मनोहर पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत, पेंग्वीनकडून घोषणा; एप्रिलमध्ये होणार प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 06:38 PM2020-03-16T18:38:39+5:302020-03-16T18:42:22+5:30
र्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत प्रथमच येत आहे. यापूर्वी सदगुरू पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पहिले पुस्तक लिहिले होते.
पणजी : गोव्याचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे चरित्र प्रथमच इंग्रजीत येत आहे. लोकमतच्या गोवा आवृत्तीचे ब्युरो चिफ सदगुरू पाटील व पत्रकार मायाभुषण नागवेकर यांनी मिळून लिहिलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन देशात व विदेशातही मोठे नाव असलेल्या पेंग्वीन रेण्डम हाऊस या प्रकाशन संस्थेकडून केले जाणार आहे. पेंग्वीनने सोमवारी त्याविषयीची घोषणा केली.
पर्रीकर यांचा उद्या मंगळवारी पहिला स्मृतीदिन आहे. त्या पाश्र्वभूमीवर पेंग्वीन रेण्डम हाऊसचे पुस्तक एप्रिलमध्ये बाजारात उपलब्ध होत असल्याचे पेंग्वीनच्या प्रकाशक मिली ऐश्वर्या यांनी जाहीर केले. पर्रीकर यांचे चरित्र इंग्रजीत प्रथमच येत आहे. यापूर्वी सदगुरू पाटील यांनी मराठीत गोव्याचे राजकारण व पर्रीकर असा विषय घेऊन पहिले पुस्तक लिहिले होते. यावेळी पाटील व श्री. नागवेकर यांनी मिळून पूर्ण नव्या पुस्तकाची निर्मिती पेंग्वीनसाठी केली आहे. पेंग्वीनकडून एबुरी प्रेसतर्फे हे पुस्तक प्रकाशीत केले जाईल.
अॅन एक्स्ट्राऑर्डीनरी लाईफ : अ बायोग्राफी ऑफ पर्रीकर असे पुस्तकाचे नाव आहे. मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात पर्रीकर यांचे बालपण, त्यांचे विद्यार्थी दशेतील काम, आयआयटीतील कामगिरी, मुख्यमंत्री व संरक्षण मंत्री म्हणून कारकिर्द याविषयीची माहिती आहे.
विशेष म्हणजे पर्रीकर यांचे मित्र, कुटूंबिय, नातेवाईक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, काही टीकाकार, अभ्यासक यांच्याशी बोलून या पुस्तकात बरीच सचित्र रंजक माहिती समाविष्ट केली गेली आहे. पर्रीकर यांच्या राजकीय कारकिर्दीचे तटस्थ असे रिपोर्ट कार्ड म्हणूनही या पुस्तकाकडे पाहता येईल, असे दोन्ही लेखकांचे म्हणणो आहे.