जिवंत असेपर्यंत मनोहर पर्रीकर मुख्यमंत्रिपदी राहतील - मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 07:47 PM2019-02-19T19:47:44+5:302019-02-19T19:48:17+5:30
मनोहर पर्रीकर जिवंत असेपर्यंत मुख्यमंत्रिपदी राहतील व गोमंतकीयांची सेवा करतील, असे भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.
पणजी - मनोहर पर्रीकर यांचा आजारच असा आहे, की ज्यात कधी स्थिती सुधारते तर कधी ढासळत असते. माझ्या वडिलांना देखील पर्रीकरांप्रमाणोच स्वादुपिंडाचाच आजार झाला होता व त्यामुळे मला स्थिती ठाऊक आहे. तथापि, पर्रीकर जिवंत असेपर्यंत मुख्यमंत्रिपदी राहतील व गोमंतकीयांची सेवा करतील, असे भाजपचे आमदार व उपसभापती मायकल लोबो यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले.
पर्रीकर यांना विश्रंती घेणे आवडत नाही. ते जोपर्यंत या जगात जीवंत असतील, तोपर्यंत ते मुख्यमंत्रिपदाची खुर्ची सोडणार नाहीत. ते गोव्यासाठी काम करत राहतील, असे लोबो म्हणाले. पर्रीकर आजारी असले तरी, ते जोपर्यंत सरकार चालवतात, तोपर्यंत भाजपप्रणीत आघाडीची सत्ता अबाधित राहील. जोपर्यंत पर्रीकर यांचे डोके चालते व जोपर्यंत ते अधिका-यांना सूचना करू शकतात, तोपर्यंत सरकारही चालेल. सद्यस्थितीपर्यंत पर्रीकर प्रयत्न करत आहेत. देव आहेच. देवाच्या हातात सर्व काही आहे . विशेषत: पर्रीकरांचे आरोग्य तरी देवाच्या हाती आहे. जर पर्रीकर यांना काही झाले तर मग त्यावेळी काय करावे ते पाहता येईल. माझ्या वडिलांनाही हाच आजार होता. कुणीच हा आजार अंगावर घेऊन कायमस्वरूपी जगू शकत नाही, असे लोबो यांनी नमूद केले.
मंत्री म्हणतात पर्रीकर थकलेत
दरम्यान, सोमवारी मुख्यमंत्री पर्रीकर यांनी दोनापावल येथील आपल्या निवासस्थानी जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक घेतली, तेव्हा काही मंत्र्यांना पर्रीकर थकले आहेत, असे जाणवले. पर्रीकर हे पूर्वीच्या तुलनेत आता थकले आहेत, असे दोघा मंत्र्यांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले. आम्ही काही प्रश्न घेऊन गेलो होतो, पण ते विचारण्याचे धाडस झाले नाही, कारण र्पीकर यांची स्थिती वेगळी आहे. मंत्रिमंडळ बैठकही जास्त वेळ चालली नाही. मंत्रिमंडळासमोरील सर्व विषयांना मंजुरी दिल्यानंतर पर्रीकर यांनी अन्य कोणत्या विषयांबाबत चर्चा केली नाही. आम्हीही त्यांना जास्त काही विचारले नाही. कारण त्यांना विश्रंतीही गरज आहे हे आम्हाला कळतेय. त्यामुळेच त्यांनी मंत्रिमंडळ बैठक सचिवालय किंवा मंत्रलयात न घेता, ती घरीच घेतली.