बाल दिनाच्या कार्यक्रमात मनोहर पर्रीकरांनी सांगितला अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2017 10:12 AM2017-11-15T10:12:07+5:302017-11-15T10:51:07+5:30
आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी एका बालदिनाच्या कार्यक्रमात बोलताना आपला तरुण वयातील अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव सांगितला.
पणजी - आपल्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंगळवारी एका बालदिनाच्या कार्यक्रमात बोलताना आपला तरुण वयातील अॅडल्ट चित्रपट पाहण्याचा अनुभव सांगितला. न्यूज 18 नं दिलेल्या वृत्तानुसार, शाळेतल्या मुलांशी संवाद साधताना एका विद्यार्थ्याने पर्रीकरांना तरुण वयात तुम्ही कोणते चित्रपट पाहायचा असा प्रश्न विचारला. त्यावर पर्रीकरांनी आम्ही फक्त चित्रपट पाहायचो नाही तर त्यावेळचे अॅडल्ट चित्रपटसुद्धा पाहायचे असे उत्तर दिले.
अॅडल्ट चित्रपट पाहताना आलेला एक गंमतीशीर अनुभवही त्यांनी यावेळी सांगितला. एकदा मी आणि माझा भाऊ त्यावेळचा प्रचंड गाजलेला अॅडल्ट चित्रपट पाहण्यासाठी गेलो होतो. मी त्यावेळी तरुण होतो. चित्रपटगृहात इंटरवल झाल्यानंतर लाईट्स ऑन झाल्या. त्यावेळी माझ्या बाजूच्या सीटवर माझा शेजारी बसला असल्याचे माझ्या लक्षात आले. हा शेजारी माझ्या आईबरोबर नेहमी बोलायचा. त्याला पाहिल्यानंतर घरी गेल्यावर आता आपली काही खैर नाही असे मला वाटले.
मी आणि माझा भाऊ अवधुत आम्ही दोघांनी चित्रपट अर्ध्यावर सोडून चित्रपटगृहातून पळ काढला. घरी परतत असताना दोघांनी परिस्थिती कशी हाताळायची त्याचा प्लान आखला होता. आईला शेजा-याकडून समजले तर आणखी ओरडा किंवा मार पडेल म्हणून मनोहर पर्रिकरांनी घरी परतल्यानंतर लगेचच आईकडे चित्रपट पाहायला गेल्याची कबुली दिली.
मी आईला सांगितले आम्ही दोघे चित्रपटाला गेलो होतो. पण त्या थिएटरला घाणेरडा चित्रपट लागला होता. आम्हाला त्या चित्रपटाबद्दल काहीच माहिती नव्हती. म्हणून आम्ही चित्रपट अर्ध्यावर सोडून बाहेर पडलो. आपले शेजारी सुद्धा तिथे दिसले असे त्यांनी आईला सांगितले. दुस-याच दिवशी शेजा-यांनी अतिउत्साहाने माझ्या आईला बोलवले व अवधुत आणि मनोहर अॅडल्ट चित्रपट पाहायला गेले होते असे सांगितले. त्यावर आईने दोघे कुठल्या चित्रपटाला गेले होते ते मला माहित आहे. पण तुम्ही त्या चित्रपटाला का गेला होता ? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर शेजारी गप्प झाले.