सभागृहातील स्क्रीनवर दाखवला गेला.
आपण भाजपच्या बूथस्तरीय संमेलनाला शुभेच्छा देत आहे. अमित शहा यांचे मी स्वागत करतो. मी गेले दोन महिने उपचारांसाठी विदेशात आहे. त्यामुळे मी तुम्हा लोकांना भेटू शकलो नाही. आपल्यावरील उपचार चांगल्या प्रकारे यशस्वी होत आहेत. येत्या काही आठवडय़ांत मी गोव्यातील लोकांमध्ये परत येऊ शकेन, असे पर्रिकर आपल्या संदेशात म्हणाले.
अमित शहा यांनी आपल्या भाषणातही मनोहर पर्रिकर यांचा उल्लेख केला. पर्रिकर यांच्याशी आपण नुकतेच फोनवर बोललो. पर्रिकर यांना मी तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले. पर्रिकर यांनी मात्र मला कर्नाटकमध्ये काय होणार असे विचारले. पर्रिकर यांनी असे विचारले कारण ते पूर्णपणो भाजपशी जोडले गेले आहेत व ते भाजपचाच विचार करतात असे शहा म्हणाले. पर्रिकर जेव्हा गोव्यात परततील तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी मी पुन्हा गोव्यात येईन, असे शहा म्हणाले. मी भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष झालो तेव्हाच र्पीकर हे केंद्रात संरक्षण मंत्री होते व त्यांचे काम पाहण्याची मला संधी मिळाली, असे शहा म्हणाले. त्यांचे गोव्यात मोठे स्वागत केले जाईल. त्यासाठी मोठे संमेलन आयोजित करू. मी निश्चितच त्यावेळी परत येईन, असे शहा यांनी सांगितले.
My message to BJP Booth Karyakartas. pic.twitter.com/cgkfIY31cF
— Manohar Parrikar (@manoharparrikar) May 13, 2018